आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रबळ इच्छाशक्ती महत्त्वाची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादा उद्योग सुरू करायचा म्हटलं की, त्याची शास्त्रशुद्ध माहिती, व्यावसायिक पातळीवरच्या औपचारिकता आदींची माहिती घेण्याची गरज असते. महाराष्ट्र लघुउद्योजक विकास महामंडळातर्फे प्रत्येक शहरात विविध शाखांतर्गत असे अभ्यासक्रम सतत होत असतात.
औरंगाबादमधील केंद्रात उर्मिलाताईंनी अन्नप्रक्रिया विषयाचे प्रशिक्षण घेतले. तत्पूर्वी त्यांनी घरीच कारळे, जवस, शेंगादाणा चटणी करून विक्रीस सुरुवात केली होती. गणपतीच्या दिवसात त्यांनी केलेल्या उकडीच्या मोदकांनाही परिसरातल्या दुकानांवर चांगलीच मागणी होती. पण अशा हंगामी पदार्थांपेक्षा आपण एखादा कायमस्वरूपी पदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू करावा, ही उर्मिलाताईंची इच्छा होती. राजगिऱ्याच्या पदार्थांना बारा महिने मागणी असते, मात्र त्या प्रमाणात स्थानिक उद्योजकांकडून मागणी पूर्ण होत नाही. परिणामी शहरात इतर ठिकाणहून उत्पादने आयात करावी लागतात. यामुळे आपण राजगिऱ्याच्या उत्पादन प्रक्रियेत उद्योग सुरू करावा, हे उर्मिलाताईंनी ठरवले. २०१४मध्ये त्यांनी रीतसर प्रशिक्षण घेतले आणि घरीच राजगिरा चिक्की, लाडू तयार करण्याचा उद्योग सुरू केला. सुरुवातीला आजूबाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी उत्पादने ठेवली. हळूहळू शहरातील अनेक फूड चेन्स, सुपर मार्केटमध्ये त्यांच्या ‘निरांजनी प्रॉडक्ट्स’चा प्रसार केला आणि या पदार्थांना आता चांगली मागणी आहे. विविध प्रकारच्या कोरड्या चटण्या, बेसनाचे लाडू, राजगिरा लाह्या, चिक्की, लाडू, भाजणीची पिठं, मेतकूट आदी उत्पादनांमधून उर्मिलाताईंचा उद्योग चांगलाच जोर धरू लागलाय. या उत्पादनांची प्रक्रिया आणि पॅकेजिंगपर्यंतचे काम त्या पाहतात, तर त्याची विक्री आणि प्रसाराचे काम पती तितक्याच उत्साहाने करतात.

आज त्यांच्याकडे ८ ते १० महिला शिफ्टनुसार काम करतात. दिवसाला २०० रुपये रोजगारही मिळवतात. सहा ते आठ तासांच्या शिफ्टमध्ये राजगिऱ्याच्या लाह्या तयार करणे, त्यापासून लाडू तयार करणे, साच्यात घालून चिक्की तयार करणे, चटण्यांसाठी मोठ्या प्रमाणावर लसूण सोलणे, तयार झालेल्या उत्पादनांचे शिस्तीत पॅकेजिंग करणे आदी कामे करून त्यादेखील आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनल्या आहेत.

मुलांच्या शाळांच्या वेळा सांभाळून, घरची कामे आटोपल्यावर उरलेल्या कोणत्याही वेळात हे काम करता येत असल्याने कारागीर महिलांनाही वेळेबाबतीत कोणतीच अडचण नाही. राजगिऱ्याचे लाडू बांधणे म्हणजे मोठे कठीण काम असते. गरम केलेल्या गुळात लाह्या टाकल्या जातात. हे मिश्रण गरम असतानाच पटापट त्याचे लाडू बांधले गेले तरच त्यांना आकार येऊ शकतो.

मिश्रण थोडे जरी थंड झाले तरी लाडू बांधता येत नाहीत. त्यामुळे उर्मिलाताईंनी आता राजगिऱ्याचे लाडू बनवण्याचं मशीन मागवलंय. यामुळे उद्योगाला गतीही येईल आणि लाडू बांधणेही सोपे जाईल. कोणताही उद्योग सुरू करताना स्वत:वरील विश्वास महत्त्वाचा आहे, असं उर्मिलाताईंना वाटतं. आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कामात आलेले कोणतेही अडथळे बाजूला सारता येतात आणि पुढची वाट सहज होते. त्यामुळे लघुउद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या महिलांनी आपल्या कक्षांतून थोडेसे बाहेर पडून उद्योगासंबंधी योग्य माहिती मिळवावी, असं त्या आवर्जून सांगतात.

madhurimadm@gmail.com
बातम्या आणखी आहेत...