आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Speech Of Poet N.d, Mahanor, Divya Marathi, E Marathi Sahitya Sammelan

..तर कृषी संस्कृतीसारखीच मराठीही समृध्‍द होईल!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘युनिक फीचर्स’तर्फे www.uniquefeatures.in या वेबसाइटवर आयोजिण्यात आलेल्या चौथ्या
मराठी ई-साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या, 24 मार्च 2014 रोजी नाशिकमध्ये होत आहे.
या निमित्ताने या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या भाषणातील संपादित अंश.


जा।गतिकीकरण, खेड्यांचं वेगाने होणारं शहरीकरण, शहरांचं महानगरीकरण, त्यासोबत पश्चिमेची, युरोप-अमेरिकेची मूल्यंही येत आहेत. झपाट्याने प्रसार होतो आहे. यात प्रसारमाध्यमांचा वाटा फार मोठा आहे. गेल्या 50-75 वर्षांत प्रसारमाध्यमांनी जगभर क्रांतीचं वारं खेळतं ठेवलंय. प्रसारमाध्यमांमुळेच लोकशाहीकरण वाढत गेलंय. अनेक हुकूमशहा हटवले गेले. लोकशाहीचं बळकटीकरण ही फार चांगली गोष्ट आहे; पण जागतिकीकरणाचे किती तरी दुष्परिणामही समोर आले आहेत. त्यांच्यावर खूप लिहिलं-बोललं गेलंय. त्यातला सगळ्यात मोठा धोका लहान लहान संस्कृती जागतिकीकरणात नष्ट होण्याचा. हे कसं थोपवायचं, याचा व्यापक विचार करायला हवा. तो होतच आहे. अशी संमेलनं या विचारांना नक्की बळ देतील.
आपल्या संस्कृतीचा पाया भावना आहे आणि पश्चिमी संस्कृती बुद्धिनिष्ठतेवर अवलंबून आहे. विचार हा तिचा आत्मा आहे. सगळ्या तंत्रज्ञानाच्या, जागतिकीकरणाच्या मुळाशी हीच बुद्धिनिष्ठता आहे. आपण बुद्धिनिष्ठतेचा स्वीकार करायला हवा. विचारांना अधिक खोलात जाऊन स्वीकारायला हवं. पण त्यामुळे त्यात आपली संस्कृती नष्ट होणार नाही, याचंही भान ठेवायला हवं. आणि हे काम म्हणजे, आपल्या नव्या पिढीसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. ते थेटपणे स्वीकारलं तरच जागतिकीकरणात आपला निभाव लागेल. शेवटी लोकशाही टिकणं आणि माणूसपण टिकणं यातच खरं सार्थक आहे. हे माणूसपण बुद्धी आणि भावना आणि विवेकातून आलं पाहिजे. 1940चं दशक हे स्वातंत्र्यपूर्व आदर्शवादाचं होतं. साहजिकच त्या काळी लिहिल्या गेलेल्या साहित्यावर त्या आदर्शवादाची गडद सावली होती. स्वातंत्र्य, नीती, गांधीवादी आदर्श विचारसरणी, मानवाबद्दल आणि मानवतावादाबद्दल रोमँटिक दृष्टिकोन ही त्या काळाची सूत्रं होती. मात्र, त्याच काळात नवकथेची आणि नवकवितेची बीजं दिसू लागलेली होती.
बा. सी. मर्ढेकरांसारखा मूळ मराठी कवितेची धारणा मनापासून बदलणारा क्रांतिकारी कवी आणि रूढ मराठी कथेचा आशय, रूपबंध आणि भाषेत आमूलाग्र बदल घडवून आणणारा गंगाधर गाडगीळांसारखा नवकथाकार, हे याच काळात नवा विचार घेऊन लिहू लागले होते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाला एक प्रकारचं दुभंगलेपण, निराश एकाकीपण नागरसंस्कृतीत वाढत चाललं होतं. मध्यमवर्गाची जगण्याच्या प्रवाहातली अगतिकता वाढत होती. हे वास्तव स्वातंत्र्यपूर्व काळातील आदर्शवादातील काळापेक्षा विलक्षण जिवंत व प्रत्यक्ष होतं. त्या काळातील वास्तवाशी थेट भिडणारं साहित्य आकार घेऊ लागलेलं होतं. व्यंकटेश माडगूळकरांसारखा ग्रामीण वास्तवाचा अत्यंत प्रभावी वेध घेणारा कथाकारही याच काळात उदयास येत होता. 1950-60च्या दशकात हे लेखक, कवी व त्यापासून निघालेलं साहित्य प्रत्यक्ष होतं. ते अधिक प्रौढ व परिपक्व होतं. यातूनच पुढे शंकर पाटील, उद्धव शेळके, कमल देसाई, बाबुराव बागूल असे अनेक समर्थ लेखक निर्माण झाले. जी. ए. कुलकर्णी यांचं साहित्य म्हणजे या सगळ्यांवर कळस होता.
