आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा जगास्तव काय कुढावे (कथा)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संक्रांत. ऋतुसंक्रमणाचा अर्थात परिवर्तनाचा दिवस. सवाष्णींचा मानल्या जाणाऱ्या या सणात बहुतांश वेळा दुर्लक्षिल्या जातात त्या घटस्फोटित आणि परित्यक्ता स्त्रिया. मात्र परंपरांचं जोखड झुगारून अशा स्त्रियांनीही स्वत:च्या आनंदाचा विचार करायला हवा. आपल्या मनावरचं नैराश्याचं मळभ झटकून टाकत उपेक्षा आणि सहानुभूतीला थारा न देता उत्साहात जगायला हवं. कथेची नायिका रेवती हेच तर सांगू पाहतेय...
मकरसंक्रांत उद्यावर येऊन ठेपली होती. सोसायटीतील बायकांचा उत्साह ओसंडून वाहात होता. पार्किंगमध्ये भोगविड्याचे हळदीकुंकू देता घेता उद्याच्या हळदीकुंकू समारंभाची चर्चा रंगत होती. कोणती साडी नेसायची, नऊवारी की सहावारी, दागिने कोणते घालायचे, पेशवाई की म्हाळसा पॅटर्न, तिळाचे लाडू करायचे की वड्याच बऱ्या, वाण कोणतं लुटायचं... एक ना दोन.
आपल्या घरात खिडकीशी उभ्या असलेल्या रेवतीच्या कानांवर ही चर्चा सहजच पडत होती आणि तिच्या उदासीनतेत आणखीनच भर पडत होती. तिला मागच्या वर्षीची संक्रांत आठवली. ही अशीच चर्चा तेव्हाही रंगली होती. रेवतीला बोलवावं की नको, या दबक्या स्वरातील कुजबुजीचे, ‘नको बाई, उगीच अपशकून कशाला. सवाष्णींचा सण हा.’ या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचेही तिला ऐकू आले होते. आतापर्यंत आपल्याशी सौजन्याने, सौहार्दाने वागणाऱ्या शेजारणींनी तिला एकदम परकं केलं होतं. आपल्या परिघाबाहेर दूर लोटलं होतं.
रेवतीला तेव्हा खूप वाईट वाटलं होतं. ती स्वत:शीच खूप रडली होती. मुलांनी तिला विचारलं, तेव्हा डोकं दुखण्याचं कारण देऊन तिनं त्यांचं समाधान केलं होतं. प्रत्यक्ष समारंभाच्या वेळी सगळ्या बायका खाली नटून-थटून जमल्या आहेत, हसून-खिदळून एकमेकींना हळदीकुंकू-तिळगूळ देत आहेत, हे पाहून मुलांना राहावलं नाही.
‘आम्ही आईला बोलावून आणतो हं,’ असं त्यांनी म्हणताच, ‘अरे, नको नको,’ असा बायकांचा आवाज न ऐकताच रेवतीला बोलवायला ती धावत वर आली. रेवती एकटीच विमनस्कपणे बसली होती. घरात अंधार होता.
‘आई, अशी का बसलीस गं अंधारात?’
‘आई, नवी साडी नेस नं. चल ना ग खाली. सगळ्या काकू जमल्याहेत बघ तिथं.’
‘अरे, नको नको, माझं डोकं दुखतंय खूप.’
‘आई, चल नं, तुला बरं वाटेल खाली गेल्यावर. प्लीज, चल नं ग.’
‘नको म्हटलं ना, कळत नाही का एकदा सांगितल्यावर. मी येणार नाही आणि तुम्हीही जायचं नाही. अभ्यास करा घरात बसून.’ ती मुलांवर करवादली होती आणि मुलं बिच्चारी आपलं काय चुकलं, हे न कळून भेदरल्यासारखी एका कोपऱ्यात जाऊन उभी राहिली होती.
तीन वर्षांपूर्वी महेशचं अचानक निधन झालं, तेव्हा याच शेजाऱ्यांनी त्या धक्क्यातून सावरायला सर्वतोपरी मदत केली होती. नंतरही तिच्या अडीअडचणींना तेच धावून येत असत. तिला एकटं वाटू नये याची काळजी घेत, तिच्या मुलांसाठी आवर्जून खाऊ पाठवत. सोसायटीत राहायला आल्यापासून महेश-रेवतीनं आपल्या हसतमुखानं मदत करण्याच्या स्वभावानं सर्वांना आपलंसं करून घेतलं होतं. सर्वांनाच ती दोघं हवीहवीशी वाटत.
पण आता सर्व चित्रच पालटलं होतं. महेश असा अवचित अकालीच निघून गेला असला तरी रेवती तीच होती. पण अशा काही विशिष्ट प्रसंगी तिला वगळलं जात होतं. सोसायटीतील काही जणींना तिला आपल्यात सामावून घ्यावं असं वाटतही असे, तसं त्या दबकत बोलूनही दाखवत; पण...
