आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई व मुलीतील प्रेमाची गुंफण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुट्टीचे दिवस संपत आले होते. आता शाळा सुरू होणार म्हणून उत्साह होता. पण शाळा सुरू झाल्यावर मुलींना जास्त वेळ देऊ शकणार नाही म्हणून थोडंसं वाईट वाटत होतं. पण सुट्टी मस्त गेली म्हणून त्या आनंदात होत्या. मी मुलींना म्हणलं, ‘उद्यापासून माझी शाळा सुरू होणार.’ दोघी थोड्या खट्टू झाल्या, पण लागलीच म्हणाल्या, ‘चालेल चालेल. आम्ही दोघी मज्जा करू घरी.’ पण तेवढ्यात धाकटी मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणते कशी, ‘आई मी तुला सांगेन हं, आम्ही काय मज्जा केली ती. तुला माहिती नं मी तुला सांगितल नाही की माझं पोट दुखतं,’ आणि हसत पळाली. किती निरागस असतं हे वय.

काळ अचानक खूप वर्षं मागं गेल्यासारखा वाटला. मीही माझ्या आईला अशीच म्हणायचे. अगदी मोठी होईपर्यंत. मला सगळ्याजणी आईचं बाळ म्हणून चिडवायच्या. पण माझी आई मला नेहमी सांगायची, आईत व मुलीत मैत्रीचं नात असावं, ते जास्त मजबूत असतं.

किती सुंदर नातं असतं आईचं व मुलीचं, अगदी हळुवार फुलणारं. त्याची सुरुवात अगदी मूल गर्भात असल्यापासून होते. मी आई होणार ही भावनाच मोहून टाकणारी असते. आई होणं, तो नऊ महिन्यांचा प्रवास आणि त्यानंतर आपलं बाळ आपल्या कुशीत पहिल्यांदा येणं या भावना शब्दांत मांडणं अवघड आहे. मुली लहान असताना त्यांच्या बरोबर खेळणं, त्यांचं रुसणं, त्यांना समजावणं... खूप गंमत असते त्यात. आपलंच प्रतिबिंब आपण त्यांच्यात पाहायला लागतो. माझी मोठी मुलगी ३/४ वर्षांची असल्यापासून मी नोकरी करते. सुरुवातीला मी शाळेतून येण्याच्या वेळेस खिडकीत उभी राहून अगदी चातकासारखी ती माझी वाट पाहायची. आल्या आल्या बिलगून अगदी दिवसभरात मी तुझी कितीदा आठवण केली हे सांगायची, शाळेत आणि घरी काय केलं ही इत्थंभूत माहिती द्यायची. तो वेळ फक्त तिचा असायचा. ऐकलं नाही एखाद्या दिवशी की, बाईसाहेब रुसून बसायच्या. एकीचं करता करता दोघी झाल्या. आता मोठीचं जग खूप वेगळं झालं. तिचं जग म्हणजे तिच्या मित्र-मैत्रिणी. पण तीसुध्दा दिवसभरात काय झालं हे मला येऊन सांगते.

मला आठवतं काॅलेजमधनं यायला उशीर झाला की, आई बेचैन व्हायची. घरी आले की, पहिला प्रश्न असायचा, ‘उशीर का झाला?’ तिला मी म्हणलं की, ‘अगं, एवढी काळजी करत जाऊ नकोस.’ तेव्हा ती म्हणायची, ‘तू आई झालीस की तुला कळेल.’ आईच्या त्या प्रत्येक प्रश्नाचा, त्या मागच्या काळजीचा अनुभव मी आता घेत आहे.
बातम्या आणखी आहेत...