आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंग काळा आगळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाल, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, केशरी हे सारे रंग आपला होळीचा उत्साह वाढवतात. या रंगात आपण न्हाऊन निघतोच, पण त्याचबरोबर आपण काळ्या रंगाला वाईट किंवा अशुभ मानणे सोडून द्यायला हवे. काळा रंग आहे म्हणून पांढऱ्या व इतर अगणित रंगांचे महत्त्व!

देवाने आपल्याला डोळे दिलेत आणि निसर्गाने सभोवती रंग उधळलेत. लाल, हिरवा, पिवळा, केशरी, निळाजांभळा आणि कितीतरी. त्या रंगांचा आनंद मनसोक्त लुटायला आपण शिकतो अगदी लहानपणीच. आग ओकणाऱ्या सूर्याच्या तापाने तृषार्त झालेल्या धरित्रीवर म्हणजेच आपल्या काळ्या आईच्या अंगावर काळा मेघ सहस्रधारांनी वर्षतो. त्याच्या पखालीतले ते जीवन काळी आई ओंजळी भरभरून घेते, तिच्या उदरात साठवते. मग सुरू होतो सृजनाचा अनेकरंगी उत्सव! तिच्या उदरातलं बियाणं लालहिरव्या कोंभांमधून जग पाहायला बाहेर पडतं. हिरव्या पोपटी रंगांचे तृणांकुर काळ्या आईच्या अंगावर खेळायला लागतात. पाहतापाहता सरकतात, रांगतात आणि काळ्या आईला हिरव्या शालीत लपेटतात. या काळ्या आईच्या उदरातून आधीच जन्म घेतलेली आणि भरपूर वाढलेली झाडेझुडपेही वेगवेगळे रंग उधळतात, फुलांच्या आणि फळांच्या रूपाने. गुलाबी पिवळे गुलाब, लाल केशरी जास्वंदी, पांढरी पिवळी शेवंती, पांढरी तगर, जाई, जुई, इ. रंगांच्या शर्यतीत फुलांबरोबर फळेही असतात. पिवळी केशरी पपई, आंबे, हिरवेगार पेरू, लाल स्ट्राॅबेरी, जांभळी जांभळे, आणि कितीतरी. हा रंगांचा उत्सव साकारतो काळ्या आईच्या कुशीतून!

रात्रीचा काळा रंगच दाखवतो नक्षत्रांची आभाळभर रेखलेली रांगोळी आणि शत शत चांदण्यांचे ते लुकलुकणारे ठिपके. रात्र काळी नसती तर दिसली असती का ही ठिपक्यांची नक्षी? रात्रीचा काळा अंधारच देतो दिवसभर थकलेल्या डोळ्यांना विश्रांती. नवविवाहितांना संक्रांतीला खुलविते ती काळी चंद्रकळा. प्रेमळ आई आपल्या सानुल्या बाळाच्या गालावर काजळाचे बोट उमटवत असते, आणि त्या काळ्या रंगावर जबाबदारी सोपवते आपल्या बाळाला वाईट नजरांपासून वाचवण्याची! मंगळसूत्रातही काळे मणीच असतात. केस काळे कुळकुळीत असणे म्हणजे कित्ती छान. अगदी रंग लावूनही केस काळे केले जातात. काळेभोर डोळे मुखकमलाची शोभा वाढवतात. आपल्या मंजुळ कूजनाने कान तृप्त करणारा कोकीळही काळाच. गोपींना वेड लावणारा कृष्णही आणि मर्यादापुरुषोत्तम रामही काळेसावळेच. त्यांच्या जीवनकार्यात काळ्या रंगाने काही बाधा आणली नाही. मग अशा काळ्या रंगाला आपण अशुभ का मानतो? या काळ्या रंगावर आपला राग का बरं?

लग्नाच्या बाजारातून तर याला पार हद्दपार केलेे आहे. सगळ्या लग्नाळू मुलांना मुलगी गोरीच हवी असते. रंग त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचा आरसा थोडाच असतो? कातडीचा रंग कोणाच्याही हातात नाही, तो अानुवंशिक आहे. या काळ्या रंगाचा न्यूनगंड वाटावा, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यात भर घालतात चार दिवसांत गोरेपण देणाऱ्या क्रीमच्या जाहिराती. पण असल्या उसनवारीपेक्षा मूलरंग महत्त्वाचा. आपल्या नितांतसुंदर अभिनयाने नाट्य व सिनेसृष्टी गाजवणाऱ्या काळ्यासावळ्या अभिनेत्रींचं गारूड नाही का वर्षानुवर्षं आपल्यावर आहे?

हे आठवण्याचे कारण उद्याचा हाेलिकोत्सव. लाल, हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, गुलाबी, केशरी हे सारे रंग आपला होळीचा उत्साह वाढवतात. या रंगात आपण न्हाऊन निघतोच, पण त्याचबरोबर आपण काळ्या रंगाला वाईट किंवा अशुभ मानणे सोडून द्यायला हवे. काळा रंग आहे म्हणून पांढऱ्या व इतर अगणित रंगांचे महत्त्व!

jopratibha@gmail.com
बातम्या आणखी आहेत...