आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डोंगराएवढ्या माणसांची शिदोरी !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेले काही दिवस फार विचित्र अनुभव येतायत मला.. प्रसंग पहिला : करिअरची नवी नवी सुरुवात. कोणीच ओळखी-पाळखीचे लोक आसपास नाहीत. टक्के टोणपे खात स्वत:ला सिद्ध करायची धडपड चाललेली... नव्या क्षेत्रात उतरण्याची भीती, आणि स्ट्रगलचा चकवा.. आसपास काही मातब्बर लोक. असे अनुभवी मातब्बर लोक.. नवीन माणसाला या चकव्यातून बाहेर पडायला मदत न करणारे. एका सुप्रसिद्ध दिग्दर्शकाने मला सांगितलं होतं, ‘तू ना हिरोईनसारखं वागत नाहीस. तिच्याकडे एक attitudeपाहिजे.. तू टिकणार नाहीस फार. सेटवरच्या सगळ्या माणसांशी हे असं नसतं वागायचं हीरोइनने...’ मी दडपून गेले. ‘हे असं म्हणजे??’ माज करत फिरली, सतत नखरे केले, म्हणजे हीरोइन चांगली? बाकी मी काम कसं करते, किती प्रामाणिक आहे, भूमिका समजून घेते का नाही, याला काही महत्त्व नाही?? मी जपून जपून त्याला हे विचारत राहिले. त्यावर तो म्हणाला, ‘अगं किंमत नाही ठेवत मग कोणी...’
कमाल आहे बुवा! ‘यूही हम दिल को साफ रखा करते थे, पता नही था की किमत चेहरे की होती है!’ (हे तेव्हा नव्हतं सुचलं वाक्य, आता मागाहून आलेलं शहाणपण आहे) गंमत राहू दे, पण इंडस्ट्रीने मला दिलेला हा पहिला कानमंत्र होता.
माझ्या पक्का लक्षात राहिलेला, पण मी कधीही न पाळलेला...
प्रसंग दुसरा- एका कुठल्या तरी वेबसाइटने माझं नाव वापरून भलतीच गोष्ट अपलोड केली होती. एका मित्राच्या ते लक्षात आल्यावर नाना खटपटी करून त्याने ते प्रकरण नीट सांभाळलं. पण मनस्ताप व्हायचा तो झालाच. त्यावर तो म्हणे, ‘तू याच्याकडे उत्तम साईन म्हणून बघ गं, दुसर्‍या देशातल्या कोणा वेबसाइटला तुझं नाव वापरलं की त्यांच्या हिट्स वाढतील असं वाटत असेल, तर तुझी popularityबघ न कितीये...’ त्याच्या माझ्यावरच्या प्रेमाचा भाग सोडून देऊ, पण मी मात्र हलले या गोष्टीमुळे. एकीकडे वाटत होतं, आपल्याला बरं का वाटत नाहीये या प्रतिक्रियेमुळे? आपली ओळख नेमकी काय?

प्रसंग तिसरा - माझ्या कामाचं माझ्या तोंडावर प्रचंड कौतुक करणारे एक दिग्दर्शक खासगीत एका पार्टीत म्हणाले, ‘ही हीरोइन मटेरियल नाय रे. फिल्म्समध्ये नाही चालणार ही मुलगी. तिच्यात ‘ते’ नाही!’ आधी खूप वाईट वाटलं मला; पण हळूहळू शांतपणे थांबून पाहायला लागले. ही किमया आमच्या ‘तिसरी गोष्ट’च्या पटकथाकार संदेश कुलकर्णीची. संदेशदादाने आमच्या मालिकेत एकदा एक फार सुंदर संवाद लिहिला होता... मोठे बाबा ईशाला सांगतात, ‘मला जेव्हा एखादी गोष्ट कळत नाही न, तेव्हा उत्तर शोधायची मी घाई नाही करत; मी वेळ घेतो, त्या गोष्टीपाशी थांबतो, आणि मग ती गोष्ट आपोआप उमलत जाते...’ मीही थांबले, हळूहळू शांतपणे पाहायला लागले, तशी नव्याच गोष्टी उलगडत गेल्या समोर.

