आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Story About Readers View About Deepika's My Choice Video

समाज काय म्हणतो ? स्वातंत्र्य की स्वैराचार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मला काय आवडतं, माझी मर्जी काय, मला कशात आनंद मिळतोय, तेच करता येईल? जगता येईल का खरंच स्वतंत्र, मुक्त, एवढं बिनधास्त? अगदी कपड्यांपासून सेक्सपर्यंत सगळ्याची निवड मी करेन. हेच का महिला सक्षमीकरण? हे (निवड) स्वातंत्र्य की स्वैराचार? काय म्हणतो समाज?

बोल्ड दीपिकाच्या ‘माय चॉइस’ व्हिडिओच्या वादळाने काही दिवसांपासून सोशल मीडियावर धूळ उडवली. तोच धागा पकडत पुरुषांनी आपल्याही ‘चॉइस’चा व्हिडिओ टाकला. यानिमित्ताने बऱ्याच प्रतिक्रिया उमटून वादळ काही अंशी शमलं तरी सोशल मीडियाच्या परिघाबाहेर असलेल्या ज्या महिलांपर्यंत हा विषय पोहोचलाच नाही, त्यांच्यासाठी मधुरिमा टीमने पुढाकार घेतला. औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, अकोला येथील ‘दिव्य मराठी’ कार्यालयात विविध वर्गांतील महिला व पुरुषांना खास निमंत्रण देऊन हा व्हिडिओ दाखवण्यात आला आणि त्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया टिपण्यात अाली.

माध्यमे समाजाचे प्रतिबिंब असतात. समाजातील उच्चभ्रू वर्गापासून तळागाळात काय परिस्थिती आहे, याचं दर्शन घडवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. पण याचबरोबर एखाद्या परिस्थितीत आम्ही ठोस भूमिका घेत असतो. दिशा दर्शवतो. या वेळी मात्र दीपिका पदुकोणसह ९९ महिलांवर चित्रित ‘माय चॉइस’ व्हिडिओवर तसेच याच संदर्भात पुरुषांच्या बाजूने आलेल्या व्हिडिओवर आम्हाला सर्वप्रथम वाचकांची प्रतिक्रिया महत्त्वाची वाटली. माय चॉइसचे विविध पदर उलगडत वाचकांनी आपली नेमकी भूमिका स्पष्ट केली. यातील बहुतांश प्रतिक्रिया आम्ही आजच्या अंकात प्रकाशित करण्याचा प्रयत्न करत आहोत. जागेअभावी काही मान्यवरांची मते यात समाविष्ट करू शकत नाहीत, त्याबद्दल क्षमस्व.

औरंगाबाद
किती दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार?
काल-परवा दीपिका पदुकोणचा ‘माय चॉइस’ हा व्हिडिअो पाहिला. तिने नेहमीच्या शैलीत बिनधास्त अभिनय केला आहे. पण पहिल्यांदाच तिच्या अभिनयापेक्षा त्या व्हिडिओच्या आशयामुळे ती चर्चेत आली आहे. मुद्दा यातल्या चॉइसचा नसून शेवटी स्त्री अभिव्यक्तीचा आहे. मर्जीसारखे कपडे घालणे आणि सेक्सविषयी उघड बोलणे या कोनातूनच बऱ्याचदा स्त्री-स्वातंत्र्याकडे पाहिले जाते; पण हे काही स्त्री अभिव्यक्ती किंवा स्वातंत्र्याचे एकक नाही. परंतु, आजही पारंपरिक कर्मकांडात अडकवलेल्या स्त्री मनात हा विचार येतो, हेसुद्धा नसे थोडके. जेव्हा आपण आपल्याच प्राचीन उज्ज्वल संस्कृतीचा दाखला नित्य नव्या संशोधनासाठी देत असतो तेव्हा तसाच एखादा दाखला आपणास स्त्री अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर देता येत नाही याचे काही वैषम्य वाटते. यामुळे आता जे काही थोडेबहुत स्वातंत्र्य स्त्रिया उपभोगत आहेत, मुक्त अभिव्यक्त होत आहेत ते योग्यच आहे, त्या तरी किती दिवस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतील?
- सुमेध उघडे, विद्यार्थी

