आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला सभा ग्रामविकासाची नांदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला दिनाचे सोहळे अनेक होत असतात. परंतु या निमित्ताने अमरावती जिल्ह्यातल्या एका छाेट्या गावात झालेली ग्रामसभा जरा वेगळी म्हणता येईल. या सभेतून महिलांचे प्रबोधन तर झालेच, परंतु गावातील सामाजिक अारोग्याचीही तपासणी झाली.

जागतिक महिला दिन जगभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होतो. परंतु भारतासारख्या देशात ग्रामीण भागात असे दिवस सामान्य महिलांना येतात केव्हा, जातात केव्हा, माहीतही नसते. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमध्ये पर्यावरण विभाग पुरस्कृत व ‘पर्यावरण शिक्षण केंद्र - मध्य भारत’ या संस्थेच्या सहयोगाने पर्यावरण सेवा योजना सुरू आहे. शाळा पातळीवर ५० विद्यार्थी आणि शिक्षक असा पर्यावरण सेवा योजना गट स्थापन करून घनकचरा, स्वच्छता, पाणी, जैवविविधता, ऊर्जा आणि शेती अशा विविध विषयांत काम केले जात आहे.

२०१५-१६ या शैक्षणिक वर्षात नवीन सहभागी शाळांच्या माध्यमातून नुकताच या योजनेचा भाग म्हणून गाव पर्यावरणीय जलद सर्वेक्षण करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून ग्रामसभा बंधनकारक आहेत. गावाच्या विकासामध्ये लोकसहभाग महत्त्वाचा असतो. त्यासाठी या ग्रामसभा होणे आवश्यक असते. १ मे, २० जुलै, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर, १६ जानेवारी या ग्रामसभेच्या महत्त्वाच्या तारखा आहेत, हे गावातल्या विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणातून कळले. या ग्रामसभेमध्ये अजूनही महिलांचा सहभाग नगण्य आहे. सरपंच महिला असली तरी त्या महिलेचा नवराच अनेकदा ग्रामपंचायतीचा कारभार बघतो. त्यामुळे नुकतंच शासनाने गावातील महिलांचाही सहभाग या निर्णय प्रक्रियेमध्ये असावा यासाठी ‘महिला सभा’ घ्याव्या असा निर्णय घेतला. त्यामुळे पर्यावरण सेवा योजनेच्या गावातील मुली तसेच त्यांच्या आया, ग्राम पंचायत महिला प्रतिनिधी यांची मिळून महिला दिनाच्या दिवशी सभा घ्यावी असा विचार आला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव (खंडेश्वर) तालुक्यातील सारसी (कोठोडा) गावातील माध्यमिक विद्यालयाचे पर्यावरण सेवा योजना प्रमुख काळे सर, पर्यावरण शिक्षण केंद्राचे कार्यक्रम समन्वयक अविनाश मधाळे, सरपंच रेखाबाई दहातोंडे, उपसरपंच भूमिकाताई धंदर, ग्रा.पं. सदस्य जीवनराव धंदर यांनी कार्यक्रमाची जबाबदारी घेतली. त्यानुसार महिला दिनी गावाच्या पद्धतीनुसार सभा झाली. नऊ महिला, पाच पुरुष, माध्यमिक विद्यालयातील तीन मुली व पाच मुलगे ग्रामसभेला उपस्थित होते. सार्सी गावात १० महिला बचत गट आहेत. या गटांमार्फत पैसे जमा करून अडीअडचणीच्या वेळी वाटले जातात, तसेच कर्ज स्वरूपाने दिले जातात. मात्र गावात महिला बचत गटाच्या मध्यमातून एकही लघुउद्योग, व्यवसाय नाही. याचे कारण विचारता महिलांनी उद्योग व व्यवसाय करण्याची मानसिकता नाही, कौशल्य नाही, तसेच योग्य मार्गदर्शन नाही असे सांगितले. पारगाव, ता. दौंड, येथील नव निर्माण न्यासच्या अध्यक्ष वसुधा सरदार यांनी सेंद्रिय सेतू महिला बचत गटाच्या माध्यमातून २०० गट तयार केले असून या बचत गटांच्या यशोगाथेवर चर्चा झाली. नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित कसे लघुउद्योग करता येतील, याचेही मार्गदर्शन महिलांना केले.
काटेसावरीच्या कापसापासून रायगड जिल्ह्यातील कातकरी महिलांनी शोभेच्या वस्तू तयार करण्यचा छोटा उद्योग सुरू केला. तुळजापूरच्या महिलांनी तुळजाभवानी देवस्थानात भाविकांनी वाहिलेल्या व वाया जाणाऱ्या नारळाच्या शेंडीपासून पायपुसणी, दोरी बनवण्याचा लघुउद्योग केला. अशा यशोगाथांची माहिती या ग्रामसभेचा मार्गदर्शक म्हणून महिलांना दिली.

आदिवासी, अनु. जाती, जमातीमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण संतुलित आहे. परंतु आर्थिक परिस्थितीने व शिक्षणाने प्रगत खुल्या प्रवर्गात, समाजात स्त्री- पुरुष गुणोत्तरामध्ये १०७ एवढी मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे मुलीही महत्त्वाच्या आहेत, या विषयावर आपण येथे शाळेच्या मुलांच्या माध्यमातून जनजागृती करू शकतो, असे लक्षात आले. एका ‘निसर्गकिशोर’ नावाच्या कवीने समर्पक लिहिले आहे...

दुर्दैव या स्त्रीपूजक भारतभूचे
‘मुलगी वाचवा मुलगी जगवा’ हे घोष आजचे
मुलगा मुलगी समान मानून
स्त्री पुरुष समानतेत उज्ज्वल भविष्य उद्याचे.

कुपोषण या गावातील समस्येकडे या निमित्ताने लक्ष वेधता आले. ‘वंशाचा दिवा मुलगा’ अशा मानसिकतेमुळे मुलींकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे ‘भारतातील प्रतिभावंत महिला’ या आशाराणी व्होरा लिखित पुस्तकातील मुलींचे उदारहण उपस्थित महिलांना दिले. यावरसुद्धा चांगली चर्चा झाली. जागतिक आरोग्य संघटनेने कुपोषणावर उपाय म्हणून शेवगा हे झाड सुचवले आहे कारण शेवग्याची पाने, शेंगा आहारात उत्तम पोषणमूल्य वाढवतात, ही माहिती मिळाली.
या महिला दिनाच्या निमित्ताने झालेल्या सभेत समानता, बचत गट व्यवसाय अनुभव, आर्थिक सक्षमीकरण तसेच शिक्षणाचे विचार मुलांपर्यंत, त्यांच्या आयांपर्यंत पोहचले. त्या निमित्ताने विद्यार्थी, शिक्षक आणि पालक असा संवादही येथे घडून आला.

dhananjay.sayre@ceeindia.org
बातम्या आणखी आहेत...