पहिला प्रश्न मी स्वत:ला विचारला की, ‘चांगली अभिनेत्री’, की ‘लोकप्रिय नटी’ नेमकं काय बनावंसं वाटतंय आपल्याला? प्रसिद्धी, पैसा, यश हे सगळं तर हवंच आहे. मग हा dilema का येतो? माझी आई नेहमी म्हणायची, अजूनही सांगते; लोकप्रियता हाताळणं हे फार कष्टाचं काम आहे. येरागबाळ्याला नाही जमत ते... पावलापावलावर तिचं हे सांगणं किती यथार्थ आहे हे जाणवत राहतं.

असे खूप मित्रमैत्रिणी पाहिलेत मी आमच्या क्षेत्रात, हे लोकप्रियतेचं भूत न पेलवणारे. वेगळंच वागणारे.. आपल्याला तसं व्हायचं नाही. पडद्यामागे अभिनय करता करता ‘कट’ म्हटल्यानंतरही अभिनय करत राहणारे. अशा खोट्या मांदियाळीत आपल्याला जायचं नाही. नाही व्हायचं आपल्याला मोठ्ठी हीरोइन. बरं माणूस होता आलं तरी पुरे. हळूहळू जसं काम करत गेले, तसं एक एक डोंगराएवढी माणसं भेटत गेली. पडद्यामागची कामं करणारे कामगार, तंत्रज्ञ यांच्यासाठी जीव टाकणारी कित्येक मंडळी. त्यांचं भलं व्हावं म्हणून तीळतीळ तुटणारी... कोणी सगळ्यांचा विमा काढून द्यायचं काम अंगावर घेतलेलं, तर कोणी त्यांना सुग्रास जेवण मिळावं म्हणून धडपडणारं. कोणी त्यांच्या कामाचे तास कसे आटोक्यात राहतील यासाठी आकाशपाताळ एक करणारं, तर कोणी नुकत्या हातात आलेल्या तुटपुंज्या नाइटचं अख्खं पाकीट लाइटमनच्या हातात सुपूर्द करणारं...

या माणसांना भेटल्यावर आसपासच्या लोकांकडे बघण्याची पद्धतच बदलली. माणसाकडे माणूस म्हणूनच बघायला पाहिजे, हे कळलं. मनापासून हसल्यामुळे काय कमी होतं आपलं? एखाद्याशी प्रेमाने बोललो, तर कितीशी पत कमी होते? हे एकदा लक्षात आल्यानंतर मग हे आपली इंडस्ट्रीत किंमत किती,’ असले फिजूल प्रश्न पडेनासेच झाले... खूप नवे नवे मित्र मिळाले. स्पॉटबॉईज, हेअरड्रेसर्स, मेकअपमेन, लाइट दादा किती तरी मित्रमैत्रिणी. आपली माणसं झाली, एका हाकेला धावून येतील अशी. नवी कामं मिळतील, तितका विश्वास आहे माझा माझ्यावर. पण ही माणसांची जंगी फौज या कशाहीपेक्षा फार म्हणजे फारच मोलाची आहे. विचित्र अनुभवांची ही किंमत मोजून जे संचित मिळालंय, ते मात्र खरोखरच अनमोल असंच आहे. प्रवास चालूच आहे. वाट धुंडाळणं चालूच आहे. तहानलाडू भूकलाडू म्हणून ही अशी शिदोरी आहे सोबत.. मनात एकच धरून चाललेय,
कुण्या गावातली ती वाट होती पोरकी,
तिला ठाऊक नव्हती चाल दुसरी बेरकी;
दिगंताचे तिला अदमास नव्हते नेमके,
हसायचे कशासाठी तिने मग नाटकी..!!