धर्माचा, रूढी, परंपरांचा पगडा इतका घट्ट होता की, तिथं माणुसकी, सहानुभूती, सहवेदनेला काही स्थान नव्हतं. खरंच. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत पुरुषांविना स्त्रियांचं स्थान अजूनही असं उपेक्षितच असावं? बहुतांशी सण, व्रतवैकल्यं फक्त पुरुषांच्या दीर्घायुष्यासाठीच असावीत? स्वत:ला पुरोगामी, सुशिक्षित म्हणवून घेताना, स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारताना वेळ आल्यावर मात्र तो मुखवटा लगेच गळून पडावा? का?
‘बरंय, मग उद्या या गं सगळ्या जणी वेळेवर. ’ कुणीतरी मोठ्या आवाजात बजावलं आणि ‘हो-हो’ म्हणत त्या घरोघरी पांगल्या. त्या आवाजानं रेवती आपल्या विचारशृंखलेतून बाहेर आली.
‘हं. म्हणजे उद्या पुन्हा मागच्या वर्षाचीच पुनरावृत्ती होणार तर.’ रेवती मट््कन खुर्चीवर बसली. तिच्या डोळ्यासमोर मुलांचे केविलवाणे चेहरे उभे राहिले.
थोड्याच वेळात तिच्या चेहऱ्यावर एक निश्चय दिसून आला. ‘असं केलं तर? बस ठरलं.’ ती उठून स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक करता करता तिच्या मनात उद्याचे बेत ठरत होते.
इतक्यात मुलंही शाळेतून आली. त्यांचं सगळं आवरून रात्री जेवताना तिनं त्यांना सांगितलं,
‘चला, होमवर्क करून लवकर झोपा आता. उद्या लवकर उठायचंय आपल्याला.’
‘पण आई, उद्या सुट्टी आहे आम्हाला. संक्रांत आहे ना.’
‘हो, म्हणूनच तर. सरप्राइज आहे तुमच्यासाठी.’
‘सरप्राइज! वॉव.’
दुसऱ्या दिवशी सक्काळीच रेवतीनं उठून आपलं, मुलांचं आवरलं आणि घराला कुलूप लावून ती बाहेर पडली.
‘आई, कुठं चाललोय आपण सकाळी सकाळी?’
‘सुनो बच्चा लोग. तुमची आई तुमच्यावर एकदम प्रसन्न आहे. बोलो. क्या चाहते हो. जो चाहो मांग लो.’ रेवती हसून म्हणाली.
‘आई, खरंच? मला आईस्क्रीम. आई, भेळपुरी. आई, चायनीज...’ मुलांनी एकच कल्ला केला.
‘हो. हो. सगळं सगळं मिळणार.’ आणि तिनं रिक्षाला हात केला.
दिवसभर तिनं आणि मुलांनी मस्त धमाल केली. मुलांच्या मर्जीप्रमाणे तिनं त्यांना मनसोक्त खाऊ-पिऊ घातलं. प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. एक छानसा मजेदार सिनेमासुद्धा बघितला. आणि संध्याकाळ होता होता ती गार्डनमध्ये गेली. मुलं लगेच खेळण्याकडे वळली आणि ती एका बाकावर टेकली.
आज गार्डनमध्ये फारशी वर्दळ नव्हती. स्त्रिया तर जवळपास नव्हत्याच. खरं म्हणजे दिवसभराच्या धावपळीमुळे ती जराशी दमली होती, पण तिचं मन मात्र पिसासारखं हलकं झालं होतं. नैराश्याला मनात प्रवेश करायला वावच ठेवला नव्हता तिनं. आज संक्रांतीचा सण होता. ऋतुसंक्रमणाचा दिवस. संक्रमण म्हणजे बदल, परिवर्तन. आपल्या नकारात्मक विचारांचं सकारात्मक विचारांत तिनं संक्रमणच केलं होतं जणू. ‘बरं झालं, आपण आज बाहेर पडण्याचा निर्णय घेतला ते.’ लांब खेळणाऱ्या मुलांकडे पाहात ती स्वत:शी म्हणाली.
‘मी इथे बसले तर चालेल?’
एक तिच्याच वयाची स्त्री तिला विचारत होती.
‘हो हो. बसा नं.’ रेवतीनं बाजूला सरकून तिला जागा करून दिली.
थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर रेवतीनं तिला म्हटलं, ‘एक विचारू, राग नाही नं येणार? आज संक्रांत; मग हळदीकुंकू सोडून तुम्ही...’
‘छे. आता राग नाही येत कसलाच. आणि आमच्यासारख्यांसाठी कुठली हळद आणि कुठलं कुंकू?’
‘म्हणजे, आमच्यासारख्या म्हणजे? तुम्ही...’
