आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाणपण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचार करता करता खिडकीतून बाहेर पाहिलं तर कॉलनीतली मुलं व्हॉलीबॉल खेळताना दिसली. आणि एकदम स्ट्राइक झालं- आज राकेशही खेळायला येणार आहे असं दादा म्हणत होता!
मी त्याला शोधू लागले. तो काही दिसला नाही. पुन्हा शांत होऊन झालेल्या प्रसंगाचा विचार करत बाहेर बघत बसले तेवढ्यात ग्राउंडच्या एका कोप-यात जिथून कॉलनीचं गेट होतं तिथे मला दादाचा भास झाला. पाठमोरा असल्याने मला नीट कळलं नाही; पण साधारण उंचीवरून आणि कपड्यांवरून तो दादाच असल्याच कळत होतं.
हं, भटकत असतो कायम इकडे-तिकडे. कोणाशी बोलतोय काय माहीत?
त्रासलेल्या नजरेने परत एकदा विचार करत मी दादाकडे बघत राहिले. थोड्या वेळानंतर दादाचं बोलणं झालं आणि तो मागे वळला.
दादाच होता, मी कुठेही आणि कसाही ओळखेन त्याला.
मी खुदकन हसत मनातच म्हटले आणि परत गेटवर पाहत बसले; पण धक्क्यांची मालिका थांबलीच नव्हती! दादा ज्या मुलाशी बोलत होता तो राकेश होता! राकेश!
तो परत का गेला?
मघाशी झालेल्या प्रकारामुळे दादाने इथे यायचं नाही, असं सांगितलं असेल त्याला म्हणून तर गेटवरच बोलत उभे होते ना!
हॅट, काहीही. मघाशी राकेश ज्या मवाली अंदाजात होता त्यावरून तुला वाटतं का तो कुणी इथे येऊ नको, असं म्हटलेलं ऐकून घेईल?
हं! ते तर आहे गं.
एऽ तू राकेशला पाहिलं, आत्ता तो त्याच्या नेहमीच्या टकाटक ड्रेसमधे होता! व्यवस्थित भांग पाडलेला आणि त्याच्या नेहमीच्या ऐटीत. मघासारखा चुरगळलेले कपडे आणि अर्धी बटणं उघडलेली नव्हती!
आता मात्र माझा पार गोंधळ उडाला होता. ही गोष्ट खरी होती. थोड्या वेळापूर्वी राकेशचं चुकीच्या ठिकाणी दिसणं, मग नजर चोरणं आणि आता परत नेहमीच्या अवतारात येणं, दादाशी बोलणं, गुमान निघून जाणं या गोष्टी फार विचित्र होत्या. कशाचीच एकमेकाला लिंक लागत नव्हती. तो राकेशचा जुळा भाऊ होता की काय? पण मग त्याने आपल्याला कसं ओळखलं? काय गडबड आहे? काहीच लिंक लागत नव्हती. पण काही तरी वेगळंच घडत होतं हे नक्की. दादा घरी आला. मध्ये येऊन त्याने हातपाय धुतले. मी त्याच्याकडे गंभीर नजरेने टक लावून बघत होते. आता तरी दादा काही तरी बोलेल, सांगेल या आशेत होते. पण दादाने माझ्याकडे बघितलंपण नाही. धावत्या मालगाडीसारख्या इतक्या घटना घडल्या आजच्या दिवसात; पण ही मालिका कधी संपेल याचा मात्र पत्ताच लागत नव्हता.
दुस-या दिवशी मी शाळेत गेले. काल घडलेलं सारं काही अजूनही माझ्या डोक्यात फिरत होतं. दादा काल राकेशशी काय बोलला असेल हा विचार मी करत होते. तेवढ्यात गेटवर राकेश दिसला. नेहमीसारखाच. कड्डक इस्तरीचा युनिफॉर्म, तेल लावून भांग पाडलेला चेहरा, चकाकणारे शूज आणि... आणि चेह-यावर हसू! तो आजही मला नेहमीसारखी स्माइल देत होता. जणू काल काही घडलंच नाही. मी नुसतं त्याच्याकडे पाहिलं आणि वर्गात जायला निघाले. माझ्या कपाळावर प्रचंड आठ्या होत्या.
काय चालवलंय या दोघांनी? हा एवढं सोज्वळपणे कसा हसू शकतो?