माझ्या निवड स्वातंत्र्याची जाणीव झाली
मी सर्वप्रथम दीपिकाचं कौतुक करते, कारण तिने तिच्या परीने स्त्री सक्षमीकरणासाठी एक पाऊल उचलले आहे. आता बरेच जण असं म्हणतात की, फक्त महिलांच्या निवडीबद्दल बोलल्याने किंवा अंग प्रदर्शन केल्याने स्त्री सक्षमीकरण नाही; पण तिने तिच्या परीने प्रयत्न तरी केला आहे. तो व्हिडिअो पाहून माझा स्वत:च्या नजरेत महिला म्हणून आदर वाढला आहे. मला एक माणूस म्हणून माझे निर्णय घेण्याचा हक्क आहे याची जाणीव झाली. दीपिकाचा व्हिडिओ पाहून तिचं सरळ स्पष्ट बोल्ड बोलणं ऐकून इतर मुलींना ही हिंमत येऊ शकते. किमान वाढत्या वयाच्या तरुण मुलींचा विचार बदलण्यासाठी नक्की कारण ठरेल. सकारात्मक पाहाल तर चांगलंच दिसेल नाही तर चंद्रामध्येही डाग पाहण्याची अपली मानसिकता आहेच.
- खुशबू बोरोकर,विद्यार्थिनी

हे स्वातंत्र्य तर घटनेनेच दिले आहे..
या व्हिडिओशी मी सहमत आहे. यात दर्शवलेले हक्क व अधिकार घटनेने आपल्याला दिले आहेत. अपत्य जन्माला घालायचे की नाही, याचा अधिकारही महिलेला दिला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बनवण्याची गरज का पडली, हा खरा प्रश्न आहे. घटनेनुसार महिलांना दिलेले हक्क मिळाले तरी व्हिडिओ प्रसारित करणे, त्यावर चर्चा करणे किंवा एवढा ऊहापोह करण्याची गरजच नाही.
- सुदर्शना

समाज मान्यता देणार नाही
मला हा विषय वेगळा नाही; पण आपला समाज या गोष्टीसाठी कधीही मान्यता देणार नाही. समाजात आपण अशा अनेक महिला पाहतो की त्यांना ‘माय चॉइस’मुळे समाजात जगणं कठीण ठरतं. फिल्मी जगतात हे सामान्य झाले असले तरी त्याचा वर्ग वेगळा असल्यामुळे त्याचा विषय होत नाही. प्रत्यक्ष महिलांनी असे वागले तर तिला सासर आणि माहेर दोन्हीकडून आधार मिळत नाही. समाज अजून लव्ह मॅरेज स्वीकारत नाही, मग या गोष्टी तर दूरच...
- लता टाकळकर, ब्यूटिशियन,औरंगाबाद

काही अंशी प्रेरणादायी
सर्वप्रथम दीपिका पदुकोणचं अभिनंदन! तिने एवढा नाजूक विषय खुलेपणानं बोलून दाखवण्याची हिंमत केली आणि त्यानंतर मधुरिमा टीमचं अभिनंदन की त्यांनी आम्हाला या विचारावर मत व्यक्त करण्याची संधी दिली. दीपिकाने या व्हिडिओमध्ये wake up म्हणत खरोखरच समस्त स्त्री जातीला जागं करण्याचा प्रयत्न केला आहे. दीपिकासारख्या उच्चभ्रू वसाहतीतील आणि सिनेसृष्टीत अव्वल स्थानावर असलेली स्त्री सेक्सविषयी बोलते तेव्हा तिच्यावर आक्षेप घेतला जात आहे. मग, मध्यमवर्गीय स्त्रिया, त्यातल्या त्यात एकट्या राहणाऱ्या स्त्रीनं तोंडातून सेक्स हा शब्द काढला तरी हा समाज त्यांना वाळीत टाकण्यास मागे-पुढे पाहणार नाही. आज निदान या स्त्रियांसाठी तरी ‘माय चॉइस’ची आवश्यकता आहे. So Deepika, keep it up and every woman, wake up!
- राजश्री पोहेकर,वृत्तनिवेदक

