आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक दुजे के लिए

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेक जरा स्वच्छतेचं जादाच स्तोम माजवणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे शूज घाण झाले, चिखल उडाला वगैरे कुरबुरी चालू होत्या. मग पवनने युक्ती केली. रस्त्याच्या कडेला छोट्या लालबुंद रानटी स्ट्राॅबेरी उगवल्या होत्या. त्या तिला तोडून दिल्या आणि पुढची वाट त्या स्ट्राॅबेरी शोधण्याच्या नादात कशी कटली ते अनन्यालासुद्धा समजलं नाही.

शोजामधल्या मुक्कामाचा दुसरा दिवस उजाडला. आज आम्हाला पदभ्रमण करत सिवालसर येथे जायचं होतं. सर म्हणजे सरोवर. तिथे एक फार सुंदर तळं आहे असं पवनने आम्हाला सांगितलं होतं. सकाळी उठून भराभरा आलू पराठे बनवले आणि भरपेट नाश्ता करून निघालो. शोजा गावापासून मोठा घाट सुरू होतो. त्या घाटाचं नाव जलोर जोत. पहाडी भाषेत जोत म्हणजे खिंड, घाट. जवळ-जवळ १२ किमीचा चढाईचा रस्ता होता, आणि ऐन घाटमाथ्यावर वसलेलं होतं जलोर गांव. पवनच्या गाडीत बसून जलोर घाट ओलांडला आणि गावात आलो. गाव कसलं? छोटा पंधरा-वीस घरांचा डोंगरमाथ्यावरचा पाडा. रस्त्यालगत थाटलेली चार-दोन चहाची हॉटेलं, दोन किराणा दुकानं आणि एक मंदिर. मागे घरं. मंदिराजवळ गाडी पार्क केली आणि सिवालसरच्या रस्त्याला लागलो. सिवालसर जलोर गावापासून सात किमी आहे. पहिले तीन-चार किमी कच्चा का होईना पण रस्ता आहे, पुढे सगळी जंगलातून जाणारी पायवाट.
खूप पाऊस पडून गेलेला त्यामुळे रस्ता पूर्ण चिखलमय झालेला. त्यात गुरांनी जागोजागी भले मोठे शेणाचे पो टाकून ठेवलेले. शेण चुकवत चालायची कसरत करताना कपडे आणि शूज चिखलाने बरबटून गेले. मुलांनी तर त्या रस्त्याचं ‘गोबर एक्स्प्रेसवे’ असं नामकरणही करून टाकलं. ओल्या मातीचा, मातीत कुजलेल्या पाला-पाचोळ्याचा आणि शेणाचा असा तो एक संमिश्र गंध आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फुललेली रानफुले. त्या रस्त्यावरून मुलं कानात वारं घुसलेल्या वासरांसारखी बागडत चालली होती. तासभर त्या कच्च्या रस्त्यावरून चालल्यानंतर रस्ता एकाएकी एका वळणावर संपला आणि डोंगराच्या बाजूने एक छोटी पाऊलवाट लागली. त्या पाऊलवाटेवरून चालत जाणं हा एक थरारक अनुभव होता. एकतर अत्यंत अरुंद वाट, त्यात पावसामुळे शेवाळ उगवलेलं. एका बाजूने खोल दरी आणि एका बाजूने उत्तुंग डोंगर. आम्ही जपून पावलं टाकत चाललो होतो. माझा मुलगा अर्जुन जात्याच डोंगरवेडा आहे, तो सहजगत्या त्या वीतभर रुंदीच्या वाटेवरून आत्मविश्वासाने पावलं टाकीत चालला होता. आदित त्याच्या मागोमाग होता. वाट डोंगराळ होती, बऱ्यापैकी चढणाची होती त्यामुळे तळं येईपर्यंत मी आणि अनन्या बऱ्याच थकून गेलो होतो. आदी-अर्जुन मात्र मजेत होते. शेवटी एकदाचं सिवालसर आलं. देवदार वृक्षांच्या राईत अगदी मधोमध वसलेलं द्रोणासारखं तळं. छोटंसंच अगदी. पण आरशासारखं स्वच्छ, नितळ. तळ्याच्या काठाला एक सुंदर मंदिर. आम्ही तळ्यापाशी आलो तेव्हा एक पहाडी कुटुंब तिथे तीन दगडांच्या चुलीवर प्रसादासाठी एका छोट्या लोखंडी कढईत शिरा बनवत होतं. आम्ही मंदिरात दर्शन घेऊन तळ्याला एक प्रदक्षिणा घालून आलो. तोपर्यंत त्या कुटुंबाने पूजेची तयारी केली होती. आम्हाला त्यांनी खुणेनेच बसायला सांगितलं. त्यांच्या घरातल्या कर्त्या पुरुषाने व्यवस्थित धोतर नेसून यथासांग पूजा केली, आरती केली, देवाला नैवेद्य दाखवला आणि मुलांना बोलवून त्यांच्या हातावर चमचा चमचा शिरा ठेवला. तुपात तळलेला, साखरेत घोळलेला, काजू-बेदाणे घातलेला तो गरमा-गरम शिरा त्या ओल्या पावसाळी वातावरणात छानच लागत होता. त्यात इतकं चालून मुलांना भरपूर भुकाही लागलेल्या, त्यामुळे त्यांनी तो शिरा घटकेत संपवून टाकला. ‘पसंद आया?’ तो शिरा करणाऱ्या बाईने हसून विचारलं. ‘और चाहिये?’ एक नजर माझ्यावर टाकून लेकीने हळूच होकारार्थी मान हलवली. त्या बाईने तिच्या कुटुंबातल्या सगळ्यांना आणि तिथे असलेल्या इतरही एक-दोन माणसांना चमचाभर शिरा दिला आणि उरलेलं आख्खं ताट मुलांच्या हातात दिलं. ‘अब बैठ के शांती से खाना बेटा,’ अनन्याच्या केसांवरून मायेने हात फिरवत ती म्हणाली. मी संकोचून तिला नाही म्हणणार होते, तर ती मला म्हणाली, ‘ना मत कहना बेटा, भगवान का प्रशाद है और बच्चों के रूप में भगवान ही आये हैं खाने.’ यावर मी काय बोलणार?
तासभर तळ्याकाठी काढतो न काढतो, तोच एकदम जोराचा पाऊस सुरू झाला. हिमालयातला पाऊस तो, खर्जात सुरुवात होऊन दोन मिनिटात तारस्वर गाठणारा. दोन मिनिटांत पुढचं सगळं दृश्य धूसर झालं. अंगावर घातलेल्या रेनकोटला न जुमानता पाणी आत शिरायला लागलं. पारा एकदम उतरला आणि चांगलीच थंडी वाजायला लागली. लगबगीने आम्ही परतीच्या वाटेला लागलो. परतीच्या वाटेवर अर्ध्या एक किमी वर एक-दोन चहाच्या टपऱ्या होत्या. तिथपर्यंत कसेबसे आलो आणि एका दुकानात शिरलो. एक पोरगेलंसं जोडपं ते दुकान चालवत होतं. नवरा जेमतेम चोविशीचा असावा आणि बायको एकोणीस-वीस वर्षांची. आधीच ही पहाडी माणसं दिसायला देखणी, त्यात ही दोघं बहुधा नवीनच लग्न झालेली असावीत. दोघांच्याही चेहेऱ्यावर नवथर कोवळीक. आम्ही दुकानात शिरलो आणि चहा सांगितला. भरपूर भूकही होती त्यामुळे दालचावलही मागवला.
दुकान कसलं, दहा बाय दहाची एकच खोली. दगडांच्या भिंती, वर स्लेटचं उतरतं छप्पर. एका कोपऱ्यात भांडी वगैरे धुण्यासाठी बैठी मोरी. तिच्या कठड्यावर भरून ठेवलेला तांब्याच्या घासूनपुसून लख्ख केलेला पाण्याने भरलेला हंडा. मोरीशेजारी उभा ओटा, त्यावर एक गॅसची चूल आणि एक लाकडाची मातीने सारवलेली चूल. बाजूला एका स्टीलच्या स्टँडवर व्यवस्थित रचून ठेवलेली भांडी. दुकानाच्या दर्शनी भागात एक काचेचं कपाट, त्यात बिस्किटांचे पुडे, चॉकलेट्स, नूडल्स असं काहीबाही विक्रीला ठेवलेलं. पलीकडच्या भिंतीला टेकून विटांच्या बेसवर दोन लाकडांच्या फळ्या टाकलेल्या आणि वर दोन जाडसर लोकरीच्या घोंगड्या अंथरलेल्या. भिंतीला खुंट्या आणि त्यांवर टांगलेले काही कपडे. पलीकडे एक ट्रंक आणि एकदोन मोठे पितळी भिंतीला टेकवून ठेवलेले डबे.

