आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चेहऱ्यामागे अनेक चेहरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूज चॅनल लावलं की सर्वप्रथम झळकतो अँकरचा चेहरा. बातमीचं आणि त्या अनुषंगानं संपूर्ण चॅनलचं यशापयश पेलणाऱ्या अँकर्सच्या चेहऱ्यामागे अनेक धडपडे पत्रकार आणि तंत्रज्ञांची मेहनत असते. वेळेशी स्पर्धा करण्याची ताकद असेल, तुमच्या आयुष्याचं ध्येय केवळ हेच असेल, तुमचं या माध्यमावर मनापासून प्रेम असेल तर आणि तरच इथे या.
इलेक्ट्रॉनिक मीडिया. सध्या सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय. मला आठवतंय की, काही वर्षांपूर्वी कोणत्याही मुलाला किंवा मुलीला विचारलं की, भविष्यात काय करणार किंवा सध्या काय करतोस तर दहापैकी किमान सहा जणांकडून उत्तर मिळायचं, इंजिनिअरिंग किंवा एमबीबीएस. आज या माध्यमाची ताकद आणि कुतूहल इतकं वाढलंय की, तुमच्या आजूबाजूची बरीच मुलं मास मीडियाचा कोर्स करताना दिसतील. याच माध्यमातली एक सदस्य म्हणून मी तुमच्याशी बालणार आहे आणि या माध्यमातील काही गोष्टी शेअरही करणार आहे.

इलेक्ट्रॉनिक माध्यम म्हणजे वेळेशी स्पर्धा. तुम्हाला इथे आल्यावर किंवा या माध्यमाचे सदस्य झाल्यावर सेकंदाचंही महत्त्व कळतं किंबहुना वेळेची किंमत करावी लागते. इथे सगळा सेकंदांचा आणि मिनिटांचा हिशेब, त्यामुळे वेळेशी स्पर्धा करण्याची तयारी असेल तर या माध्यमाची वाट निवडा, असा माझा सुरुवातीलाच प्रेमाचा सल्ला. आता कोणतंही न्यूज चॅनेल म्हटलं की प्रेक्षकांना दिसतो बातम्या सांगणारा अँकर आणि विविध शहरांतून गावातून माहिती सांगणारा रिपोर्टर. प्रेक्षकांना सर्वसाधारणपणे या दोघांची सतत ओळख होत राहते किंवा या माध्यमातल्या सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे हीच माणसं असं वाटू लागतं. पण फ्रेंड्स, ये दुनिया बहुत बडी है. आम्ही अँकर या मोठ्या दुनियेचं प्रतिनिधित्व करतो आणि आमच्या मागे असते ती पडद्यामागे काम करण्याऱ्या अनेकांची टीम.

फार खोलात नाही जात, पण गावागावात घडणारी बातमी ऑफिसपर्यंत पोहोचवतात ते आमचे रिपोर्टर्स. मग ही सगळी माहिती येते ती असाइनमेंट डेस्कला. इथे त्या माहितीची छाननी होते. काही शंका असेल किंवा अधिक माहिती घ्यायची असेल तर सगळी जबाबदारी ही त्या टीमची. आणि हो, हे काम काही सेकंदांत किंवा मिनिटांत पार पाडण्याची कसरत त्यांना करावी लागते. मग ही माहिती जाते प्राॅडक्शन टीमकडे. ही टीम म्हणजे बातम्यांची चाळणी. बातमी कधी ऑन एअर जाणार, हे तीच ठरवते. या बातमीतले महत्त्वाचे मुद्दे कोणते, बातमीला वळण काय द्यायचं आणि बातमीवर आवश्यक असलेल्या प्रतिक्रिया कोणाच्या घ्यायच्या हे सारं ठरवते. एखाद्या बातमी संदर्भातली सर्व माहिती आमच्यापर्यंत म्हणजेच अँकर्सपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्राॅडक्शन टीमची. ते बातमीचं फायनल प्राॅडक्ट तयार करतात. त्यांनाही वेळेचं गणित सांभाळावं लागतं. मग आली आमची जबाबदारी. प्राॅडक्शनकडून आलेली बातमी बिनचूक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं. बातमी कळली की, डोक्याचं चक्र चालू करायचं, त्या बातमीशी निगडित संदर्भ आठवायचे आणि वाक्य जोडून अगदी परिणामकारकरीत्या बातमी प्रेक्षकांना सांगायची. ही मी सर्वसाधारण प्रक्रिया सांगितली. या सगळ्या प्रक्रियेत तांत्रिक बाबींवर काम करण्याऱ्या सहकाऱ्यांची मोठी टीम झटत असते.

