आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओह माय गॉड !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कालपासून देशपांडे कुटुंबात वातावरण तंग होते. सुनीताताईंनी विनायकरावांशी अबोला धरला होता. वास्तविक दोघांचंही वय रुसव्या-फुगव्याचं नव्हतं! पन्नाशी उलटलेले देशपांडे दांपत्य. आयुष्यभर एकमेकांना समजून-उमजून सुखाने संसार केला. मुलं मोठी होऊन आपापल्या घरट्यात सुरक्षित होती. विनायक देशपांडे शहरातल्या नावाजलेल्या वकिलांपैकी एक! प्रदीर्घ अनुभव, कामातली सचोटी आणि माणसं जोडण्याची कला या त्रिसूत्रीवर शहरात ब-यापैकी नाव अन् गुणवत्ता टिकवून होते! पण म्हणतात ना, रिकामं मन सैतानाचं घर! सुनीतातार्इंचं असंच काहीसं झालेलं! पती दिवसभर त्यांच्या व्यवसाय व्यापात गर्क, मुलं बाहेरगावी, रिकामं घर खायला उठायचं त्यांना!
भिशी, किटी पार्टी, महिला मंडळ... सगळीकडे जाऊन बघितलं! पण छे! आयुष्यभर या सगळ्याची कधी सवयच नव्हती, तर आता तरी त्यात मन कसं रमणार? साहजिकच वाचनाकडे ओढा लागला. सामाजिक, ऐतिहासिक वाचता वाचता धार्मिक पुस्तकांतही रुची वाढू लागली. अन् सुनीताताई अध्यात्माकडे वळल्या! जवळच्या मैत्रिणीच्या मदतीने एका साधू महाराजांची दीक्षाही घेतली. केंद्रात जाऊन ध्यानधारणा, कीर्तन, प्रवचन, प्रसार-प्रचार करू लागल्या. चला, कशात तरी बायकोचं मन रमतंय ना! रमू देत. म्हणून विनायकरावही निश्चिंत झाले. बायकोला या बाबतीत त्यांनी कधी प्रोत्साहितही केलं नाही की कधी परावृत्तही नाही!
इथपर्यंत सगळं ठीक होतं! पण सुनीताताई जेव्हा सफेद साड्या नेसून एखाद्या जोगिणीप्रमाणे राहू लागल्या, दारोदार फिरून संस्थेच्या मासिकांचा प्रसार करू लागल्या, तेव्हा आजूबाजूचे लोक कुजबुजायचे! पण तार्इंना यातच आनंद मिळायचा. तशात शहरात साधू महाराजांचा आठवडाभराचा प्रवचनाचा कार्यक्रम जाहीर झाला. सकाळच्या सत्रानंतर एखाद्या भाविकाच्या घरी विश्रांती घेऊन महाराज पुन्हा सायंकाळचे सत्र घेणार होते. ज्या भक्तांना ‘महाराज आपल्याकडे यावेत’ अशी इच्छा असेल त्यांची यादी सुरू होती. सुनीतातार्इंना ही इच्छा तर पूर्वीपासूनच होती. माझ्या वास्तूला माझ्या महाराजांचा चरणस्पर्श व्हावा, त्यांची सेवा करण्याची संधी मला मिळावी, ही इच्छा आता पूर्ण होईल, असे वाटत होते. पण, विनायकरावांचा नेमका यालाच विरोध होता. आणि याच कारणावरून देशपांडे घरात दोन दिवसांपासून शांततामय धुसफूस चालू होती.
‘आश्रमात जाऊन तू प्रचाराचं काम करतेस तेवढं पुरेसं आहे. महाराज घरीच यायला हवेत हा हट्ट का?’ ‘भले भले भक्त त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत, पण नशीबवान लोकांनाच त्याचं पुण्य मिळतं!’
‘ते सगळं कबूल! पण त्यासाठी खर्च कमी आहे का? दरवाजातील पायपोसापासून प्रत्येक गोष्ट नवीच हवी असते महाराजांना! भांडी, कपबश्या, नॅपकीन, खुर्ची, सोफा, स्लीपर, ए. सी., इन्व्हर्टर, जनरेटर, एक का खर्च आहे तो! एका तासासाठी इतके पैसे खर्च करण्यापेक्षा एखाद्या विद्यार्थ्याला किंवा गरीब रुग्णाला मदत करू.’
