आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तकमित्र: पुस्तकवेड्यांचा देव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुस्तक आणि ग्रंथांशी संबंध येणाऱ्याला सुधीर देव माहीत नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. सुधीर देव पुस्तकवेड्यांसाठी देवासारखे धावून येतात. आपल्या आवडीचे पुस्तक नेहमी मिळतेच असे नाही; अशा वेळी त्या पुस्तकाची नोंद ‘देवा’कडे करून ठेवल्यास देव स्वत: पायपीट करून ते पुस्तक संबंधिताला मिळवून देतोच.
आपले आवडते पुस्तक आपल्या संग्रही असावे असे वाटते. अनेकदा आर्थिक परिस्थिती नसते. देव यांची स्वत: कौटुंबिक पार्श्वभूमी कनिष्ठ मध्यमवर्गातील. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच. त्यात पुस्तके विकत घेऊन वाचायची हौस भागणे कठीणच होते. त्यातून ‘माझा ग्रंथसंग्रह’ म्हणजे ‘माग्रस’ योजना साकारली. स्वत:सारखे गरजवंत शोधण्यासाठी पायपीट केली. प्रतिसाद मिळत गेला. अल्प रक्कम का हाेईना, दरमहा पुस्तकासाठी बाजूला ठेवायची आणि एकेक पुस्तक जमा करायचे... पुस्तके जमा होत गेली आणि माग्रस एक चळवळ होऊन गेली.
माग्रसला वैयक्तिक ग्रंथ-संग्रहापुरते न ठेवता सुधीर देवांनी त्याला वेगवेगळ्या उपक्रमांची जोड दिली. ग्रंथ संग्रह, ग्रंथप्रसार, विचार-विमर्श, अभिरुची संवर्धन, ग्रंथकर्त्याच्या गाठीभेटी, मुलाखती, चर्चा असे उपक्रम जोडत गेले. वर्षभराच्या एकूण कार्यक्रमांचे वेळापत्रक तयार करून एकेका पर्वाखाली ते सर्व कार्यक्रम काटेकोरपणे राबवले जात. नागपूरच्या खडकाळ जमिनीत कुठलीही गोष्ट सहज रूजत नाही. पण सुधीर देवांनी इथे पुस्तकांची चळवळ उभी केली.
जगाच्या पाठीवर आज जिथे िजथे ग्रंथ व्यवहार होतो तिथे सुधीर देव आणि माग्रस पोहोचली आहे. गाजावाजा कमी आणि सकारात्मक काम जास्त, हे माग्रसचे ठळक वैशिष्ट्य आहे. नागपूरच्या व्यंकटेशनगरातील आपल्या घरी देव पुस्तकांच्या गराड्यात बसलेले दिसतील. येत्या २४ आॅगस्टला माग्रस ४८ वर्षे म्हणजे चार तपे पूर्ण करील. आता ‘मन मोकळे आभाळ’ हा नवा उपक्रम सुरू केला आहे. मेडिकल सायंस, इंजिनिअरिंग, पेंटिंग्ज, सिनेमा आदी विषयावर एखादा ग्रंथरसिक आपले विचार मांडतो व त्यावर चर्चा होते. याच्याच जोडीला अफुम आर्टिस्टिक फिल्मस युनिट आॅफ माग्रस उपक्रम सुरू आहे. पुस्तकांच्या व्यतिरिक्त कथा, कादंबरी, कलाकृती, कला वा एखाद्या हटके विषयावर बेतलेला वा उत्तम असूनही न चाललेला चित्रपट दाखवून त्यावर चर्चा केली जाते. असे अनेक उपक्रम आहेत. या सर्व धावपळीत सुधीर देवांच्या हातून त्यांची कविता निसटली ती निसटलीच -
काळ्या आभाळाच्या, गोऱ्या छोरी
हासतात फेकुनिया, प्रकाशाची जाळी!
काळी रात्र झुले, अशा काळ्या वेळी
क्षितिजास बांधूनिया, सुगंधाची झोळी...
एक वाङमयीन संस्कृती रुजवण्याच्या, संवर्धित करण्याच्या धावपळीत राहून गेलेले कवितेवरचे प्रेम देवाला आता मिळायला हवे.
बातम्या आणखी आहेत...