दोघेही वस्तीला इथेच राहात असावेत. त्या इवल्या खोलीतला त्यांचा तो चिमुकला, आटोपशीर संसार मला फार लोभासवाणा वाटला. ती गरमगरम वाफाळत्या चहाचे पेले घेऊन आली तेव्हा तिच्या हातातली लाल काकणं किणकिणली. ‘नई नई शादी हुई है?’ मी हसत विचारलं. ती लाजून हो म्हणाली. ‘यही रहते हो?’ मी विचारलं. ‘हां,’ ती म्हणाली. तिचा नवरा मागे कांदा कापत होता. तो हसून म्हणाला, ‘वैसे तो हमारा गांव उपर जलोड है लेकिन हम दोनो यही रहते है जबसे ब्याह हुआ.’
‘रात को यहाँ कोई नहीं रहता होगा. बिजली भी नहीं है,’ मी म्हटलं.
‘तो क्या हुआ दीदीजी? नीचे मंदिर में माताजी हैं और यहाँ हम दोनो हैं ना एक दूसरे के लिये?’ बायकोला नजरेनेच कुरवाळत नवरा म्हणाला. ती लाज लाज लाजली. माझ्या मनात आलं, शहरातली नवविवाहित जोडपी मधुचंद्रासाठी म्हणून अशा ठिकाणी येतात. या साध्या-भोळ्या जोडप्याने इथे एका खोलीत एकमेकांच्या सानिध्यात स्वर्ग उभा केला होता!
shefv@hotmail.com
बातम्या आणखी आहेत...