पटलं तरी अनुकरण कठीण
माझ्या मते भारत हा प्रजासत्ताक देश आहे. त्यात विचार मांडण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. यातील सर्व विचारांशी मी सहमत नाही, परंतु काही विचार, जसे की आपल्या आ‌वडीनुसार कपडे घालणे, धर्म मानणे अथवा नास्तिक राहणे इत्यादी विचार पटले. अशाच पुरुषांच्या दृष्टिकोनातून असलेला व्हिडिओही दाखवण्यात आला; पण हे विचार पटल्यानंतरही किती लोकांना ‘माय चॉइस’ अर्थात माझी निवड करता येईल, हे सांगणे कठीण आहे. परंतु सध्या तरी सोशल मीडियावर हा चर्चेचा विषय आहे.
- प्रथमेश सामंत,नोकरदार
सोलापूर
तरुणाईचं प्रतिबिंब
व्हिडिओ पाहिल्यानंतर गाेंधळात पडले. हळूहळू विचार करायला भाग पडले. सध्याच्या वातावरणाचा या व्हिडिओवर प्रभाव आहे. शाळेतल्या २२ वर्षांच्या नोकरीदरम्यान गेल्या सात-आठ वर्षांत िवद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्या वागणुकीत पडलेला फरक प्रकर्षाने जाणवतो. हा व्हिडिओ विचार करायला लावणारा आहे.
- अरुणा कुलकर्णी ,शिक्षिका, सोलापूर

दोन्ही व्हिडिओ हे सध्याच्या पिढीचे प्रतिबिंब आहेत. पाहायला छान वाटते; परंतु काही गोष्टी धोकादायक वाटतात. प्रत्येक जिवंत व्यक्ती एक सशक्त, शांतताप्रिय माणूस आहे, त्याच्या भौतिक सुखांना इतके महत्त्व द्यावे का, असे मनात आले. अनेक स्त्रिया स्वत:ला कमी समजत असतात, आपल्या सर्वांना मतं आहेत, वैयक्तिक व सामाजिक पातळीवर इतरांच्याही मतांचा विचार केला पाहिजे. बेधुंद जगता येईल, पण परिणामांचाही विचार हवा. पुरुष म्हणतो, माय चाॅइस, त्याला भोगवटा नाही. स्त्रीचे काय, तिच्या वागण्यातून जो दुष्परिणाम तिला भोगावा लागताे, त्यातून जो जीव जन्माला येतो, त्याचे काय?
- डाॅ. पद्मश्री भोजे, प्राध्यापक

बदल स्वीकारला पाहिजे
अजूनही आपल्याकडे स्त्रीला मान नाही, तिचे स्थान दुय्यमच आहे. पुरुषांची मनं जशी समजून घेतली जातात, तशी स्त्रियांचीही समजून घेतली पाहिजेत. मी पुरुष आहे म्हणून काहीही करू शकतो, हा विचार चुकीचा आहे. पण स्त्री व पुरुष यांच्या वैयक्तिक, मानसिक गरजा ओळखून वागले पाहिजे. स्वातंत्र्याचा उपभोग घेताना स्वैराचार नसावा. बदल झपाट्याने होत आहेत व ते त्याच झपाट्याने स्वीकारले, अंगीकारले पाहिजेत.
- प्रीती श्रीराम ,सामाजिक कार्यकर्त्या

हा विचार रूढ होतोय..
मुली व महिलांना त्यांचे मत मांडण्याचे धाडस आता येऊ लागले आहे. तिला तिचे करिअर, छंद, शिक्षण निवडण्याचा व त्यात स्वत:ला सिद्ध करण्याचा अधिकार आहे, हे तिला आता स्पष्ट कळले आहे. समाजातही हा विचार रूढ होतो आहे. स्त्री तिच्यातला बदल, वाढती हिंमत, धाडस, ताकद सर्व दाखवू इच्छितेय, हेही तितकंच खरं आहे.
- पौर्णिमा धुळराव

बंधने नकोत, मर्यादा हव्यात
हा व्हिडिओ पाहताना मनात अनेक भावभावनांनी एकच गर्दी केली. प्रत्येकाला स्वातंत्र्य हवंय, ते असावं हे मान्य. पण माय चाॅइसच्या नावाखाली सर्वांनीच वाट्टेल तसं जगायचं ठरवलं तर परिस्थिती कठीण होईल. स्त्रीच्या वागण्याला मर्यादा हव्यात, पण बंधने नकोत. स्त्री-पुरुष समानतेवर फक्त भाष्य नको, प्रत्यक्ष कृती हवी.
- संध्या बिराजदार

