आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंददायी क्रीडायात्रा !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात आयपीएल सामने अत्यंत उत्साहाने पाहणार्‍या क्रिकेट चाहत्यांच्या नवीन पिढीला सी. के. नायडू, डॉन ब्रॅडमन ही नावे व त्यांनी केलेली कामगिरी किंवा 1880 मध्ये भारतात महिलांनी क्रिकेट खेळणे सुरू केले होते, या बाबी विशेष महत्त्वाच्या वाटत नसतील किंवा त्यांच्या खिजगणतीतही कदाचित नसतील.
भारताचा खेळाच्या मैदानावरचा इतिहास खूप अभिमानास्पद नसला तरीही विविध खेळांमध्ये काही चमू व काही खेळाडूंनी देशातील व देशाबाहेरील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये आपली नावे वेळोवेळी चमकवली आहेत. बोरिया मजुमदार लिखित ‘स्पोर्टिंग टाइम्स’ हे पुस्तक विविध खेळांचा व मोठ्या घटनांचा आढावा घेत खेळ व क्रीडा पत्रकारिता गेली 175 वर्षे (1838-2013) भारतात कशी नवनवीन वळणे घेत विस्तारत गेली हे सांगतेच; शिवाय ध्यानचंद असो वा मुंबईची त्या काळातील अत्यंत लोकप्रिय अशी पेंटाग्युलर क्रिकेट स्पर्धा असो, किंवा भारतातील सुरुवातीचा नावाजलेला बुद्धिबळपटू सुलतान खान (1930) असो, यांची दखल घेत वाचकांना खिळवून ठेवते.
हे असे पुस्तक आहे, ज्याचे कुठलेही पान उघडून वाचन सुरू करता येते. काही पाने वाचल्यानंतर पुस्तक बाजूला ठेवून पुन्हा दोन दिवसांनी उचलून तेवढ्याच आनंदाने पुन्हा वाचन सुरू ठेवता येते.
बोरिया मजुमदार हे भारतातील एक नावाजलेले क्रीडा तज्ज्ञ आहेत व क्रीडा-इतिहासकार आहेत. याआधी त्यांनी भारताचा ऑलिम्पिक इतिहास यावर खूप संशोधन करून सुंदर असे पुस्तक तीन वर्षांपूर्वी लिहिले होते. प्रस्तुत पुस्तक काहीच दिवसांपूर्वी प्रकाशित झाले आहे. टाइम्स ऑफ इंडियाची 175 वर्षांची क्रीडा पत्रकारिता यावर मजुमदार यांनी प्रकाश टाकत खूप जुन्या व रोचक घटनांना ताजे करत त्या जशास तशा वाचकांपर्यंत आणून ठेवल्या आहेत.
मी स्वत: 1982-83पासून फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राच्या माध्यमातून क्रीडा पत्रकारिता सुरू केली व विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे अनेक वर्षे वृत्तांकन केले. मला ऑस्ट्रेलियाला जाऊन सर डॉन ब्रॅडमन यांना त्यांच्या घरी भेटण्याचा (1992) जो सुवर्णयोग प्राप्त झाला होता, तो माझ्या क्रीडा पत्रकारितेमुळेच. खेळांवरील माझे जुने प्रेम व क्रीडा पत्रकारितेतील तेव्हाचे काही सोनेरी क्षण या पुस्तकाद्वारे मला पुन्हा जागवता आले.
भारत स्वतंत्र होण्यापूर्वीपासून देशात क्रिकेट व इतर खेळ स्वत:च्या आनंदासाठी व निर्व्याज प्रेमापोटी खेळले जात असत. पुस्तकात सर्वात पहिला ‘रिपोर्टेड’ क्रिकेट सामना 1840च्या जानेवारी महिन्यातील आहे, जो बंगालमध्ये दमदम क्लब विरुद्ध बरॅकपूर क्रिकेट क्लबमध्ये झाला होता. क्रिकेटनंतर लगेचच त्या काळच्या ‘बॉम्बे टाइम्स जर्नल ऑफ कॉमर्स’ने (टाइम्सचे हे नाव 1861मध्ये बदलले) फेब्रुवारी महिन्यात (1839-40) पहिल्या घोडदौडीचा (हॉर्स रेसिंग) छोटा रिपोर्ट त्या वेळच्या कलकत्त्याहून प्रकाशित केला होता. तो काळ ब्रिटिश राजवटीचा असल्याकारणाने मुंबई व कलकत्ता येथे नियमितपणे इंग्रज लोक (अर्थातच तेव्हाची मातब्बर मंडळी) हा खेळ लोकप्रिय बनवत होते. रॉयल कलकत्ता टर्फ क्लब तेव्हा अस्तित्वात आला होता, जो आजही रेसच्या वेळी मोठी गर्दी खेचतो.
अशा अनेक जुन्या स्पर्धा किंवा सामन्यांच्या वार्तांकनापासून त्या काळात लोक खेळांना कसे प्राधान्य देत, तसेच वृत्तपत्राच्या संपादकांना पत्र लिहून समाजात खेळ व क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी आग्रह करत, याबाबतची जुनी कात्रणे तशीच प्रकाशित करून वाचकांना इतिहासात डोकावण्याची संधी हे पुस्तक देते.