आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्येक ओंजळीमागे असतेच झऱ्याचे पाणी (कव्हर स्टोरी)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाणी. म्हणजे जीवन. तेच साजरं करण्याचा आजचा दिवस. पण ते साजरं करताना आपण पाण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून त्याला पृथ्वीवरून नाहीसं करतोय की काय? यापेक्षा वेगळं काही करता येईल का आपल्याला?

बावीस मार्च हा जागतिक जल दिवस. पण हाच दिवस का? तर संयुक्त राष्ट्र संघाने ठरवले म्हणून. UNतर्फे अनेक दिवस साजरा केले जातात, काहींच्या मागे कथा, काही कारणे असतात तर काहींच्या मागे कथा वगैरे काही नसते. तर १९९३पासून आपण जागतिक जल दिवस साजरा करतो. चांगलेच आहे. जगात एक दिवस विविध देश, विविध प्रांत पाण्याविषयी बोलू शकतात, एक क्षण थांबून त्याबद्दल विचार करू शकतात, एकत्र येऊन आपली अशी पाण्याची स्वतंत्र भाषा बोलू शकतात. एकत्र कामांना बळ मिळते, प्रयत्नांना व्यासपीठ मिळते, विचारमंथन होते. वगैरे वगैरे.

खरे तर भारतात रोज आपण पाणी दिवस साजरा करू शकू. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असे नाही म्हणत मी. पण “पाणी दिवस” ऐकायला विचित्र वाटते की नाही? कारण आपल्याकडे, जसे अनेक इतरही देशांत, लोकसंस्कृतीतून उगवल्यामुळे पाणी हे नुसते वापरायचे “संसाधन” न राहता परिसंस्थेचा भाग म्हणून येते. नदीचे पाणी, भूगर्भातले पाणी, पावसाचे पाणी अशी कोंदणे या आकारविहीन, गंधविहीन पदार्थाला सगुणत्व देतात आणि पाण्याचा विचार त्या परिसंस्थेचा विचार म्हणून पुढे येतो. हे बऱ्यापैकी धर्माने बांधलेले असले तरी एकाच धर्माची ही मक्तेदारी नाही. जसे आपल्याकडे कृष्णामाई उत्सव आहे, तसे सिक्कीममध्ये, किंवा शेजारच्या भूतानमध्ये अनेक पवित्र नद्या आहेत, तलाव आहेत ज्यांना प्रार्थनेच्या रंगीबेरंगी ध्वजांनी बांधले आहे. तिथले पाणी दूषित करणे सोडाच, ते वापरण्याचेही नियम आहेत. प्रवाहाला कसे मूर्त रूप दिले आहे बघा, छोट्या बौद्ध मंदिरांमधले प्रार्थनेचे चक्र, हे त्या समाधीखालून वाहणाऱ्या झऱ्याच्या प्रवाहाने अविरत फिरत असते! किंवा अरुणाचल प्रदेशमध्ये तवांग प्रांतात नद्यांना, त्यांच्या तीरावर येणाऱ्या पक्ष्यांना दूत समजले जाते. इथे मासेमारी होत नाही, Black Necked Crane हे पक्षी न्यामजांग-छु नदीच्या तीरावर हिवाळ्यात आपला संसार थाटायला आले की, इथले मोन्पा बुद्ध अतिशय आनंदी होतात कारण त्यांच्यासाठी हे क्रौंच फक्त वैज्ञानिकदृष्ट्या Critically Threatened/ नामशेष होऊ घातलेले पक्षी नाहीत, तर त्यांच्या लाडक्या सहाव्या दलाई लामाचे पंख असलेले दूत आहेत! या पक्ष्यांचे आगमन साजरे केले जाते आणि नदीतच्या पात्रातला त्यांचा अधिवास जपला जातो. तर आता तिथे ७८० मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प प्रस्तावित आहे, ज्यामुळे हा अधिवासच नष्ट होईल. भांबावलेले मोन्पा चार दिवसांची यात्रा करून दिल्लीला आले, आपली कथा सरकारला सांगायचा प्रयत्न त्यांनी केला. पण राजस्थानच्या भिल्वारा गटाचा प्रकल्प अरुणाचलच्या दूरस्थ कोपऱ्यापर्यंत रेटलाच जात आहे. मोन्पांची भाषा वेगळी, आपली वेगळी. ते नदीशी त्यांच्या ऋणानुबंधाचे बोलतात, आपण जलविद्युत निर्मितीतून पैशाचे बोलतो.

