आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sriranjan Awate Artical On 'Final Solution Documentary'

मगर तुम हमारे लहू से न खेलो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नव्वदनंतर माध्यमांचा प्रस्फोट झाला आणि जनमत ठरवण्यात माध्यमे निर्णायक भूमिका बजावू लागली. प्रतिमानिर्मिती आणि प्रतिमाहनन या दोन्ही बाबी सहजपणे केल्या जाऊ लागल्या. त्यात सोशल मीडियाचा आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा मोठा वाटा आहे. परंतु माध्यमांमधून मिळणा-या संमिश्र, तर काही वेळा विरोधाभास निर्माण करणा-या वृत्तांकनामुळे युवावर्ग गोंधळलेला आहे. या युवावर्गाचे विकास आणि गव्हर्नन्स याविषयीचे आकलन चुकीचे आहे. विरोधातली भूमिका ही विशिष्ट व्यक्तीच्या (ताज्या संदर्भात नरेंद्र मोदींच्या) विरोधातली भूमिका नसून ती एका विचाराच्या विरोधातली भूमिका आहे, याचे भान आजच्या सोशल मीडियाफ्रेंडली पिढीला राहिलेले नाही. त्यातूनच विद्वेषाची भावना समाजात रुजत चालल्याचे वास्तव आकारास येत आहे. माणसाला माणसापासून तोडणारी ही विद्वेषाची भावना रुजते कशी, हे जाणून घेण्यासाठी अलीकडे पुणे फेस्टिवलमध्ये दाखवला गेलेला ‘फायनल सोल्युशन’ हा माहितीपट समजून घेणे गरजेचे आहे.
हा माहितीपट 2002मध्ये झालेल्या गुजरात दंगलीवर बेतलेला आहे. साबरमती एक्स्प्रेसमध्ये हिंदूंचा एक डबा मुस्लिमांनी जाळला आणि या घटनेला प्रतिक्रिया म्हणून गुजरातमधील दंगे उसळले, अशी सरळसोट मांडणी करणा-यांचे डोळे उघडण्याचे काम हा माहितीपट समर्थपणे करतो. दंगल ही काही अंशी उत्स्फूर्त असते; पण त्याहून अधिक ती नियोजित असते. आणि त्याचे प्रत्ययकारी चित्रण या माहितीपटातून आपणासमोर येते. कोणतीही भूमिका न घेता तुलनात्मक तटस्थतेने दिग्दर्शक राकेश शर्मा यांनी भयावह वास्तव मांडले आहे. वस्तुत: हा माहितीपट दोन्ही बाजू मांडतो. रेल्वेच्या डब्यात ज्या हिंदूंचा मृत्यू झाला, त्यांची; आणि गोध्रा हत्याकांडात मुस्लिमांचे शिरकाण झाले, त्यांचीही. अडीच तासांचा हा माहितीपट साधारण दोन भागात आहे. पहिला भाग आहे तो, जमातवादी राजकारणाचा परिपाक म्हणून घडलेल्या गोध्रा हत्याकांडानंतर उद्ध्वस्त झालेल्या सामाजिक जीवनाचा. दुस-या भागात गोध्रा हत्याकांडाचा निवडणुकीसाठी कसा फायदा घेतला गेला, हे दाखवण्यात आले आहे. या डॉक्युमेंट्रीतून अनेक समजांना धक्का बसतो. रेल्वेच्या डब्यात ज्यांचा मृत्यू झाला, ते सारे संघाचे कारसेवक होते आणि त्यांना संपवायचे म्हणून हेतुपुरस्सर डबा जाळला गेला, असे सांगण्यात आले. मात्र मृत हिंदू व्यक्तीच्या घरातील लोक जेव्हा मरण पावलेले कारसेवक नसल्याचा निर्वाळा देतात, तेव्हा जाणीवपूर्वक खोटा प्रचार केला गेला असल्याचे ध्यानात येते.
मुस्लिम समुदायाची कत्तल केल्यानंतर इतर अनेक भयभीत मुस्लिम लोक निर्वासित झाले. त्यांच्या समवेत काही हिंदू कुटुंबेदेखील निर्वासित झाली. इतर वेळी हिंदूंची रक्षा करण्याची, कल्याण करण्याची भाषा करणा-या बजरंग दल, श्रीराम सेना या संघटनांनी या निर्वासित हिंदूंना कोणत्याही प्रकारची मदत केली नाही. एहसान जाफरी नावाच्या खासदाराने जेव्हा नरेंद्र मोदींना फोन केला, तेव्हा त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केली गेली नाही. ही माहिती देणा-या तरुणाचे वडील त्या वेळी जाफरी यांच्या घरी उपस्थित होते, हे यातून स्पष्ट होते. विद्वेषाची बीजं किती घट्ट रुजली आहेत, हे आपणाला माहितीपटाच्या शेवटच्या प्रसंगातून लक्षात येते. दिग्दर्शक राकेश शर्मा एका सहा-सात वर्षांच्या मुस्लिम मुलाला विचारतात-
‘तुला मोठेपणी काय व्हायचंय?’
‘सोल्जर’, मुलगा.
‘तुला सोल्जर का व्हायचं आहे?’ शर्मांचा प्रश्न.
‘मला हिंदूंना मारायचं आहे.’
‘का?’
‘त्यांनी तसंच केलं म्हणून. हिंदू लोक वाईट असतात.’ मुलगा.
‘अरे, मी एक हिंदू आहे. तू सोल्जर बनल्यावर मला मारणार का?’
‘नाही.’
‘कशामुळं?’
‘मी फक्त हिंदूंना मारणार.’
‘पण, मी एक हिंदू आहे.’
‘तुम्ही हिंदूंसारखे दिसत नाही.’ मुलगा म्हणतो.
‘मग मी कुणासारखा वाटतो?’ राकेश शर्मा विचारतात.
‘तुम्ही मुस्लिमांसारखे दिसता.’ मुलगा.
आणि माहितीपटात गाणे सुरू होते-
‘मंदिर भी ले लो, मस्जिद भी ले लो
मगर तुम हमारे लहू से न खेलो!
मंदिर से अगर खुदा है नदारद
और मस्जिदो में नहीं है ईश्वर
तो फिर आदमी के लिये धर्म क्या है
जहां आदमी के लिये उठे हैं खंजर!
खुदा को भी ले लो, ईश्वर को भी ले लो
मगर तुम हमारे लहू से न खेलो
तुम राम ले लो, बाबर भी ले लो
मगर तुम हमारे लहू से न खेलो।’
सहा-सात वर्षांच्या मुलाच्या इंद्रधनुषी डोळ्यात हिरवे-भगवे रंग अधिक गडद करण्याऐवजी हे गाणं आपण मोठ्या आवाजात म्हणणार की नाही, त्याला आपण नवे आकाश दाखवणार की नाही, हा यक्षप्रश्न मागे ठेवून हा माहितीपट संवेदनशील मनावर कोरला जातो.
shriranjan91@gmail.com