आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोलते व्हा, बोलते करा!!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नियोजित वक्तृत्व, वादस्पर्धात्मक वक्तृत्व आणि उत्स्फूर्त वक्तृत्व अशा तीन प्रकारांबद्दल सविस्तर चर्चा केल्यानंतर या भागामध्ये आपण वक्तृत्वाच्या स्पर्धेपलीकडेही होणा-या उपयोगाबद्दल बोलणार आहोत. स्पर्धा गाजवून पारितोषिक मिळवून झाल्यावर अजून कुठे कुठे या कलेचा उपयोग होईल असा विचार केला तर तुम्हाला काय उत्तर सुचतंय? वाक्चातुर्य, बोलण्यातील प्रसंगावधान, प्रभावी संवादकौशल्य, मुद्दे मांडणे आणि ते पटवून देण्याचे कसब अशा गुणांना वाव कुठे कुठे मिळू शकतो?

सर्वसाधारणपणे विचार केल्यास सभा गाजवणारे राजकीय/सामाजिक नेतृत्व, कंपनीतील उच्च पद, रेडिओ जॉकी, व्यासपीठावरील किंवा टीव्ही चॅनल्सवरील कार्यक्रमांचे निवेदन, सूत्रसंचालन, जाहीर मुलाखत अशा संवादात्मक प्रकारांमध्ये वक्तृत्वकलेचा विशेष उपयोग होतो. खरं सांगायचं तर स्पर्धात्मक वक्तृत्वातील यशानंतर वक्तृत्वकला टिकवून ठेवण्यासाठी आणि अधिकाधिक बहरून येण्यासाठी या क्षेत्रांकडे बघायलाच हवे.

भाषणातील वक्तृत्व आणि निवेदन/सूत्रसंचालनातील वक्तृत्व यामध्ये मोठा फरक आहे. भाषणातील वक्तृत्वामध्ये वक्त्याकडे निर्धारित वेळेपुरती व्यासपीठाची सत्ता असते. त्या आठ-दहा मिनिटांमध्ये तो व्यासपीठाचा राजा असतो. वक्त्याला स्वत:चे मुद्दे एकापाठोपाठ एक मांडायचे असतात आणि फक्त परीक्षकांना (श्रोत्यांचा विचार करणारे स्पर्धक फार कमी असतात हे दुर्दैव! ) प्रभावित करायचे असते. निवेदन अथवा सूत्रसंचालनामध्ये निवेदक/सूत्रसंचालक हा संपूर्ण कार्यक्रमामधला एक छोटाच पण अतिशय महत्त्वाचा घटक असतो. कार्यक्रमाला दिशा देणे, कार्यक्रमाची सुरुवात ते शेवट हा प्रवास सुरळीत होईल याकडे लक्ष देणारा तो एक कुशल वाहक असतो (असायला हवा). जुन्या काळी ‘कार्यक्रमपत्रिकेवरील लागोपाठच्या दोन कार्यक्रमांमधली पोकळी स्वत: किंवा दुस-याने लिहून दिलेल्या ओळी वाचून भरून काढणे’, हेच सूत्रसंचालकाचे मुख्य काम असायचे. उदाहरणार्थ गाण्याच्या कार्यक्रमांमध्ये गाण्यांना, गायकांना प्राधान्य सर्वाधिक. सूत्रसंचालकाने फक्त गाण्यांची घोषणा करण्यापुरताच माइक धरायचा अशी समजूत असायची.

हल्ली मात्र हे चित्र बदलू लागलं आहे. सूत्रसंचालन हेच पूर्णवेळ चरितार्थाचे साधन बनवलेल्या सूत्रसंचालकांनी या क्षेत्राला मान मिळवून दिला आहे. हल्ली कार्यक्रमाबरोबरच ‘सूत्रसंचालक कोण?’ याकडेही संयोजकांचे आणि श्रोत्यांचे लक्ष असते. सूत्रसंचालन करताना कार्यक्रम संपेपर्यंत श्रोत्यांचा कार्यक्रमामधली रुची टिकवून ठेवणे हे सर्वात महत्त्वाचे समजले जाते. अनेकदा कार्यक्रमांइतकीच गुणवान निवेदकाच्या दोन कार्यक्रमामधल्या निवेदनाचीही श्रोते उत्सुकतेने वाट पाहत असतात. अशा वेळी केवळ एका माइकच्या आधारे शेकडो श्रोत्यांशी अनौपचारिक गप्पा मारत त्यांना हसते-बोलते करण्याची कला निवेदकाला जमायला हवी. स्थल-काल-प्रसंगाचे भान ठेवून एखादी आठवण, एखादा विनोद, एखादा किस्सा हे प्रेक्षकांसोबत शेअर करता यायला हवे. समोर बसलेल्या प्रत्येकाची नजर या शून्यकाळात फक्त निवेदकावरच खिळलेली असते, हे भान ठेवायला हवे. मुख्य म्हणजे, दोन कार्यक्रमांमधला दुवा बनतानाच प्रेक्षकांनाही कार्यक्रमामध्ये सहजपणे सामील करून घेणे सर्वात आवश्यक असते. तर आणि तरच कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना प्रेक्षक कार्यक्रमाच्या एकसंध आठवणी घेऊन जाऊ शकतील.

मुलाखतींमध्ये तर वक्तृत्व कलेच्या एका विशेष गुणाचा कस लागतो. तो गुण म्हणजे स्वत: मोजके बोलून समोरच्याला अधिक बोलते करणे! ही संवादकौशल्यामधली सर्वोच्च पातळी आहे. आजवरच्या गाजलेल्या मुलाखती ऐकल्यात तर त्यात पाहुण्याबरोबरच मुलाखतकाराचाही सहभाग तितकाच मोलाचा आहे, हे तुम्हाला जाणवेल. मुलाखत ही कधीही ‘चौकशी’ वाटू न देता अनौपचारिक गप्पा वाटतील इतकी मोकळेपणाने घेता आली पाहिजे.
स्वत:सोबतच इतरांनाही या प्रवासात सामील करून घेण्यातला आनंद हा अनुभवायलाच हवा!

nachiket.xcoepian@gmail.com