आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवजात बाळाला होणारी काविळ

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कावीळ म्हटलं की सर्वांच्याच मनात चिंता वाटायला लागते. आपल्या परिचितांपैकी अनेकांना कावीळ झाल्याचे आपण ऐकतो. त्यापैकी काहीजण अत्यवस्थही होतात. म्हणूनच बाळाच्या काविळीबद्दल थोडी माहिती घेणं आवश्यक आहे.
पुढील मुद्दे समजून घ्या...
जन्मानंतर पहिल्या आठवड्यात होणारी कावीळ ही Physiological म्हणजेच शरीराच्या क्रियांमध्ये होणा-या बदलामुळे होते.
त्यानंतरच्या काळात विशेषत: मोठ्या माणसांना होणारी कावीळ जंतुसंसर्गामुळे जास्त प्रमाणात होते. (Viral Hepatitis)
बाळ जसे मोठे होते त्याबरोबर त्याच्या विविध अवयवांच्या कार्यपद्धतीत सुधारणा होते व नवजात बाळांची कावीळ आपोआप बरी होते.
95% बाळांची कावीळ आपोआप बरी होते व फक्त 5% बाळांची कावीळ बरी होण्यासाठी खास उपाययोजना करावी लागते.
जन्मानंतर पहिल्या आठवड्यात कावीळ का होते?
बाळाच्या रक्तातील लाल रक्तपेशींचे आयुष्यमान तुलनात्मक दृष्टीने कमी असते. तसेच यांचे प्रमाणही जास्त असते. जन्मानंतर या रक्तपेशी जेव्हा मरतात तेव्हा बिलिरुबिन नावाचा घटक रक्तामध्ये निर्माण होतो. साधारण 3 किलो वजनाच्या बाळाच्या शरीरात दररोज 15 मिलिग्रॅम बिलिरुबिन तयार होते. म्हणजे एकूण 20 mg/day एवढ्या बिलिरुबिनचा भार बाळाच्या यकृतावर पडतो. त्याच वेळी पचनसंस्थेतही काही बदल होतात. सुरुवातीला यकृत एवढ्या प्रमाणात असलेल्या बिलिरुबिनवर प्रक्रिया करून शकत नाही. म्हणून कावीळ होते; परंतु जेव्हा यकृताचे काम सुधारते तेव्हा आपोआप कावीळ कमी होते.
काविळीची लक्षणे कोणती?
नैसर्गिक कारणामुळे झालेल्या काविळीमध्ये फक्त त्वचेचा पिवळसरपणा एवढेच लक्षण असते. सुरुवातीला डोक्याच्या बाजूची म्हणजे चेहरा, मान इ. पिवळसर दिसतात व नंतर हात, पोट, पाठ, पाय हे अगदी पिवळसर दिसतात.
डोळ्यांचा पांढरा भागही थोडा पिवळसर दिसतो; परंतु प्रकाशामुळे बाळांचे डोळे फारसे उघडत नाहीत व ते तपासायला त्रास होतो.
बाळाच्या शीचा रंग सुरुवातीला काळपट असतो. तो जेव्हा पिवळसर होतो तेव्हा यकृताचे काम सुरू झाले व कावीळ कमी व्हायला सुरुवात होणार, असे समजायला हरकत नाही.
ही कावीळ धोकादायक कधी ठरू शकते?
नैसर्गिक कारणाने झालेल्या काविळीमध्ये कोणताही धोका नसतो.
अनैसर्गिक कावीळ पुढील काही स्थितीत होऊ शकते आणि जर रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण 20 mg/dl पेक्षा जास्त झाले तर धोकादायक ठरू शकते.
आईच्या व बाळाच्या रक्तगटातील फरक (Rh Incompatiobility)  गर्भाशयात असताना बाळाला काही जंतुसंसर्ग झाल्यास ल्ल  लाल रक्तपेशीतील दोष ल्ल  गुणसूत्रांमुळे होणारे काही आजार ल्ल  जन्मानंतर बाळाला झालेला जंतुसंसर्ग ल्ल  अपु-या दिवसांनी जन्मलेले बाळ ल्ल  यकृतात जन्मत: दोष.
इत्यादी कारणांनी कावीळ जास्त प्रमाणात होऊ शकते.
सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण 20 mg/dl च्या वर गेले तर हे बिलिरुबिन मेंदूवर परिणाम करते. म्हणून ही पातळी 20 mg/dl च्या आत ठेवणे आवश्यक असते.
यावर उपाय कोणते?
नैसर्गिक काविळीसाठी कोणतेही उपाय करण्याची गरज नसते. फक्त सतत लक्षपूर्वक कावीळ वाढत नाही ना हे तपासावे लागते आणि रक्तातील बिलिरुबिनची मात्रा गरज वाटल्यास बघावी लागते.
अनैसर्गिक कावीळ झाल्यास उपचारांची गरज असते.
फोटोथेरपी :
निळ्या/पांढ-या प्रकाशात बाळाला उघडे करून (फक्त डोळे झाकून) ठेवले जाते. यामुळे बिलिरुबिनचे प्रमाण पटकन कमी व्हायला लागते.
वेगवेगळ्या प्रकारची औषधे.
रक्त बदलणे
ज्या कारणामुळे कावीळ जास्त प्रमाणात झाली आहे त्यावरील उपाय (उदा. जंतुनाशक औषधे वगैरे.)
बाळाला योग्य प्रमाणात आहार, पाणी आणि प्राणवायूचा पुरवठा. या सर्व उपाययोजना करण्यासाठी खास सुविधा व तंत्रज्ञान लागते तसेच प्रशिक्षित वैद्यकीय सल्ल्याची गरज असते. (Specialized Neonetal Intensive care unit) म्हणून जर कोणताही धोकादायक परिस्थिती उद्भवू शकेल असे लक्षात आले तर वेळीच अशी सोय असलेल्या ठिकाणी बाळाला ठेवणे चांगले. शेवटी पुढील मुद्दे परत लक्षात घेणे आवश्यक आहे.
नैसर्गिक कारणाने झालेली कावीळ हा कोणताही रोग नाही.  यकृताचे कार्य सुरळीत सुरू झाल्यावर ही कावीळ आपोआप बरी होते.