आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तथास्तु (कथा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षणामुळे हल्ली चार प्रकारची माणसं अनुभवण्याची संधी मिळतेय. विविध कसोट्यांवर पारखून पाहण्याचा अनुभव जीवनातील जोडीदार शोधण्यासाठी मुलींना कामी येतोय.
लाडक्या लेकीच्या नव्या बंगल्यावर झळकलेली ‘तथास्तु’ अक्षरं दिसली, अन्् श्रीधरपंत-वसुताई मनोमन सुखावले. ‘तथास्तु’च्या वास्तुशांतीच्या घरगुती सोहळ्यासाठी ते खास गावाकडून आले होते. रिक्षातून उतरतानाच त्यांना अक्षरं दिसली अन् दोघांच्याही मनात सारख्याच भावना दाटून आल्या.

कार्यक्रम उद्याचा असला तरी बरीच नातेवाईक मंडळी आजच जमली होती. रात्रीची जेवणे उरकून गच्चीत मस्त गप्पांची मैफल रंगलेली! त्यातच विभाच्या लग्नाच्या आठवणी निघाल्या आणि सगळे हसू लागले.
श्रीधरपंत पोस्ट खात्यातून चांगल्या पदावरून निवृत्त झाले. उर्वरित आयुष्य दोघांनी गावाकडे राहून घालवायचे ठरवले. एकुलती एक लेक विभा इंजिनिअरची पदवी घेऊन पुण्यातच नोकरी करत होती.

लग्नाचं वय झालं तसं विविध ठिकाणांहून चौकशी होऊ लागली. अन्् आईवडिलांच्या इच्छेला मान देतादेता विभाची धावपळही होऊ लागली.
आठवडाभर काम अन्् शनिवार, रविवार गावाकडे! प्रत्येक वेळी कुणी ना कुणी मुलगी
बघायला येणार हे ठरलेले! ते झालं की सोमवारी पुन्हा ड्यूटीवर हजर!
अशीच एका शुक्रवारी रात्री विभा गावाकडे निघाली. पण रस्त्यात बस अचानक बंद पडल्याने तिने तसे घरी कळवले. ‘कॉलनीतील काकाकाकू माझ्यासोबत आहेत, तेव्हा काळजी करू नका,’ असा निरोपही दिला.
बंद बस सोडून ते तिघेही एका खासगी मोटारीने लिफ्ट दिल्याने रात्री उशिरा का होईना घरी पोहोचले!
दमल्यामुळे विभाचे आई-बाबांशी जास्त बोलणे झालेच नाही!
सकाळीही एक मुलगा अन्् त्याचा मित्र दहा वाजताच येणार होते. यांचा म्हणे या भागात अचानक कामानिमित्त दौरा झाल्याने बायोडेटा, कुंडली, फोटो या सगळ्यांत न अडकता ‘डोळ्यांखालून’ मुलगी तर घालून घ्यायला काय हरकत आहे, अशी मध्यस्थांनी गळ घातली होती.
चहापोह्यांची तयारी होईपर्यंत पाहुणे दारात! ‘हे अनिकेत सावंत. मुंबईला स्वत:ची सी.ए. फर्म सांभाळतात. तीन पिढ्यांपासूनचा व्यवसाय असल्याने व्याप तसा बराच मोठा आहे आणि हे त्यांचे असिस्टंट रितेश चौधरी!’
पण दोघेही पाहुणे अन् विभा एकमेकांकडे पाहून आश्चर्यचकितच झाले. कारण काल विभा अन्् देशमुख काकाकाकूंच्या विनंतीवरून यांनीच लिफ्ट दिली होती. पण जुजबी गप्पांमध्ये नावागावानिशी एकमेकांची खोलात चौकशी झालीच नव्हती.
प्रश्नोत्तरे अन् गप्पाटप्पांमध्ये चहा-पोह्यांसहित कार्यक्रम आटोपला.