‘हो. घटस्फोटिता आहे मी. एका मुलीची आई आहे. ती बघा. ती माझी मुलगी.’ तिनं बोट दाखवलं.
रेवतीनं पाहिलं तर एक पाच-सहा वर्षांची मुलगी तिच्याच मुलांबरोबर खेळत होती.
‘हिच्या जन्मानंतर काही दिवसांनीच हिच्या वडिलांनी माझ्याशी घटस्फोट घेतला. त्यांचं म्हणे दुसऱ्याच मुलीवर प्रेम होतं आणि आईच्या इच्छेखातर त्यांनी माझ्याशी लग्न केलं होतं. सासूबाईंना नातवंडाचं तोंड पाहायचं होतं. ते पुत्रकर्तव्य त्यांनी पार पाडलं आणि मला घटस्फोट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्या धक्क्यानं सासूबाई गेल्या आणि...’ ती क्षणभर थांबली आणि पुढं म्हणाली, ‘त्यानंतर अशा प्रत्येक समारंभात मला वगळण्यात येत असे. सुरुवातीला वाईट वाटायचं. रडूही यायचं. पण मग ठरवलं; आता रडत नाही बसायचं. त्या उपेक्षेच्या, सहानुभूतीच्या नजराही नाही झेलायच्या. आपण न केलेल्या चुकीची शिक्षा देणाऱ्या या कोण? आपलं अस्तित्वच असं परावलंबी का असावं? तेव्हापासून मी अशा प्रसंगी मुलीला घेऊन बाहेर पडते, संपूर्ण दिवस बाहेर आनंदात घालवते आणि रात्री घरी परत जाते.’ एका दमात तिनं आपलं म्हणणं सांगून संपवलं.
‘काय?’ रेवती आश्चर्यानं उद््गारली.
‘आश्चर्य वाटलं ना?’
‘हो, आश्चर्य वाटलंच; पण तुमच्या विचाराचं नव्हे, योगायोगाचं!’
‘म्हणजे?’
‘म्हणजे मीही आज त्याच विचारानं बाहेर पडले आहे. ती माझी मुलं.’ आणि रेवतीनं तिला आपली हकिकत सांगितली.
‘छान. बरं वाटलं मला, कोणीतरी समविचारी भेटली म्हणून. कशाला हवंय आपल्याला सहानुभूतीचं औदार्य? परंपरांचं जोखड बाजूला ठेवून आपण आपल्याला पाहिजे तसे सण-उत्सव साजरे करू या की. शेवटी हे नेम-नियम, रूढी- परंपरा बनवल्या कोणी? आपणच ना. आणि फक्त सण-उत्सवच का म्हणून? दैनंदिन जगणंसुद्धा. पुरुषप्रधान संस्कृतीनं रडगाणं गायचं पण वास्तवात स्त्रियाच स्त्रियांचं दु:ख जाणून घेण्याऐवजी तिच्यावर बंधनं घालण्यात कांकणभर पुढं असतात. नकोच ते. त्यापेक्षा आपल्यासारख्या स्त्रियांचं एक विश्व आपणच निर्माण करू या. कितीतरी जणी या बदलासाठी उत्सुक असतील. बस््, एक आवाज काफी है. ठरलं तर, नव्या वर्षाचा हा नवा संकल्प.’ आणि त्या दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरून ठेवले. पुन्हा भेटण्याचं ठरवून दोघीही घरी जाण्यासाठी उठल्या. रेवतीनं मुलांना हाक मारली.
‘आई. खूप मज्जा आली नं आज.’
‘हो, हो तर.’ रेवतीच्या मनावरचं औदासिन्याचं मळभ दूर झालं होतं. ओठावर कवितेच्या ओळी येऊ पाहात होत्या,
‘सांगा कसं जगायचं, कण्हत कण्हत की गाणं म्हणत, तुम्हीच ठरवायचं...’
सोसायटीच्या गेटपाशी रिक्षा थांबली. पार्किंगमध्ये हळदीकुंकू समारंभ आटोपलेला दिसत होता. आठ-दहा जणी समारंभाची उत्तर-चर्चा करत होत्या.
‘छान झाला न समारंभ. बरं झालं बाई, रेवती आज घरी नव्हती ते.’
‘हो न. जरा ऑकवर्डच होतं नं.’
एवढ्यात रेवतीलाच येताना बघून जरा ओशाळून त्यांनी आपापसात नेत्रपल्लवी केली. रेवतीनं तिकडं दुर्लक्ष केलं आणि स्वत:हूनच पुढं होत हसत त्यांना म्हणाली,
‘काय, आटोपलं का हळदीकुंकू?’
आणि पुढं होऊन ती आपल्या दाराचं कुलूप काढू लागली. त्यांच्या विस्फारलेल्या नजरांकडे लक्ष न देता, ‘अशा जगास्तव काय कुढावे’ असं मनाशी गुणगुणत...
bharati.raibagkar@gmail.com