आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलुतेदारांचा गणोबा उत्‍सव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गणपती अन् गौरीच्या सणाला गावाकडे जाण्याची उत्सुकता प्रणव अन् प्राजक्ताला अनावर झाली होती. त्याचं कारणही तसंच होतं. वर्षभर आजीनं सांगितलेला बलुतेदारांचा गणोबा उत्सव अन् त्यांचं मूर्तीकाम त्यांना प्रत्यक्ष पाहायला मिळणार होतं. अखेर तो दिवस उजाडला. आजीने नातवंडांसह कुंभारवाडा गाठला. बड्या घरची लेकरं कुंभारवाड्यात आल्यानं गणू कुंभारही सुखावला. ‘बायसाब आता लेकरं मोठी झालीत’, असं म्हणत त्यानं प्रणव-प्राजक्ताच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला. त्यांना बसायला घोंगडी अंथरली. शाडूपासून बनवलेली गणेशमूर्ती व तिच्यासमोर मांडलेली कुंभारी औजारांची आरास पाहून ही भावंडं अचंबित अन् आनंदी झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा भाव ओळखून गणूने कुंभाराच्या ‘गणोबा उत्सवाचा’ इतिहासच त्यांच्यासमोर जागवला...

पूर्वी गावगाड्यात बारा बलुतेदारांना हक्काचं स्थान अन् मानही होता. कलेची देवता गणपती हे कुंभाराचं आराध्य दैवत. त्याच्या सन्मानार्थ गणोबा उत्सव साजरा केला जातो. तथापि नेमका तो केव्हा सुरू झाला, याची माहिती उपलब्ध नाही. पिढ्यान् पिढ्या तो हस्तांतरित झाल्याचं कुंभारबांधव सांगतात. १५ दिवसांआधीच या सणाचे वेध कुंभारवाड्याला लागतात. हा उत्सव दहा दिवस चालतो. नदीकाठच्या शाडूपासून मूर्ती बनवली जाते. प्रतिष्ठापना करण्यापूर्वी काही तास अगोदर कुंभार अंघोळ करून मूर्ती साकारण्यास सुरुवात करतो. खाद्यतेलात शेंदूर मिसळून तो रंग मूर्तीला दिला जातो. पाण्याने धुतलेली व चुना-कावेने रंगवलेली कुंभारी औजारांची आरास गणेशासमोर मांडली जाते. यात गणेशमूर्तीमागे उभारलेले चाक व समोर ठेवलेल्या थापट्या, दगड, टिकाव, कुदळ, खोरे, सब्बल, माती सजावटीला वेगळेच सौंदर्य मिळवून देतात. सणानिमित्त घरात गोडधोड होतं. सासुरवाशीण लेकीला माहेरी आणलं जातं. दररोज सकाळ- संध्याकाळ डाक वाजवून गणपतीची पूजा आरती केली जाते. उत्सवकाळात कुंभारकाम बंद असते. मद्य-मांस सेवन निषिद्ध मानले जाते. दहाव्या दिवशी गावच्या वाहत्या नदीत अथवा विहिरीत मूर्ती विसर्जित केली जाते.
पूर्वी या उत्सवाचं स्वरूप उत्साही व भक्तिमय होतं. उत्सवकाळात गजाननाचे गुणगान करणारे कार्यक्रम व्हायचे. गावकरी त्याला आवर्जून हजेरी लावायचे. विशेष म्हणजे, कलाकारांच्या जथ्यात दलित बांधवही असायचे. याबाबत सांगताना गणू म्हणाले, ‘लोककलावंत स्वरचित लोकगीतांवर डफ-तुणतुण्याच्या नादात गणोबाची महती व पुराण कथांतील त्याचा पराक्रम सांगायचे. लोकही मोठ्या भक्तिभावानं तो ऐकायचे. एक प्रकारचं ते आख्यानच असायचं. यात रात कधी सरायची, दिवस कधी उजडायचा, याचेही भान उरायचं नाही. बऱ्याच कुंभारवाड्यांत वाघ, अस्वलांची सोंगंही रंगायची. आता टीव्ही, मोबाइलच्या जमान्यात हे सार संपलंय, याची रुखरुख गणूजींना वाटते. त्याच वेळी त्यांच्या मुला-नातवंडांनी किमान परंपरा म्हणून तरी पूर्वजांचा हा उत्सव सुरू ठेवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर फुलतं...