अँकर हा चॅनलचा चेहरा म्हणून प्रेक्षकांच्या दृष्टीनं बातमी हिट झाली तरी श्रेय त्याला आणि फ्लॉप शोची जबाबदारीही त्याची. एक अँकर म्हणून तुम्हाला अनेक दिव्यांतून जावं लागतं. बऱ्याचदा बातमीशी संबधित संदर्भ माहीत नसतात, पार्श्वभूमी ठाऊक नसते, विचारणं अपेक्षित असलेल्या प्रश्नांचा अंदाज येत नाही, तज्ज्ञांची नावं ऐन वेळी आठवत नाहीत, ब्रेकिंग न्यूज आल्यावर सर्व जण बऱ्यापैकी हायपर झालेले असतात, आपल्याच चॅनेलवर बातमीचं सर्वोत्तम कव्हरेज जावं ही प्रत्येकाची इच्छा आणि अँकरवर सतत होणारा सूचनांचा भडिमार या सगळ्या दिव्यातून पार होत चेहऱ्यावरचे भाव न बदलता, बातमीची लय ढळू न देता कोणत्याही अँकरला ती बातमी पेलावी लागते.

आता मी अँकर आहे, त्यामुळे समस्त अँकर्सच्या भूमिकेतून मी कदाचित ऑफिसमधल्या इतर सदस्यांपेक्षा अँकरची भूमिका अधिक सविस्तर सांगितली आहे, पण यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. थोड्याफार प्रमाणात मीडियात काम करणाऱ्या प्रत्येकालाच या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. हे दृक््श्राव्य माध्यम आहे, त्यामुळे याचा परिणाम इतर माध्यमांपेक्षा अधिक साधला जातो. ज्यांना वृत्तपत्र वाचताना काही अडचणी येतात किंवा बातमीचे इतर स्रोत ज्यांच्यासाठी उपलब्ध नाहीत, अशांसाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया हे वरदान आहे आणि याच जबाबदारीचं भान राखत सतत काम करावं लागतं.

सध्या इलेक्ट्राॅनिक मीडियाच्या शैलीवर बरीच टीका होते, खासकरून भाषेवर. पण हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, टीव्ही पुण्या-मुंबईपुरता मर्यादित नाही, राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्साही आणि इच्छुक मुलं इथे येतात. १२ मैलांवर भाषा बदलते. त्यामुळे एखाद्या चॅनलच्या छताखाली राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली मुलं असताना प्रत्येकाच्या प्रदेशात बोलल्या जाणाऱ्या भाषेलाही सामावून घेणं महत्त्वाचं नाही का?

सध्या अनेक तरुणतरुणींना या माध्यमात काम करण्याची इच्छा असते; पण वर म्हटल्याप्रमाणे वेळेशी स्पर्धा करण्याची ताकद असेल आणि तुमच्या आयुष्याचं ध्येय केवळ हेच असेल, तुमचं या माध्यमावर मनापासून प्रेम असेल तरच इथे या. नाही तर अजून एक उपाय करू शकता. कोणत्याही चॅनलमध्ये काही दिवस उमेदवारी करा, आपली आवड ओळखा आणि मगच निर्णय घ्या. मीदेखील अशीच चाचपणी करत हा मार्ग निवडला आणि तो योग्य ठरला. सध्या सगळ्यात प्रभावशाली माध्यमात मी काम करते याचा मला नक्कीच अभिमान आहे.
dnyanu11@gmail.com
बातम्या आणखी आहेत...