आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काठी आणि कापूस ;

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अडगुलं मडगुलं... तान्ह्या बाळा ती ऽ ऽ ऽ ट लाऊ, असे बडबडगीत गात, न्हाऊन झाल्यावर वेखंडाची पावडर, तीट, काजळ लावण्याचा रोजचा कार्यक्रम असायचा. कुंची घालून त्यातच गुंडाळले जाईपर्यंत कोजागिरीला पेंग यायला लागायची. आज आजीची विशेष गडबड सुरू होती. कोप-या त एक काठी व त्याला कापूस लावला होता. जवळ पूजेची व आरतीची तयारी केली होती.
‘आज कोजागिरीचा तिस-या महिन्याचा वाढदिवस नाही का?’ शांताची आई आठवण करून देत तयारीला लागली होती. कोजागिरीचा दर महिन्याचा वाढदिवस साजरा व्हायचा. आजचे हे काठी आणि कापूस प्रकरण काय हे शांताला कळत नव्हते.
नवीन झबले, छानशी कुंची घालून कोजागिरीचे ध्यान आजीने कोप-या त उभ्या ठेवलेल्या काठीजवळ उभे धरले. कोणत्याही क्षणी कोजागिरी पाय मुडपून घेत होती. ‘काठीसारखी उंच हो. मोठी हो. कापसासारखी म्हातारी हो,’ आजी असे म्हणत सोहळा साजरा करण्यात गुंतली होती. शांता पाहत राहिली. कोजागिरीला भरपूर आयुष्य मिळावे असा तो सोहळा होता. मुलीसाठी ‘शेवरीच्या कापसासारखी होईपर्यंत जग, म्हातारी हो असे शुभ चिंतायाचे,’ शांताची आई सांगत होती.
शांता विचार करू लागली. जागतिक पातळीवर संख्याशास्त्रीय अभ्यास करणा-या संशोधकांना शांताने पाठवलेला निरोप मिळाला असणार. शांताची आई, कोजागिरीची आजी त्यावर जणू सोहळ्यातून शिक्कामोर्तब करत होती. शांताला मजेने हसू आले. ‘आई, आमचेही बाळ असताना तू एवढे कौतुक करायचीस का गं?’ शांताने आईला विचारले.
‘आईला आपल्या बाळाचं कौतुक असतंच. परिस्थिती अनुकूल नव्हती. बाळंतपणं घरीच व्हायची,’ शांता आईचे बोलणे ऐकत पेंगुळलेल्या कोजागिरीला पाळण्यात ठेवत होती. आई बाजेखालील शेगडीत धूप टाकत बोलत होती. या धुपाच्या वासाने वातावण प्रसन्न व्हायचे. शांता झोपी गेलेल्या कोजागिरीकडे पाहत राही. तो एक छंद झाला होता. झोपेत बाळाच्या चेह-या वर वेगवेळ्या भावभावना ऊनसावल्यांच्या खेळाप्रमाणे तरळायच्या. कधी खुदुखुदु हसणे तर कधी ओठ काढून रडणे. अशा वेळी आजी म्हणायची, ‘सटवाई स्वप्नात येते. बाळांना हसवते, रडवते. तीच त्यांच्या कपाळावर त्यांची भाग्यरेषा उमटवते. म्हणूनच बाळाच्या जन्मानंतर सटवाईची पूजा करतात. तिला प्रसन्न ठेवण्यासाठी. बाळाच्या सुरक्षिततेसाठी,’ आईचे बोलणे चालू होते.
सटवाईची पूजा; ती मुलाचे भाग्य लिहून ठेवते; म्हणून तिची पूजा करणे; या गोष्टीचा शांता विचार करू लागली. मंद मंद हसण्याचे भाव असणारा कोजागिरीचा चेहरा पाहून शांताला वाटले; सटवाई कोजाजवळ येऊन नेहमीप्रमाणे तिच्या कानात काहीतरी कुजबुजणार इतक्यात तिची नजर आजूबाजूला गेली असणार. ‘कोजागिरी, तुला असे आई-बाबा, आजी-आजोबा असताना मी काही लिहिण्याची गरज काय? सारंकाही शुभ, चांगलं होणार यात काय शंका? प्रेमळ उबदारपणा तुझ्याभोवती आहे. मला त्यात लुडबुड करण्याची काय गरज? सर्व काही तू बंद मुठीतच घेऊन आली आहेस.’ जणू सटवाईच्या या कुजबुजीने अर्धवट झोपेतील कोजागिरी मंद मंद हसत होती.
कोजागिरीशी झालेला सटवाईचा हा कल्पनेतील संवाद शांताने आईला रंगवून सांगितला होता. ‘शांते, तुझी कल्पना काहीही असेल.’ आईचे नेहमीचे सुरू होणार याची शांताला कल्पना होती. कोजागिरीच्या चेह-या वरचे मनोहारी हास्य व गाढ झोपेतील मुद्रा याकडे पाहून शांताला वाटले, ‘कोणाची कशाला, स्वत:चीच दृष्ट लागायची कोजागिरीला.’

aruna.burte@gmail.com