Home | Magazine | Madhurima | specialy-for-kids

स्पेशल मुलांसाठी

श्वेता मराठे, समुपदेशक | Update - Jun 10, 2011, 02:39 PM IST

पालकांच्या प्रेमाच्या, डोळस स्वीकाराच्या आणि मजबूत आधाराच्या आकाशाखाली फुलणे, वाढणे, बहरणे हा प्रत्येकच मुलाचा जन्मसिद्ध हक्क असतो.

 • specialy-for-kids

  पालकांच्या प्रेमाच्या, डोळस स्वीकाराच्या आणि मजबूत आधाराच्या आकाशाखाली फुलणे, वाढणे, बहरणे हा प्रत्येकच मुलाचा जन्मसिद्ध हक्क असतो. मग त्याला या मुलांचा अपवाद का? पर्यायानं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. जबाबदारी उत्तम निभावण्यासाठी हवे त्या विषयाचे ज्ञान आणि प्रामाणिक प्रयत्न.
  नु कतीच एका मुंजीला गेले होते. घोळक्याघोळक्यांत सगळ्यांच्या गप्पा सुरू होत्या. ‘‘पुण्यात कार्यासाठी हवं तेव्हा कार्यालय मिळणं, मुंबईत जागा मिळणं आणि हव्या त्या शाळेत, कॉलेजमध्ये प्रवेश मिळणं अवघडच... नव्हे, जवळजवळ अशक्य!’’ असं एक वाक्य कानावर आलं. मला इतक्यात कुणाच्या लग्नामुंजीकरता कार्यालय शोधायचं नाही, आश्चर्यकारकरीत्या आम्ही मुंबईत सुखात राहतो आहोत. त्यामुळे वाक्याच्या तिस-या ‘अशक्यप्राय’ भागाबद्दल नकळतच विचार सुरू झाला.
  शिक्षण, शाळा, क्लास, कॉलेज हे सगळे सध्या प्रचंड गोंधळाचे आणि जीवघेण्या स्पर्धेचे बनले आहे. कुठले माध्यम, कुठले बोर्ड, कुठली शाखा यासंबंधी सतत चर्चा सुरू असतात. त्यात इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध असते. या सगळ्या माहितीचा आपण कसा उपयोग करायचा हे अनेकदा कळत नाही. गोंधळ निर्माण होतो.
  टक्केवारीच्या प्रत्यंचेने ताणलेले ‘प्रवेश’ हे शिवधनुष्य होते. या सगळ्या मतामतांच्या गलबल्यात सर्वसामान्य मुले व पालक हरवतातच; पण त्यांच्यापेक्षाही दिशाहीन होतात, शिक्षणाच्या खास गरजा असणारी ‘वेगळी मुले’ आणि पर्यायानं त्यांचे पालक. प्रत्येक घरात लहान बाळाचा जन्म हे एक आनंदपर्व असते. त्याचे खेळणे, बोबडे बोलणे, दुडुदुडू पावले टाकणे, रंग, आकार, अक्षर ओळखणे हा कौतुकाचा विषय असतो. त्या लहानग्याबरोबर सारे घर लहान होऊन जाते... पण काही घरे अशीही असतात की लहान मुलाचे मोठे होणे हा कौतुकाचा कमी आणि चिंतेचा जास्त, असा विषय बनतो. कारणे अनेक असू शकतात. अपुरी शारीरिक, मानसिक, बौद्धिक वाढ, पालकांच्या अपेक्षेपेक्षा कमी वेगाने होणारी प्रगती आणि अनेक गोष्टींमधून दिसून येणारे त्या मुलाचे वेगळेपण पाहून त्या कुटुंबासाठी ते मूल एक मोठे प्रश्नचिन्ह ठरते.
  ‘आमचं मूल नॉर्मल आहे का? ते वेगळं का आहे? ते औषधानं इतर मुलांसारखं होईल का? हे असं झालंच का? ते शाळेत जाऊ शकेल का? कॉलेजमध्ये जाऊ शकेल का? या सगळ्यांची माहिती कोण देईल? कोणती व्यक्ती, संस्था यात मदत करू शकेल? आम्ही नेमकं काय करायला हवं?’ हे असे अनेक प्रश्न त्या पालकांना भेडसावतात. त्यांना मदत व्हावी, या उद्देशाने सुरू झाली आहे ही लेखमालिका.
  ज्या मुलांच्या शैक्षणिक गरजा वेगळ्या आहेत, शारीरिक व भावनिक गरजा खास आहेत अशा मुलांसाठी मी काम करते. मला वाटते, वेगळ्या गरजा असूनही त्या भागवून, समाजात इतर कुठल्याही मुलाप्रमाणे वाढण्यातला आनंद, त्यातली आव्हाने, संघर्ष, यशाची धुंदी, पराभव स्वीकारतानाचे सामंजस्य... हे सगळे अनुभव, ‘जीवन’ नावाचा प्रवास हा या सर्वच मुलांचा अधिकार आहे. पालकांच्या प्रेमाच्या, डोळस स्वीकाराच्या आणि मजबूत आधाराच्या आकाशाखाली फुलणे, वाढणे, बहरणे हा प्रत्येकच मुलाचा जन्मसिद्ध हक्क असतो. मग त्याला या मुलांचा अपवाद का? पर्यायानं ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.
  जबाबदारी उत्तम निभावण्यासाठी हवे त्या विषयाचे ज्ञान आणि प्रामाणिक प्रयत्न. या वेगवेगळ्या समस्यांशी लढा देताना अनेक शस्त्रं उपयोगी पडतात. औषध योजना, वेगवेगळ्या थेरपीज्, रेमिडियल (स्पेशल) शिक्षण, शिक्षणाच्या आणि मूल्यमापनाच्या पर्यायी पद्धती, शासनाने केलेल्या सोयींची जाणीव, व्यवसाय शिक्षणाच्या सोयी, पालकांचे आणि शिक्षकांचे समुपदेशन अशा अनेक बाजूंची मदत यात घ्यावी लागते. वेगवेगळ्या समस्यांचे स्वरूप आणि उपाययोजना, याविषयी आपण थोडं अधिक जाणून घेऊया,
  पुढच्या लेखापासून.

Trending