थोडक्यात नदीचा, भूगर्भाचा उत्सव आपल्यासाठी नवा नाही. महाराष्ट्रातच बघा कृष्णामाई उत्सव आहे, आमच्या गोदावरी काठचा कुंभ आहे, भीमेच्या तीरावर खेळ मांडणारी वारी आहे, पैठणात होणारा माघ पौर्णिमेचा उत्सव आहे, त्रिपुरारी पौर्णिमेला सजणारा पंचगंगेचा घाट आहे. विदर्भातल्या गोंड आदिवासींचे वैनगंगा (वनगंगा!), कठाणी अशा नद्यांवर वसलेले पवित्र देवडोह आहेत. त्याचबरोबर पश्चिम घाटातल्या छोट्या अलवार नद्यांच्या काठचे पवित्र माश्यांचे डोह आहेत. इथली दैवते वेगळी वेगळी, निसर्गाच्या जवळची. महाडजवळच्या काळ नदीवरील वाळेन कोंढ येथे एक अद्भुत डोह आहे ज्यात हातभार लांब माहसीर मासे निश्चिंतपणे विहरत असतात. तसे बघितले तर हे मासे Endangered, संरक्षित, पण इथे ते नदीतून वर आलेल्या वरदायिनी मातेची मुले आहेत. नदीची पातळी खालावली तर शेजारच्या दापोली गावातले लोक चिंतेत पडतात. आता या पोरांचे कसे व्हायचे... पण पोरं शहाणी. पातळी कमी झाली की नदीतल्या खोल डोहात सगळे दडून बसतात, पावसाळ्याची वाट बघत. आदिम प्रेरणाच ती. आता आपण या डोहाच्या तीन किमीवर एक मोठे धरण बांधत आहोत. काळ-कुंभे जलविद्युत प्रकल्प. अर्धवट पडलेला हा प्रकल्प कदाचित भारतातील सगळ्यात महाग, निकामी आणि भ्रष्टाचाराने बरबटलेला प्रकल्प असेल, ज्यात कंत्राटदार आणि कृपाळू सरकारी एजंट सोडून कोणाचाच फायदा नाही. जेव्हा हे धरण काळ नदीला थांबवेल, तेव्हा खालचे शहाणे मासे सुकणाऱ्या डोहात दडतील खरे, पण हा दुष्काळ त्यांच्यासाठी न संपणारा असेल. असे अनेक डोह आपण गमावलेले आहेत.

