आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साउंड ऑफ म्युझिक मारिया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नीता मावशीला मी फार गुणी आणि चांगली वाटते. तिला कुठे माहीत आहे, मलाही खोड्या करायला आवडते? आता बघेल, त्या छोट्यांसमोर मी कशी ताई म्हणून भाव खाणार आहे ते! मी शिबिरात एक दिवस मला येणा-या गोष्टी शिकवाव्यात, ही मावशीचीच कल्पना.’ कोजागिरी बसमध्ये बसल्यावर विचार करत होती. ‘आईने लगेच या कल्पनेची री ओढली होती. मी नाही कसे म्हणणार? नीता मावशी माझे किती लाड करते.’ आज ती पहिल्यांदा एकटी बसने प्रवास करत होती. हातात बाबाने काढून दिलेला नकाशा होता. त्याच्या मदतीने बसस्टॉपपासून नीता मावशीचे घर शोधून काढणार होती. यामध्ये तिला एक थ्रिल वाटत होते. नकाशाप्रमाणे चालताना बाबा बरोबर चालतोय की काय असे वाटल्याने मजा आली. काय शिकवायचे, याची तयारी करून सर्व वस्तू बरोबर घेतल्या होत्या.
‘आज आपल्याकडे तुम्हाला हस्तकला शिकवायला कोजागिरीताई आली आहे. आपण हिची ओळख करून घेऊया. कोजागिरी माझ्या मैत्रिणीची मुलगी. ही नववीत शिकते आहे. चित्रकला, मातीकाम, कातरकाम, चिकटकाम आणि शिवण असे खूप खूप काही करते. शिवाय नृत्य शिकते. आज दिवसभर तुमच्याबरोबर ही ताई काम करेल.’ नीता मावशी ओळख करून देत असताना कोजागिरीला स्वत:च्या स्वप्नातील ‘कोजागिरी दी ग्रेट’ आठवली आणि मनातल्या मनात गुदगुल्या होऊन खुदकन हसू आले.
कोजागिरीने सर्वांची नावे विचारून घेतली. वयाप्रमाणे कोणत्या गोष्टी करायच्या, याचा मनातल्या मनात अंदाज घेतला. गटात छोटी तिसरीतील चार मुले होती. त्यांना कोजागिरीने मातीकाम करायला सुरुवात करून दिली. त्यापैकी एक- मनोज धसमुसळा होता. इतर सर्व पाचवी-सहावीमधील होती. त्यांना कातरकाम दाखवायला सुरुवात केली. तिने विणलेली कागदाची चटई आणली होती. ती पाहिल्यावर तसे आपणही करावे, असे काही जणांना वाटले. नीतामावशीचा मुलगा सुहास तिला आवडला. तो मन लावून कामाला लागला. उरलेल्या चौघांना कोजागिरीने झाडूच्या काड्यांच्या वस्तू करून दाखवल्या. तसेच काडेपेटीच्या काड्या आणि व्हॉल्व्ह ट्यूब यांनी बनवलेल्या वस्तू तिने समोर ठेवल्या होत्या. सुहासला चटईचे डिझाइन दाखवायला तिला मजा येत होती. आपल्याला सुहाससारखा भाऊ असता, तर किती छान झाले असते, असे वाटून तिला आईचा राग आला. आई वेडी आहे. आपल्याला भावंड नाही. आपण मोठे झाल्यावर असे मुळीच करायचे नाही, असे तिने ठरवून टाकले.
मातीकाम करणा-या मनोजला एक फटका द्यावा, असे कोजागिरीला वाटले. मातीकामात त्याचे लक्ष नव्हते. तो उगाच ती पसरत होता. इकडे तिकडे लावत होता. ‘ही ताई तुम्हाला मुळीच रागावणार नाही. तुमच्यासारखीच आहे ती.’ हे नीता मावशीचे तिची ओळख करून देत असतानाचे शब्द तिला आठवले. आणि तिने तिचे हात आवरले. ‘हं. म्हणे तुमच्यासारखी आहे? का म्हणून मी यांना रागावायचे नाही? केवढा पसारा केला आहे त्याने. नीता मावशीला माझी ओळख नीट करून देता आली नाही’, कोजागिरी धसमुसळ्या मनोजला आवरतांना विचार करत होती. तिसरीतील त्या चार पिट्ट्यांकडे पाहताना तिला ‘साउंड ऑफ मुझिक’ सिनेमामधील आपण मारिया झालो आहे, असेही वाटत होते. दुपारनंतर अनेक वस्तूंना आकार येऊ लागला होता; तशी कोजागिरी खुश व्हायला लागली. नीता मावशीचे आई-बाबा म्हणजे सुहासचे आजी-आजोबा सर्वांकडे जातीने लक्ष देत होते. त्यांची कोजागिरीला मदत होत होती.
कोजागिरीला नीता मावशीने एक सुंदरशी ओढणी भेट दिली होती. ती ओढणी खांद्यावर घेतली की किती तरी दिवस कोजागिरीला आपण कोणीतरी ‘मोठ्ठे’ झालोय, असे वाटत असे. शिबिरातील ती सारी छोटी मुलंही किती तरी वर्षं तिची साथसंगत करत राहिली होती. ‘साउंड ऑफ मुझिक’ची कोजागिरीने पारायणे केली. त्यातील मारिया वेगवेगळ्या अंगाने समजत गेली.