1960नंतर मराठी साहित्याने आणखी एक वळण घेतलं. त्यात भाऊ पाध्ये, अरुण कोलटकर, दिलीप चित्रे, भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर यांनी फारच महत्त्वाचं साहित्यसर्जन केलं. 1970 नंतर दलित साहित्याची चळवळ व ग्रामीण साहित्याची चळवळ यांनी मराठी साहित्यविश्व ढवळून काढलं. नामदेव ढसाळांसारखा दलित कवितेचा अग्रणी कवी मराठीतच नाही तर सबंध भारतीय साहित्यात एक मॉडेल बनला. 1975-80नंतर स्त्रीवादी साहित्याची चळवळही आकाराला आली.
सशक्त वास्तववादी आणि अंतर्बाह्य असा नवा रूपबंध व विचार घेऊन अनेक स्त्री लेखकांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली. आजही सर्व क्षेत्रांना वेटोळं घालणारं खूप दर्जेदार नवं लेखन त्यांच्या लेखणीतून लिहिलं जातंय. हे यासाठी मुद्दाम सांगतोय, की कथा, कविता, कादंबरी, समीक्षा, चरित्र, आत्मचरित्र व साहित्य चळवळींनी माझ्यावर खोलवर संस्कार केले, पोषण केलं. या ग्रंथांशी, लेखक-कवी-कलावंतांशी मी संपूर्ण एकसंध झालो. चर्चा-परिसंवाद व वादविवादातून स्वत:ला तपासून घेत आपल्यातलं न्यून आपणच काढलं. आपल्याला आपण तपासून घेऊन आपल्यातलं थिटं आपल्याला काढून टाकता आलं नाही तर ख-या अर्थाने लेखनात पुढे जाताच येणार नाही, अशी माझी समजूत आहे. यात आपल्या चांगल्या-वाईटाची चिरफाड व शुद्ध-सकस काय ते सांगणारे मित्र, सवंगडी मिळाले. मी लिहीत गेलो.
आज मराठी साहित्याची स्थिती कशी आहे? येणारी प्रत्येक पिढी ही आपल्या आधीच्या पिढ्यांच्या विरोधात बंड करून उभी असतेच; मात्र, तिला चिंतनाचा गाभा नसेल तर ती निव्वळ स्थान घेण्यासाठीच आहे की काय, असा संभ्रम निर्माण होऊ शकतो. आजचे प्रश्न बदलले आहेत. ते अधिक व्यापक, गुंतागुंतीचे आणि सामाजिकतेपेक्षा अधिक राजकीय झाले आहेत. याचा शोध घेऊन सर्जनाच्या पातळीवर जास्त समर्थ साहित्यनिर्मिती करणारे, वास्तवाची अधिक प्रभावी निर्मिती करून साहित्य सुप्रतिष्ठित करणारे लेखक-कवी निर्माण होतील, अशी आशा करायला हरकत नाही. समाजाला, रसिकांना, साहित्यिकांना संमेलनं हवी आहेत, ही चांगली बाब आहे. इतिहास बघितला तर त्यातूनही खूप काही चांगलं मिळालेलंच आहे. परंतु बदलत्या सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थितीचं खेडी, शेती, पाणी व तिथल्या सामान्य माणसांना, शेतकरी-शेतमजूर यांना भेदरवून टाकणारं, पुन:पुन्हा पडणा-या दुष्काळाने उद्ध्वस्त होऊ घातलेलं ग्रामीण जीवन; त्या जीवनाचं, प्रश्नांचं, पाणी-पर्यावरण व जागतिक स्तरावरच्या प्रश्नांचं, वास्तवाचं प्रतिबिंब नसेल तर ते टिकणार नाही.
या सगळ्या विचारांशी बांधिलकी ठेवून गंभीरपणाने संमेलनं हवीत, हीच समाजाची अपेक्षा आहे. उत्सव जरूर हवा; पण या परिस्थितीच्या परिवर्तनाचं त्यांचं साहित्य, भाषा, बोलीभाषा, त्यात भाषेचा सकसपणा, पोत व वृद्धी असं सगळंच आज हवं. जमिनीतील पाणी, जमिनीतील सत्त्वं आणि जमिनीतील जी काही शक्ती असेल ती घेऊन, पिऊन जमिनीतून भक्कम व सुंदर अशी पीकसृष्टी-वनश्री उभी राहते, नव्याने वाढतच जाते, वृद्धिंगत होत असते; तसंच साहित्य, त्यातले अनुभव, भाषा एकसंध, जिवंत होऊन आले पाहिजेत. मराठी मनाचा, भाषेचा, बोलीभाषेचा व बदलत्या जीवनाचा तळ संपूर्ण ढवळून या कृषी संस्कृतीसारखीच मराठी समृद्ध होईल-उत्कर्ष पावेल. आज वाडी-वस्तीतून, खेड्यातून, लहान लहान जाती-जमातींतून, ज्यांनी कधी शब्दच गिरवला नव्हता त्यांच्यातून चांगले लेखक, कवी, विचारवंत येत आहेत, याचा आनंद व अभिमान आहे. हे मोठंच परिवर्तन आहे.