फक्त नदीचा उत्सव होतो असेही नाही. कोकणात अजूनही अक्षय्य तृतीयेच्या आसपास विहिरींची, आडांची पूजा होते. इथल्या तिथल्या “पाण्याची” (उंबराचे पाणी, दारचे पाणी, इत्यादी) साफसफाई होते, पाणी कमी झालेल्या स्रोतांमधला गाळ सामूहिकरीत्या उपसला जातो, बंद बंदिस्ती होते. हा दर वर्षीचा अक्षय्य तृतीयेचा बेत. दाभोळजवळच्या वाशिष्ठी नदीलगतच्या एका बारक्या वाडीत ‘दारचे पाणी’ ही भूजलव्यवस्था आहे. जांभ्याच्या सड्यावरचे पाणी झिरपत जाते आणि एका ठिकाणी अवतरते. तिथे त्याला खेळवले आहे.
विविध स्तरांवर पाच ओबडधोबड कुंड आहेत. जिथे पाणी अवतरते ते पहिले देव कुंड. चुकूनही तिथे कपडे धुतले जात नाहीत की, अंघोळ केली जात नाही. गावात लग्न झाले की, जोडपे आधी या गर्द राईच्या कुंडापाशी येते, त्याची विडा सुपारी ठेवून पूजा करते. मग खालचा डोह पिण्याच्या पाण्याचा, त्याखाली जितराबांसाठी आणि त्यानंतर कपडे धुवायचा आणि अंघोळ करायचा. अशा जिवंत, जपलेल्या व्यवस्था कोकणात अनेक ठिकाणी दिसतात.
कोरड्या उस्मानाबादमध्येदेखील बारवी केवळ कोरीव काम केलेल्या पाण्याच्या विहिरी नाहीत. चिंचोलीतल्या अशोकभाऊ पवारांच्या आजोबांनी बांधलेली बारव आज कोरडी आहे. पण पायऱ्या उतरून आत शिरले की खाली कोनाड्यात शिवलिंग आहे, गणपती आहेत. पहिल्या घागरीचा मान त्याचा. अंघोळ झाल्याशिवाय बारवीत पाय ठेवायला कोणी धजत नसत, मग ती खराब करणे दूरच राहिले.

जागतिक पाणी दिवशी समोरचा आ वासून उभा राहिलेला दुष्काळ सोडून मी हे सगळे का लिहीत आहे? आपली जीवनरेखा ही फक्त पाणी अशी एकांगी कधीच नव्हती. ती डोंगरातून, जंगलातून, नदीतून, झऱ्यातून वाहायची, भूगर्भातून उसळायची. आणि आजही तसेच आहे. पण आपण पाण्याला त्याच्या या नैसर्गिक कोंदणातून ओरबाडून, कोंदणाला रद्दबातल ठरवून, पाण्याला एक वापरण्यायोग्य संसाधन म्हणून बघत आहोत. नद्या कोरड्या झाल्या, विषाने भरल्या, झऱ्यांचे ‘सरळीकरण’ (पर्यावरणदृष्ट्या क्लेशकारक शब्द), पुनरुज्जीवनाच्या नावाखाली नद्या कालव्यासारख्या सरळसोट होत आहेत (काहींना आपण कालवे म्हणायला लागलो!), विहिरी बुजल्या, बारवी निकामी झाल्या, शहरातल्या विहिरींना पवित्र वगैरे सोडाच, ब्याद म्हणून बघण्यात आले. (“छ्या, foundationमध्ये पाणी घुसते!”)

आज जगभरात दिसते आहे की, परिसंस्थेचा विचार पाण्याबरोबर आला तर जलव्यवस्थापन जास्त समावेशक, परिणामकारक आणि शाश्वत होते. त्याशिवाय नाही. आज आपली मंदिरे, श्रद्धास्थाने बदलली, नदी तटावरील शंकराच्या, साती आसरांच्या स्थानातून ती धरणात गेली. व्यवस्था दूरच्या हातात गेली आणि आपणही त्यापासून सुटंग झालो. पण Water is everybody’s business. असे अलिप्त होणे आपल्याला परवडणारे नाही, त्यामुळेच महाराष्ट्रातील जलव्यवस्थापनाचा, त्यातील कायद्याच्या राज्याचा बट्ट्याबोळ झाला. हे ना ग्रामीण भागासाठी चांगले आहे, ना शहरांसाठी.
जागतिक पाणी दिवशी आपण पाण्याचे, नद्यांचे, भूजलाचे नाते स्मरून आपल्या नदीवर, भूजलावर काम करायचे ठरवले तर ते मौल्यवान ठरेल. शेवटी कुठलेही पाणी हे नुसते पाणी नसते. एका जिवंत परिसंस्थेचे ते फलित असते. ग्रेस म्हणतात तसे “प्रत्येक ओंजळीमागे, असतेच झऱ्याचे पाणी.”

(लेखिका साउथ एशियन नेटवर्क आॅन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल SANDRP या संघटनेच्या साहायक समन्वयक आहेत.)
parineeta.dandekar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...