आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीच्‍या पोटातून..

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही अंधारी रात्र अनुभवलीये तुम्ही? कोणी अनुभवली नाहीये! या अंधाऱ्या रातीच्या पोटातूनच जन्म होतो पहाटेचा, कितीतरी प्रसवकळा सोसून सोसून. म्हणजे अंधाराशिवाय पहाट नाही. आणि पहाटेचं अस्तित्व असल्याशिवाय अंधाराचं महत्त्व नाही. सगळं कसं इन्टरकनेक्टेड... अगदी तुम्ही-आम्हीदेखील. ओळखी-अनोळखीच्या गोष्टी असतील वा विरून चाललेले धागे असतील, सारे कसे एकमेकांशी जोडलेले असतात. ते दिसोत न दिसोत, ते असतात. व्यक्ती-व्यक्तीशी, गोष्टी-गोष्टींशी, विषय-विषयाशी, व्यक्ती-समाजाशी, समाज-राज्यसंस्थेशी ...सगळं कसं कनेक्शनवर उभारलेलं आहे. तुम्हाला नाही असं वाटतं? म्हणजे बघा ना, आपणदेखील कसे जोडले गेलोयत एका धाग्यानं, जो धागा दिसत नाही पण तो आहे. हो ना? मला काय वाटतं माहित्येय, प्रत्येक धागा पक्काच असावा, असं बंधन नसावं; पण प्रत्येक गोष्टीला आपल्याला जोडून पुढे नेणारा एक धागा असला पाहिजे. आणि तो आपण टिकवून ठेवला पाहिजे, कारण तो गरजेचा आहे तुमच्या-माझ्यातले बंध घट्ट होण्यासाठी!
आणि जेव्हा आपल्या हे लक्षात येईल ना की, आपल्या रक्ताच्या नात्यांशिवायही आपण एकमेकांशी कसे जोडलेलो आहोत कुठल्याही लिखित कराराशिवाय, तेव्हा खरी मजा येईल, माहित्येय? म्हणजे मी दूध आणायला दुकानात जाते तेव्हादेखील ते दुकानदार काका आणि माझं काहीतरी बाँडिंग जमलेलं असतं. आम्ही एकमेकांकडे पाहतो, तेव्हा आम्ही हसून एकमेकांना अॅकनाॅलेज केलं तरी ते पुरेसं असतं. किंवा एकाच वेळी लोकलने प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांकडे पाहून हसणंदेखील किती अभूतपूर्व असतं. आणि असा हा क्षण तुमच्या-माझ्या आनंदाच्या इनबॉक्समध्ये जमा होणारा असतो. म्हणून हा इनबॉक्स वाढत गेला पाहिजे. कारण त्यातून आपण काहीतरी शिकत असतो. आपण घडत असतो.

तुम्ही पहिला पाऊस कधी अनुभवलाय, असं मी तुम्हाला विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल? तुम्ही कदाचित काहीतरी स्पेसिफिक उत्तर द्यालही; पण ते मला फारसं पटणारं नसेल. कारण प्रत्येक पाऊस हा पहिलाच असतो. आपण माणूस आहोत आणि माणसाकडे एकच क्षण अनुभवण्याच्या लाखो पद्धती आहेत. त्यामुळे कुठलाही क्षण अगदी तसाच डिट्टो घडला तरी तो अनुभवण्याच्या पद्धतीमुळे बदलतो. त्यासाठी आवश्यक आहे ती त्या क्षणाशी असणारी आपली बांधिलकी, त्या क्षणावर असलेलं आपलं प्रेम. हे त्या त्या क्षणाबरोबर, व्यक्तीबरोबर, विषयाबरोबर किंवा कलेबरोबर जोडलेलो असणं, हे सगळं स्वतः कोण आहोत हेच शोधून द्यायला मदत करणारं असतं. आपलं ओरिजिन काय आहे हे सांगणारं, ‘माणूस’ म्हणजे काय याचं उत्तर देणारं, झपाटून जगायला लावणारं, आणि तरीही काही मर्यादांचा परिचय करून देणारं, बिटवीन द लाइन्स असणाऱ्या गोष्टी वाचायला शिकवणारं आणि... आणि... आणि...
त्यामुळे गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. शीना बोराच्या खुनापासून कलबुर्गींच्या हत्येपर्यंत, कालिदासाच्या ‘मेघदूत’पासून आजच्या ऐश्वर्य पाटेकरच्या कवितेपर्यंत, सामाजिक शास्त्रांपासून मार्केटिंग फायनान्सपर्यंत, रेट्रो गाण्यांपासून आजच्या रॅपपर्यंत, सारं सारं माहीत असायला हवंय आपल्याला. त्यावर आपापली मतं असतील पण आपण त्यातून ‘माणूस’ म्हणून जो योग्य तो दृष्टिकोन ठेवायला हवा. आपण डॉक्टर बनू, शिक्षक बनू, अभिनेते बनू, किंवा जगातलं काहीही बनू... पण हे सगळं आपल्याला माहीत हवंय.
खरं तर, याहीपेक्षा खूप काही आहे वाचायला, पाहायला, ऐकायला, स्पर्श करायला, चव घ्यायला... तुम्हाला सांगू, मी लहान असताना म्हणायचे की, मी कलेच्या क्षेत्रातच जाणार आणि त्यातच मी इतकी मास्टरी मिळवणार की, मला दुसरं काही करायची गरजच नसेल. पण हळूहळू डोक्यात प्रकाश पडू लागला आणि तो प्रकाश अजूनही अधिकाधिक लख्ख होत चाललाय. कुठल्याही क्षेत्रात जायचं असं आपण म्हणतो तेव्हा आपल्याला जगण्यासोबतची, आजूबाजूच्या परिस्थितीसोबतची नाळ आपण तोडूच शकत नाही. आपल्या जगण्यातलं ॲक्च्युअल दुःख, सुख, अस्वस्थता या साऱ्याचा परिपाक असते कला. कलेसाठी कला असत नाही, ती जगण्यातून जन्म घेते. शेणाने माती सारवल्यावर शेण निघतं ते मातीसकट. अगदी तशी उमलते कला, जगण्यासकट! मग फिलॉसॉफी, भाषा, इतिहास, मानशास्त्र, राज्यशास्त्र असे अनेक विषय आपण टाळूच शकणार नाहीयाेत. कारण ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. वेळ पुरत नाही गोष्टी शिकायला, वाचायला, अनुभवयाला अशी परिस्थिती आहे. आपण सगळ्यांनीच प्रगल्भ व्हायला हवंय राजकारणात, समाजकारणात, कलेत, साहित्यात, वन टू वन नात्यात, आपापल्या ग्रुप्समध्ये, लैंगिकतेमध्ये...सगळीकडे. आणि ते प्रगल्भ होण्यासाठी गरजेचं आहे ते सारीकडचे धागे आपल्या मातीत रुजवून घेणं. खरं तर, ते आपल्या मातीतच असतात. बस्स आपल्याला गरज असते, ते धागे शोधायची, त्यांना फुलवायची. पण त्यासाठी मनात इच्छा हवी, आणि कुठल्याही पूर्वग्रहांचं ओझं आपल्या मनात नसावं, इतकंच! काय म्हणताय? करू या झपाटून जगायला सुरुवात? अं, पण रात्र झालीये आणि आपल्याला तर माहित्येय रात्रीच्या पोटातूनच होतो प्रकाशाचा जन्म!

dancershrutu@gmail.com