आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैं जिंदगी का साथ निभाता चला गया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून हसत हसत वास्तव स्वीकारणारे मला जास्त ‘हीरॉइक’ वाटतात. वर्तमानाशी झगडत भविष्यकाळ सुंदर करू पाहणाऱ्या या ‘रिअल लाइफ हीरोज’चं म्हणूनच मला खूप खूप जास्त कौतुक वाटतं...

गोष्ट आहे तशी साधीच. आपल्या रोजच्या माहितीतली. गोष्टीचा नायक, अगदी आपल्यातला कोणीही. सकाळी उठून लोकल पकडून ऑफिस गाठणारा. कॉर्पोरेट कंपन्यांचं कोरडं कल्चर वागवत फिरणारा. संध्याकाळी गर्लफ्रेंडला किंवा बायकोला भेटण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारा. त्याच्या दिवसाची सुरुवात होते, संध्याकाळी ‘तिला’ कुठे भेटायचं, ‘तिला काय काय सांगायचं’, ह्याचं प्लॅनिंग करण्यापासून आणि हा रात्री झोपतो, पुन्हा ‘अरे देवा, उद्या परत ऑफिस!!!’ असं म्हणत म्हणत. शनिवार-रविवारचं याचं शेड्युल पक्कं असतं. जवळच्या मित्र- मैत्रिणींसोबत मज्जा.. खरं तर ऐश करायची. चंगळ करायची. सगळं फ्रस्ट्रेशन तेवढ्यापुरतं भिरकावून द्यायचं आणि मग पुन्हा.. “ मै जिंदगी का साथ निभाता चला गया; हर फिक्र को धुए में उडाता चला गया...”
वरवर पाहता बऱ्याच जणांना वाटेल की हे तर काय, आपलंच आहे की! कित्येक आईबाबांना वाटेल, की यात कौतुक करण्यासारखं काय आहे? हातात पैसा येतो या मुलांच्या पटकन, उडवायला हे मोकळे! अतिशय बेजबाबदार पिढी, चंगळवादी वृत्ती, बेदरकारपणा अंगात मुरलेला, काही सिरियसली घ्यायला नको... आमच्या वेळी...!!!!! त्यांच्या जागी त्यांची तक्रार योग्यच असते म्हणा. पण मला मात्र थोडं वेगळं काही सांगायचंय. एक वेगळीच बाजू या मित्रांकडे पाहिल्यावर जाणवली. ती मांडायचीय.
यांच्यापैकी कित्येक जण हे आत्ता जे काम करतायत, जो जॉब करतायत, तो त्यांना मनापासून पसंत नाहीये. कदाचित यांचे छंद वेगळे होते, स्वप्नं वेगळी होती. त्यांना आयुष्यात वेगळंच काही करून दाखवायचं होतं. बनून दाखवायचं होतं. पण... असं घडलं मात्र काहीच नाही. प्रत्येक वेळेस आपल्याला हवं तेच, आणि हवं तसंच घडतं, असं नाही. प्रत्येक वेळेला आयुष्य एक नवं आव्हान देत असतं आपल्याला पार करण्यासाठी. नाही पूर्ण होत प्रत्येकाची स्वप्नं. नाही प्रत्येकाला मिळत आपल्या मनासारखे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य... यातले अर्धे लोक आज इंजिनिअरिंग करून, मग एम.बी.ए.ची डिग्री घेऊन एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत सरधोपट चाकोरीचा जॉब करतायत. त्यांना ते फार आवडतंय, अशातला भाग नाहीये. पण त्यांनी हे स्वीकारलंय. काही पर्याय नाही म्हणून स्वीकारलंय. स्पर्धेच्या युगात टिकून राहायलाच हवं, म्हणून स्वीकारलंय. टोकेरी पिअर प्रेशरमुळे स्वीकारलंय...
त्यांच्यापैकी काही जणांच्या आईबाबांना असंही वाटतं की, आपली मुलं ‘लाइनवर’ आलीयेत. “छंदबिंद ठीक आहेत आपापल्या जागी, पण त्याने काही पोट भरत नाही. चार जणांच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायची म्हणजे नोकरीचा विचार आधी. मग पगार, गाडी, घर, लग्न, मुलीकडच्यांच्या अपेक्षा...” आलेच आहेत ते लाइनवर. आपापल्या स्वप्नांना, इच्छांना तिलांजली देऊन. आपलं आयुष्य एका वेगळ्याच साच्यात मापून. पार पाडतायत रोजचा दिवस आपल्या घरच्यांना खुश पाहण्यासाठी. झगडतायत रोजच्या रोज स्पर्धेत टिकून राहण्यासाठी. आणि झगडतायत स्वतःच स्वतःशीच...
आपण अनेक चित्रपटांमध्ये बघतो, हीरो शेवटी ‘अपने दिल की सुनो’ म्हणत आपल्या स्वप्नांना गवसणी घालतो. ‘वेक अप सिड’ पाहिला असेल सगळ्यांनी. त्यातला नायक ‘वाया गेलेल्यात’ जमा असतो. नायिका त्याला त्याची पॅशन शोधायला मदत करते. आणि तो त्याच्या छंदामध्येच त्याचा जॉब शोधतो. त्याला त्याचा मार्ग सापडतो. ‘अपने दिल की सुनो...’
मी स्वतः मला मनापासून जे काम आवडतं, ते करते आहे. त्यात कितीही दमले तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा शूटिंगसाठी निघण्याचा उत्साह माझ्यात असतो. माझी पॅशन हाच सुदैवाने माझा व्यवसाय आहे. आणि जर मला हे करता आलं नसतं, तर ते वास्तव मी तरी समजूतदारपणे स्वीकारू शकले असते, असं मला नाही वाटत. खरंच! कोणतीही तक्रार न करता एकाच पद्धतीचं, सरधोपट सर्वसामान्य आयुष्य जगत राहणं खूप कठीण आहे. म्हणून यातला प्रत्येक जण मग स्वतःच स्वतःचं मोटिव्हेशन शोधतो. कोणी महागड्या फोनमध्ये, कोणी शनिवार- रविवार बाहेर जेवायला जाण्यामध्ये. कोणी मॉलमध्ये जाऊन नव्या कपड्यांची खरेदी करण्यामध्ये, तर कोणी ई.एम.आय.वर गाडी घेऊन आपल्या आवडीची गाणी ऐकत लाँग ड्राइव्हवर जाण्यामध्ये. वरवर या चैनीच्या गोष्टी वाटतील कदाचित, पण त्यामागची कारणं मात्र वरवरची किंवा बेजबाबदार नक्कीच नाहीयेत.
चित्रपटाचा शेवट गोड होतो. ‘लाइनवर’ आलेल्या हिरोला त्याच्या आयुष्याचं साध्यही मिळतं आणि त्याची हीरॉइनही मिळते. पण प्रत्यक्ष आयुष्यात सगळं इतकं सहजसोपं नसतं. म्हणून स्वतःचं स्वप्न बाजूला ठेवून हसत हसत वास्तव स्वीकारणारे माझे हे सगळे मित्र मला जास्त ‘हीरॉइक’ वाटतात. वर्तमानाशी झगडत भविष्यकाळ सुंदर करू पाहणाऱ्या या ‘रिअल लाइफ हीरोज’चं म्हणूनच मला खूप खूप जास्त कौतुक वाटतं..!!!
spruhaniya@gmail.com