स्वातंत्र्याचा योग्य उपयोग हवा..
स्त्री व पुरुष दोघांनाही आपापले विचार व्यक्त करण्याचे अधिकार आहेत; पण त्या अधिकारांचा दोघांनीही चांगल्या रीतीने उपयोग केला तर चांगला समाज घडू शकतो. पण दुरुपयोग केला, तर आपली संस्कृती रसातळाला जायला वेळ लागणार नाही.
- प्रियांका भट, नोकरी

परस्परांना स्पेस देणं आवश्यक
दोन्ही व्हिडिओ पाहिले. दोन्ही बरोबर वाटले. मी काय करायचं, काय नाही, माझे विचार काय असावेत, काय नाही, हे मीच ठरवणार. मुलांनी व मुलींनी एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना पुरेशी स्पेस देणं आणि विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
- सुवर्णा उंडाळे ,लेखिका

अकोला
हे सक्षमीकरण नव्हे
असे करणे म्हणजेच सक्षमीकरण नाही. अनेक गोष्टी, मार्ग आहेत स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्याचे. मुळात स्त्री- पुरुष समानता आहे. आपल्या समाजात पुरुष व महिलांना समान वागणूक आहे. त्यामुळे पुरुषसुद्धा हा व्हिडिओ पाहून हेच सगळे मुद्दे मांडून म्हणू शकतात की, इट्स माय चॉइस.आम्हीपण काहीही करू शकतो. पुरुषांनी आणि महिलांनी स्वतंत्रपणे वागावं, त्यांना स्वातंत्र्य आहे. पण त्याचा अर्थ स्वैराचार नव्हे. दोघांनी भारतीय परंपरेनुसार आपल्या मर्यादांचे पालन केले पाहिजे. आपल्या संस्कृतीचं रक्षण केलं पाहिजे.
- अश्विनी हातवळणे ,माजी महापौर

पण राइट चॉइस हवी.
Life is a matter of choice and preferences. त्याचमुळे आपण निवड करण्यावरच आपले आयुष्य अवलंबून असते. आज केलेला चॉइस हा आजपासून दहा-पंधरा वर्षांनंतर चुकीचा ठरू शकतो; पण म्हणूनच आयुष्याला वेगळी वळणे देणाऱ्या प्रत्येक टप्प्यावर सतत नवीन निवड करणे कितपत योग्य ठरेल? सतत अस्थिरतेमुळेही मनुष्य निराश होऊ शकतो. ‘माय चॉइस’पेक्षा ‘राइट चॉइस’वर जास्त भर दिला पाहिजे.
- अंजली कडलासकर, मुख्याध्यापिका

समाजावरचा विश्वास उडेल
या प्रकारच्या व्हिडिओमुळे टीनएजर मुलेमुली तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावी असणाऱ्या मुलामुलींवरचा समाजाचा विश्वास उडेल व भावी पिढीवर त्याचा विपरीत परिणाम होईल, असे माझे मत आहे. या अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे कौटुंबिक एकात्मता मोडकळीस येईल. माझा या माय चॉइससारख्या व्हिडिओला विरोध आहे.
- अॅड. सुभाष मुंगी, वकील

हा तर स्वैराचार
ही क्लिप म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुढची म्हणजे स्वैराचाराची स्टेप आहे. त्यामधील सेक्स आणि वैवाहिक जीवन या बाबतची मते समाजजीवनाला तडा देणारी आहे. या मनमानीतून निर्माण होणारे जे प्रश्न असतील तर ते कसे सोडवायचे? त्यातून जर कायद्याचे, नियमांचे उल्लंघन झाले तर त्याची जबाबदारी कुणी घ्यायची? स्वत:च्या अतिरेकी व्यक्तिस्वातंत्र्याचे स्तोम माजवताना सुदृढ आणि निकोप समाज जीवनात धक्का लावण्याचा अधिकार आपल्या देशात तरी कुणी घेऊ शकत नाही.
- अॅड. मनीषा कुळकर्णी, वकील

नियम पाळावेच लागतात
खरं तर माणूस हा individual असला तरी तो सामाजिक प्राणी आहे हे विसरून चालणार नाही. I am the universe हे खरे आहे; पण माणूस या विश्वाचा एक घटक आहे हेही खरे. प्रत्येकाच्या बोटांचे ठसे वेगवेगळे असले, अावडी-निवडी, विचार वेगवेगळे असले तरी तो मानवी समाजात राहत असल्याने समाजाचे काही संकेत, नियम हे त्याला जाणावेच लागतात.
- डॉ. मोहन खडसे ,प्राध्यापक

