आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझ्या \'आतली मी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुन्या उन्हाळ्याच्या सुट्यांची आठवण येतेय. पण डोळे मिटून आठवायचा प्रयत्न केला, तर सलग एक फिल्म नाही दिसत. तुकडे तुकडे दिसतायत. मोंताज!! त्याला काही टाइमलाइनही नाहीये. कुठूनही कशीही दृश्यं.

साधारण आठवी किंवा नववीचं वर्ष. शाळेबाहेर सगळे मित्रमैत्रिणी धमाल करतायत. चिंचा, कैऱ्या, बोरं, आवळे, बर्फाचा गोळा... नुकताच शेवटचा पेपर झालाय. तो विज्ञान/भूमिती असेल तर बहुतेक जण आपले वाईट चेहरे बर्फाच्या थंड गोळ्याआड दडवतायत. रिझल्टपर्यंत या विषयांची आठवणही नको... चित्रकला/ कार्यानुभव असेल तर व्वा! यंदा देवच पावला... शाळेचा शेवटचा दिस गोड झाला! मी या सगळ्यात आहे, पण थोडी बाहेरपण. मला नुकत्या नुकत्या कविता सुचायला लागल्यात. आणि त्या सुचण्याचं कारण माझ्या समोरच आहे... त्यालाही हे कळतंय. पण म्हणजे नेमकं काय, ते आम्हाला कळत नाहीये... आम्ही एकमेकांसोबत ‘असणं’ एन्जॉय करतोय. काहीतरी फुलपाखरासारखं वाटतंय. म्हणजे कसं कोण जाणे! पण कवितेत असंच असतं न!

आता मी लहान आहे. अगदी दुसरी-तिसरीत. आजोबा मला स्केटिंगला घेऊन जातात. सकाळी सकाळी सात वाजता. मी स्केट्स बांधून धडपडते. आजोबा कळवळतात. मला ते कळतं. मी रडल्यासारखं करते. पण मला धरायला ते पुढे येत नाहीत. मला तेही कळतं. मग मात्र मी एकटी उठते. कुणाचीसुद्धा मदत न घेता. तोल सावरते. हळूहळू ग्रीप घेत सराईतपणे चकरा मारायला लागते. आजोबांचे हसरे डोळे मला दिसतात. मग आम्ही कॉर्नरच्या इराण्याच्या हॉटेलमध्ये जातो. भरपूर बटर लावलेला ब्रूनमस्का आणि ऑम्लेट खातो पोटभर. माझ्या ब्रेडवर आजोबा जास्तीचं जॅम बटर लावतात. आजचं बक्षीस! मग मी त्यांना काहीही सांगते, काहीही! आणि तेसुद्धा जगातली त्या क्षणी सगळ्यात महत्त्वाची समस्या जर कुठली असेल तर ती हीच, इतक्या सिरियसली ते सगळं ऐकतात. मग आम्ही शहाळ्याचं पाणी पितो. आणि मग मारुतीच्या देवळाच्या गल्लीतून तिथल्या पिवळ्या झाडाची खाली पडलेली फुलं उचलत नाचत नाचत घरी येतो. हां... मारुतीला रोज ‘हाय’ केलंच पाहिजे. कसं छोटंसं घर आहे त्याचं. आपल्यापेक्षाही छोटं. त्याला कंटाळा येत असणार आपण हाय नाही केलं तर.. मग त्याला ‘हाय’ करूनच पुढचा रस्ता... आजोबा गेले मी पाचवीत असताना. नंतर मला ती मारुतीच्या देवळाची गल्लीही आवडली नाही, पिवळ्या फुलांची झाडंही, आणि तो मारुतीही. भीतीच वाटायला लागली त्यांची. आजही इतक्या वर्षांनंतर मी शक्यतो त्या गल्लीतून जात नाही.
दहावीच्या परीक्षेनंतरची मोठी सुट्टी. आता मी जर्मनीत आहे. स्टडी टूरसाठी. बर्लिनची वॉल बघते, नाझी छळछावण्यांच्या रेकॉर्ड‌्स बघते. नंतर पॅरिसचा आयफेल टॉवर, अॅमस्टरडॅमला अॅन फ्रँकचं घर, बेल्जियमची राजेशाही चर्चेस, सगळं मनात साठवून घेते. अल्बर्ट आणि मारिया राह्याक नावाच्या प्रेमळ जर्मन कुटुंबात त्यांच्या घरातली होऊन जाते. बर्लिनच्या रस्त्यावर ‘ढोल बाजे’वर डान्स करून चक्क टोपी फिरवून मिळालेल्या १० डॉलर्समध्ये आमचा ग्रुप जिवाची जर्मनी करतो... पण या सगळ्यात मी नाहीये. असूनही नाहीये. कारण माझं मन अडकलंय एका परीकथेतल्या शहरात. हायडलबर्गमध्ये... बाकीचे सगळे कधीच पुढची ट्रीप एन्जॉय करू लागलेसुद्धा. पण मी तिथेच आहे. तिथल्या छोट्या छोट्या घरांमध्ये. इवल्याशा वाटांमध्ये, कित्येकशे वर्षांपूर्वीच्या किल्ल्यामध्ये. सगळ्या ऐकलेल्या, वाचलेल्या परीकथा माझ्याभोवती पिंगा घालायला लागतात. आणि मी हीरॉइन असते त्या गोष्टीची. आत्ता कुठल्याही क्षणी माझा राजपुत्र येणार, पांढऱ्या घोड्यावरून दौडत दौडत...आत्ता...!! माझ्या डोळ्यात पाणी येतं. पण ते रडू नाहीये, हे मला कळतंय. मला खूप जास्त छान वाटतंय. चित्रकलेच्या तासाला ‘निसर्गचित्र’ म्हणून काय काय काढतो आपण.
एक छोटं घर, बाजूला एक सावलीचं झाड, वळणाचा रस्ता, नागमोडी नदी, मागे डोंगर, आणि डोंगरामागे सूर्य; हसरा... ते चित्र समोर आहे माझ्या. आणि त्या चित्रात नकळत कोणीतरी मलाही रंगवलंय. त्या शांतपणात माझ्या जाण्याने एक छोटासा तरंग उठतो, आणि बाकी सगळं पुन्हा शांत, सौम्य, गूढ... पण अतिशय सुंदर. उन्हाळ्याच्या सुटीच्या माझ्या या तीन आठवणी. त्या रोजच्या रोज आठवतात, असं काही नाही. पण जेव्हा जेव्हा आठवतात न, तेव्हा तेव्हा माझ्या आतली जुनी ‘मी’ मला नव्याने भेटवून जातात. आणि स्वतःशीच स्वतःची अशी भेट होणं यासारखं सुखद दुसरं काहीच नाही.

spruhaniya@gmail.com