...आजी आता नातवंडांना साच्यातले गणपती दाखवण्यासाठी सुतारवाड्यात घेऊन जाते. कधी काळी साच्यातले गणपती अख्ख्या गावाला पुरवणारे ज्ञानोबा सुतार आता हयात नव्हते. परंतु त्यांचा मुलगा गोविंदाने वडिलांची कलाकुसर मोठ्या काळजीनं जतन करून ठेवली होती. यातच आधुनिक गणेशमूर्तींचं मूळ रूप सामावलं होतं. पूर्वी गावातील बलुतेदारांपैकी सुतार, कुंभार किंवा सोनार स्वत:चा व्यवसाय सांभाळत सणावाराला गावकऱ्यांना मातीचे बैल, नाग, गौरीचे मुखवटे करून देत. शाडूच्या मातीपासून गणपती तयार करून द्यायचा छंद हा त्यापैकीच एक होता. यात हौसेचा भाग अधिक असल्याने सुरुवातीला या मूर्तींकडे सौंदर्यापेक्षा भाविकतेनेच पाहिले जायचे. त्यामुळे हाताने बनवलेल्या या मूर्ती फारशा आखीव-रेखीव नसल्या तरी चालायच्या. कालांतराने, या कलाकारांनाच त्यांच्या मूर्तींतील ओबडधोबडपणा जाणवला, आणि सुरेख मूर्ती तयार करण्यासाठी त्यांनी साचे तयार केले. पुढे हे साचेच बलुतेदारांची खासियत बनून गेले. याबाबत सांगताना गोविंदाने त्यांच्या वडिलांनी त्याला सांगितलेलं गुपित उलगडलं. तो म्हणाला, ‘हाताने बनवलेल्या मूर्ती सुबक नसत. तसंच त्या करण्यासाठी फार वेळ जाई. त्यामुळे काही कल्पक कारागिरांनी लाकडी फळीवर गणपतीचं सुरेख चित्र काढून साच्याच्या रूपात कोरलं व यातूनच साच्यातल्या गणपतीचा जन्म झाला’.
साच्यातला गणपती साकारण्यासाठी नदीकाठची शाडू आणून ती बारीक वाटली जायची. वाटलेल्या शाडूला चाळण लावून त्यातून मिळालेली बारीक वस्त्रगाळ माती पाण्यात भिजवली जाई. ती चांगली भिजल्यानंतर गणपतीचा लाकडी साचा घेऊन त्याच्या आतील भागावर तेलाचा हात फिरवून शाडूचा गोळा त्यावर थापला जाई. तेलामुळे साच्याला माती चिकटत नसे व अवघ्या पाच मिनिटांत गणेशाची सुबक मूर्ती तयार होत असे. या मूर्ती बलुतेदार गावच्या कारभाऱ्याला व मानकऱ्यांना देत. मूर्तीचा मोबदला म्हणून खोबऱ्याचा तुकडा, गुळाचा खडा व मानाची पान-सुपारी बलुतेदारांना मिळत असे. वर्षाकाठी धान्याच्या रूपात मिळणारा मोबदला (‘बलुतं’) बलुतेदारांना पुरेसा असल्याने त्यांना केवळ मानाची सुपारी घेऊन कारभाऱ्यांना गणपती देण्यात आनंद वाटायचा. सुमारे १०० वर्षांपूर्वी बलुतेदारांनी तयार केलेले हे गणपतीचे साचे आता पाहायलाही मिळत नाहीत. परंतु लातूर जिल्ह्यातील जानवळच्या गोविंद पांचाळ यांच्याकडे दोन साचे आणि लाकडी मूर्ती पाहायला मिळतात. यापैकी एक मूर्ती दीडशे वर्षांपूर्वी पुंडलिक पांचाळ यांनी लाकडापासून तयार केली आहे. दीड फूट उंच असलेल्या या मूर्तीची खासियत म्हणजे, तिचे सर्व अवयव वेगळे करता येतात. याचप्रमाणे ज्ञानोबा पांचाळ यांनी ७० वर्षांपूर्वी पिंपळाच्या लाकडापासून तयार केलेली मूर्तीही पाहायला मिळते. ती आजही नवी कोरी वाटते. यामागचं रहस्य म्हणजे, तिला चकाकी येण्यासाठी व ती टिकून राहण्यासाठी गावरान बेलाच्या तेलानं तिला घासल्याचं ज्ञानोबांचा मुलगा गोविंद सांगतो.
साच्यातून तयार केलेले गणपती त्या वेळच्या लोकांना खूप आवडले होते. विशेष म्हणजे, लौकिक अर्थाने मूर्तीकलेचं कोणतंही शिक्षण न घेताच बलुतेदारांनी आपली ही कला मनोमन जोपासली होती. त्यामुळे हे साचे अन् मूर्तीं पारंपरिक ठेव म्हणून जपल्या पाहिजेत. शक्य असेल तर बलुतेदारांच्या या कलेचं पुनरुज्जीवनही करायला हरकत नाही, असं प्रणव-प्राजक्ता उत्साहाने म्हणाले. त्याच वेळी रेडिमेड आणि प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीची सवय झालेल्यांना बलुतेदारांचा गणपती आवडेल? अशी शंकेची पालही त्यांच्या मनात चुकचुकते...
shahajipawar71@gmail.com