‘दहा-वीस हजारांनी कितीसा फरक पडणार आहे? इतकं जे काय मिळालंय ते महाराजांच्याच कृपेने मिळालंय ना!’
‘अंहं! ‘क्रेडिट द्यायचंच झालं तर महाराजांना देऊ नकोस! त्या निर्गुण, निराकार परमेश्वराला दे! त्याने दाखवलेल्या मार्गावरून चालत, रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून कष्ट उपसलेत मी! त्यात तुझ्या महाराजांचं काय योगदान?’
‘ते मला ठाऊक नाही; पण महाराज आपल्या घरी यावेत ही माझी मनापासूनची इच्छा आहे. हवं तर हट्ट म्हणा!’
सुनीताताई आपला हेका सोडायला तयार नव्हत्या!
बिच्चारे विनायकराव! पत्नीहट्टापुढे हात टेकून त्यांनी संमती दिली!
महाराजांचे अनुयायी दोन वेळा येऊन सगळं ‘आलबेल’ असल्याची खात्री करून गेले. महाराजांसाठी फळफळावळ, सुका मेवा, मसाला दूध आणि काय काय हवं नको याची यादी देऊन गेले! सगळं घरदार त्या दिवशी सकाळी उठल्यापासून महाराजांच्या तैनातीसाठी राबत होतं! दुपारी दोन वाजताची वेळ दिली होती. अनुयायी दुपारी अकरा वाजता येऊन लिफ्ट, बॅकअप, इन्व्हर्टर, एसी, फॅन सगळं ठीकठाक असल्याची खात्री करून गेले. जाताना ‘महाराजांसाठी स्वेच्छेने दक्षिणा ठेवा’ असा प्रेमळ निरोप द्यायला विसरले नाहीत.
घड्याळाचा काटा संथ गतीने पुढे सरकत होता. बातमी कर्णोपकर्णी होऊन आजूबाजूलाही पसरली होती. चारही दिशांच्या खिडक्यांमधून सी.सी. टी.व्ही. लावल्याचा भास होत होता. वाट बघता बघता अडीच, तीन वाजले. नेहमीचे अनुयायी पुढे आले. दिवाणखान्यात मांडलेल्या सगळ्या वस्तूंवरून नजर फिरवली त्यांनी आणि दक्षिणेसाठी ठेवलेल्या रकमेची गणती करताच पटकन म्हणाले, ‘हे काय ताई, फक्त एकवीस हजारच ठेवलेत! अहो, कमीत कमी एक लाखाची तरी अपेक्षा होती आम्हाला.’ आणि ते आले तसे ताडकन् निघूनही गेले. सायंकाळचे पाच वाजले तरी महाराजांचे आगमन नाही. शेवटी फोन केला तेव्हा समजलं की, पलीकडच्या शर्मा फॅमिलीने ऐंशी हजार दक्षिणा ठेवली होती. त्या घरी महाराजांनी चरणस्पर्श केला होता.
सकाळपासून अन्नाचा कण तोंडात घेतला नव्हता कुणीही! शेवटी सगळ्यांनी कसेबसे दोन घास पोटात ढकलले! रात्री सर्व सरंजाम आवरून थकल्या-भागल्या सुनीताताई शेवटी अपराधीपणाने विनायकरावांना म्हणाल्या, ‘तुम्ही म्हणता तेच खरं आहे हो! माझं मेलीचं चुकलं! शेवटी आपल्या पाठीशी फक्त परमेश्वरच उभा असतो. अशा महाराजांना लाख लाख रुपये अर्पण करण्यापेक्षा गरीब दुबळ्यांची सेवा केलेली बरी.’
विनायकरावांनी घरी न आलेल्या त्या महाराजांचे मनातल्या मनात आभार मानले आणि हसून बायकोला म्हणाले, ‘उद्या दुपारी लवकर घरी येतो. ‘ओह माय गॉड’ सिनेमा बघायला जाऊया.’