Home | Magazine | Pratima | stone art sinnar

खडकातले सौंदर्य

भूषण देशमुख | Update - Jun 29, 2012, 09:30 PM IST

सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाला ज्यांनी भेट दिली असेल त्यांचे डोळे तेथील भूरत्नांची दुनिया पाहून विस्फारले असतील.

  • stone art sinnar

    सिन्नर येथील गारगोटी संग्रहालयाला ज्यांनी भेट दिली असेल त्यांचे डोळे तेथील भूरत्नांची दुनिया पाहून विस्फारले असतील. अशीच स्थिती नगर येथील बहिरनाथ वाकळे यांच्या घरी गेल्यावर आपली होते. वरून ओबडधोबड दगड, पण आतमध्ये स्फटिकाचे फूल फुललेले...काहींचा आकार तीक्ष्ण सुयांसारखा, काही खोब-यासारखे, तर काही पांढ-या शुभ्र कापसासारखे. काहींचा रंग निळाभोर, तर काहींना गुलाबी-जांभळी छटा. काहींमधून पाझरणारा हिरवा रंग, तर काहींमध्ये एकाच दगडात तीन-चार रंग सामावलेले. कॅलसाइट, कॅवनसाइट, स्टीलबाइट, स्टीलराइट, अ‍ॅपॉफिलाइट, अ‍ॅमथिस्ट, मेसोलाइट अशा अनेक नावांनी या गारगोट्या ओळखल्या जातात. रांगोळीसाठी वापरले जाणारे सामान्य शिरगोळे आणि हि-यासारखी अमूल्य रत्ने यांचीच ही भावंडे. ज्वालामुखी शांत होताना खडकात काही पोकळ्या निर्माण होऊन तेथे विविध रसायने साचतात. त्यातून मिनरल्सचे वेगवेगळे प्रकार तयार होतात. जेवढी कठीणता आणि पारदर्शकता जास्त तेवढे त्याचे मूल्य अधिक. या छंदाची सुरुवात कशी झाली याविषयी वाकळे सांगतात - ‘पूर्वी आम्ही सावेडी गावात राहत. त्या काळी शहराजवळून सीना नदी वाहत असे. नदीतील वाळूत आम्ही खेळायचो. वाळूत रंगीत खडे सापडायचे. ते गोळा करून मी बाटल्यांमध्ये साठवत असे.’ हा छंद त्यांनी मोठेपणीही जोपासला. इंटरनेटवरून मिनरल्सची माहिती मिळवायला त्यांनी सुरुवात केली. त्यांचे प्रकार, वैशिष्ट्ये, वेगळेपण, किमती अशा अनेक गोष्टी जशा कळायला लागल्या. त्याबरोबर गारगोट्यांचे महत्त्व लक्षात यायला लागले. नगर जिल्ह्यात राहुरी, पारनेर, सावळीविहीर या भागांत हे दगड सापडतात. एखाद्या विहिरीत किंवा खाणीत गारांचा थर सापडल्याचे समजले की, वाकळे तिथे जातात. रत्नपारखी जशी रत्नांची परीक्षा करतो तशी परीक्षा ते खडकांची करतात. मग तो खडक नीट कापून त्यातला निसर्गदत्त ठेवा ते उकलतात.
    वाकळे यांच्या घरातील शोकेसमध्ये गारगोट्यांचे 30-35 प्रकार पाहायला मिळतात. काही गारगोट्या त्यांनी अहमदनगर महाविद्यालयाला दिल्या आहेत.
    गारगोट्यांच्या जोडीने वाकळे यांच्या घरात विविध विषयांवरील ग्रंथही नांदताना दिसतात. अनेक अँटिक वस्तूही त्यांनी जमवल्या आहेत. शंभर वर्षांपूर्वीच्या बग्गीचा टॉर्च, घरगुती सिनेमा पाहण्यासाठी वापरला जाणारा फिल्म प्रोजेक्टर अशा काही खास चिजा त्यांच्याकडे आहेत. या सगळ्याचे संग्रहालय लवकरच उभे राहिलेले दिसेल.

Trending