आशयघन विचारांची गरज
एका विशिष्ट महानगरीय जीवनशैलीत जीवन असल्यागत स्त्रियांचे अस्तित्व मर्यादित विषयांमध्ये गुरफटल्यासारखे वाटते. स्त्रियांच्या प्रश्नांबाबत आशयघन विचारांची आवश्यकता आहे. ‘माय चॉइस’मध्ये मात्र त्याचा अभाव जाणवतो. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण जीवन समृद्ध करणे, यापासून देशोदेशातील प्रतिनिधित्व करणे, त्यांच्या प्रश्नांचा उहापोह करणे कोठेच दिसत नाही.
- प्रा. प्रदीप अवचार ,युवा विचार समन्वयक

जळगाव
स्त्रीमनाचे प्रातिनिधिक स्वरूप
माय चाॅइसची अास समजायला हवी. हे व्यक्त हाेणे तिचे एकटीचे नाही तर तिच्या अाईचे, अाजीचे, मावशीचे अाजूबाजूच्या स्त्रीिवश्वाचे अाहे. हे दाेघांच्या िपढीला समंजस माणूसपणाकडे नेण्यास कारणीभूत ठरेल.
- प्रा. डाॅ. शामा सुबाेध.

स्वत: मर्यादा आखाव्यात
प्रत्येक व्यक्ती, समाज अाणि कुटुंबाच्या काही मर्यादा असतात. जर अापल्या कुटुंबाचे मत बदलून त्यांच्या संमतीने जर जगण्याची परवानगी तिला किंवा त्याला मिळाली तर त्यात काही गैर नाहीये. फ्री माइंडेड असणे चांगले अाहे, पण अापल्या स्वत:ची मर्यादा अापणच अाखून घ्यायला हवी.
- दीपा कक्कड, फॅशन डिझाइनर

मानसिकता बदलण्याची गरज
स्त्री अायुष्यात हे स्वातंत्र्य कसे घेते यावर सर्व अवलंबून अाहे. स्वातंत्र्यामुळे गुन्हेगारी वाढली म्हणतात, पण तसे नाही. मानसिकता बदलण्याची गरज अाहे.
- िवदेहा जैन, इनरव्हील न्यू जे क्लब अध्यक्ष

स्वातंत्र्यासोबत मर्यादा हवी
स्वातंत्र्य महिलांना हवेच, पण त्याचीही मर्यादा अाहे. अापल्या संस्कृतीत नातेसंबंध जपणे महत्त्वाचे. त्यामुळे ते लग्नाअगाेदर रिलेशन ठेवण्याचे सांगणे हे याेग्य नाही. जर हेच पुरुष म्हणाले तर अापण चिडताेच ना, मग महिलांनी तरी का करावे?
- साेनाली मुथा

स्त्री तयार होणार नाही
शारीरिक मुद्द्यांएेवजी इतर मुद्द्यांकडे लक्ष वेधायला हवे. अावडीप्रमाणेच महिला प्रत्येक गाेष्ट करीत असतात. या व्हिडिअाेतील शारीरिक संबंधांची गाेष्ट मात्र चुकीची अाहे, ज्याला भारतीय स्त्री नाही तयार हाेणार.
- अनिता पाटील, अाेरिअाॅन सीबीएसई स्कूल

शैक्षणिक जागृती हवी
यापेक्षा महिलांना शिक्षणाने जागृत करा, त्यांचे हक्क अगाेदर समाजात काय अाहे याने जागृत करा. हे सगळे पाश्चात्त्यांमध्ये चालत असेल, अापल्यात नाही.
- सुषमा कंची, प्राचार्य

मानसिकता बदलण्याची गरज
स्त्रीने जर काही बाेल्ड पद्धतीने िवधाने केली तर ती चुकीची का ठरवली जातात? तर हेल्दी घेऊन प्रत्येकाने ठरवायचे की चांगले अाणि वाईट काय अाहे व काय घ्यायचे. हा व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग अाहे.
- वंदना मुळे, नाेकरदार महिला
madhurimadm@gmail.com