पण पाहुणे जाताच विभाने लगेचच जाहीर केलं. ‘स्थळ लाखमोलाचं असलं तरी मला मान्य नाही. काल गाडीत येताना एकही मिनिट याचा मोबाइल बंद नव्हता. एकंदर अंदाजावरून ब-याच मुलींशी त्याच्या आलटून पालटून आचरट गप्पा चालल्या होत्या फोनवरच! मध्येच घरून पालकांचा फोन आला असावा बहुधा! तर त्यांच्याशी अगदी उद्धटपणे बोलून दोन मिनिटांतच यानं ‘रेंज नाही’ म्हणून कटवलं! फ्रंट मिरर पुन्हापुन्हा अॅडजस्ट करून याची लोचट नजर सतत मागच्याच सीटवर होती. बाबा, असा मुलगा कुणा एकीशीच एकनिष्ठ राहून संसार करूच शकत नाही. तेव्हा सॉरी! त्यांचा होकार आला तरी माझा स्पष्ट नकार कळवा त्यांना!
याउलट त्याचा तो मित्र बरा! बिचारा खूपच टेन्स वाटत होता. बाबा, फोन त्यालाही येत होते. बहुधा घरूनच! घरातलीच कुणी वृद्ध स्त्री आजारी असावी अन्् तिला अॅडमिट करण्याची धावपळ सुरू असावी. कुणा पिंकी नावाच्या मुलीशी तो बोलत होता. तिला धीर देत होता. बहीण वगैरे असावी ती. फोनवरूनच त्याने डॉक्टर, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर सगळ्या सगळ्यांशी संपर्क साधला. ‘बिलाची अजिबात काळजी करू नका. मी आल्यावर पेड करतोच,’ अशी विनंतीही केली. मध्यमवर्गीय घरातलाच असावा तो!
बाबा, त्याचं लग्न जर अजून व्हायचं असेल अन्् त्याची तयारी असेल तर त्याला प्रपोज करा. अशा माणसांच्या माणुसकीने त्यांच्या छत्रछायेत राहणा-या सगळ्याच व्यक्ती नेहमीच सुरक्षित असतात.
लेक स्पष्टवक्ती आहे हे माहीत होतं बाबांना! पण तरीही ते कितीतरी वेळ तिच्याकडे आश्चर्यानेच पाहत होते.
लेकीच्या बोलण्यात काहीच वावगे नव्हते! शेवटी व्हायचे तेच झाले! सावंतांकडून होकार घेऊन मध्यस्थ खुशीतच आले.
पण श्रीधरपंतांनी त्यांना विश्वासात घेऊन लेकीची अट सांगितली.
अन् खरं कारण न कळू देता सावंतांना विनम्रतेने नकारही कळवला.
मध्यस्थामार्फतच त्यांनी रितेश चौधरीची भेट घेतली. त्याला विभाचे बोल जसेच्या तसे ऐकवले.
त्याला तर हसूच आवरेना! विभाच्या बोलण्यात पुरेपूर तथ्य होते, पण बॉसशी पंगा... म्हणजे नोकरीवर पाणी सोडावं लागणार होतं! शिवाय आपल्या घरची साधारण परिस्थिती. आज जरी स्वत:कडे सीएची डिग्री असली तरी जम बसायला तसा वेळच लागणार.
पण या सगळ्या गोष्टींविषयी विभाशीच बोलण्याचं ठरवून त्यानं तिची तशी भेटही घेतली.
तिला हे सगळं मान्य होतंच. त्याच्यातील संस्कारांपुढे तिला बाकी गोष्टी तितक्याशा महत्त्वाच्या नव्हत्या वाटत.
आणि शेवटी सुमुहूर्त बघून साधेपणानेच विवाहवेदीवर चढून रितेश-विभाने संसार सुरू केला. पिंकीला शिकवून पायावर उभं केलं होतं! अन्् पै पै जमवून ‘तथास्तु’ बंगला उभारला होता. वृद्ध मातापित्यांसमवेत ते आज त्यात प्रवेशही करणार होते.