असेच पहिले दोन तास गेले. तिस-या तासाला पाठक सर प्रॅक्टिसला बोलवायला आले. मग मी निघाले. सरांच्या बरोबर राकेश आणि मनीषाही होती. मी वर्गातून बाहेर पडल्या पडल्या मला राकेश दिसला, आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिले; पण स्थिती बदललेली नव्हती. मी त्याच शंकाग्रस्त नजरेने त्याच्याकडे पाहत होते आणि तोही तेवढ्याच सोज्वळतेने! माझ्यासाठी कालच्या दिवसात खूप काही झालं होतं; पण त्याच्या लेखी काहीच नाही. आम्ही सगळे तळघरात निघालो. राकेशचं दुटप्पी वागणं खटकत होतं. मी प्रचंड तणावाखाली आले.
जर राकेशचे कालचे हावभाव आज कायम असते तर मला ही गोष्ट पचवणं सोपं झालं असतं. पण खूप मोठं वादळ आलं आणि गावातलं एकही घर उद्ध्वस्त झालं नाही ही बाब जेवढी आक्षेपार्ह आहे तेवढंच राकेशचं वागणंही आक्षेपार्ह होतं. आणि त्यातल्या त्यात काल दादाशी त्याचं झालेलं बोलणं वेगळीच दिशा दाखवत होतं. या सगळ्यात मी इतके बुडून गेले की पेटी वाजवताना माझ्याकडून प्रचंड चुका झाल्या. कधी नव्हे ते पाठक सरांचे बोलणे मी खाल्ले. प्रत्येक वेळेस सॉरी म्हणत मी चुका करतच राहिले आणि विचारही! तालिम संपली. आम्ही वर्गात गेलो. आजतर बेंचवरही काही खरडण्याचा मूड नव्हता. का? कसं? याचाच विचार करण्यात दिवस गेला. पंतप्रधानांनीही विचार केला नसावा तेवढा मी करत होते. मला राकेश आणि दादाला बरेच प्रश्न विचारायचे होते; पण कालच्या प्रसंगानंतर राकेशकडे जाऊन जाब विचारणं मनाला पटत नव्हतं आणि दादा तर एनीहाऊ उत्तरं देणारच नव्हता. मी एक मोठ्ठा श्वास घेतला आणि डोक्याला थोडा वेळ विचार करण्यापासून थांबवण्याचा निरर्थक प्रयत्न केला. दिवस कसा गेला कळलंही नाही. शाळा सुटली. मी बॅग भरली आणि कपाळावरच्या आठ्यांना घेऊन निघाले.
जाता जाता स्टेजच्या कोप-यापाशी राकेश उभा दिसला. मी मुद्दाम त्याच्या समोरच्या कोप-याला थांबले. या क्षणाला मात्र मला त्याचे हावभाव वाचता येत होते. त्याला नक्कीच मला काहीतरी सांगायचं होतं. मे बी कालच्या प्रकाराबद्दल असेल! मी थांबले. माझ्याही हालचालीतून त्याला कळलं की मी त्याला स्पष्टीकरण द्यायची परवानगी दिली होती. बाहेर पडणा-या मुलांच्या लोंढ्यांना पार करत राकेश माझ्यापाशी आला. आणि काही सांगायला तोंड उघडणार तोवरच मी त्याला विचारलं-
‘काल संध्याकाळी दादाचं आणि तुझं काय बोलणं झालं?’
राकेश थोडासा गोंधळला.
‘शशीदादाशी? काहीच नाही.’
‘हे बघ, मी तुम्हाला दोघांना कॉलनीच्या गेटपाशी बोलताना पाहिलंय. तुला सांगायचं तर सांग नाही तर मी निघते. या एका प्रश्नाशिवाय मला तुझ्याकडून दुसरं कशाचंच उत्तर नकोय.’
राकेश काहीच बोलला नाही. मी काय समजायचं ते समजून घेतलं. खरं तर मला त्याच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी उगंच माझा स्कर्ट नीट कर. कुठे वेणीच्या रिबिनीची फुलं नीट कर. कुठे उगंच कॉलर ताठ कर वगैरे चाळे करत होते. तरी राकेश काहीच बोलायला तयार नव्हता. शेवटी मी वाकड्या बोटाने तूप काढण्याची पद्धत अवलंबत त्याला म्हणाले,
‘ठीकेय. मी निघते. परत फिरून माझ्यापाशी काहीच बोलायला, सांगायला येऊ नको. थँक्स फॉर आॅल धिस.’
मी राकेशवर भयंकर चिडले होते. अगदी प्रमाणाच्या बाहेर. तेवढ्यात राकेशने माझं दप्तर खेचलं आणि एकदाचे शिवलेले ओठ उघडले-
‘नाही शारू. थांब. प्लीज.’
(क्रमश:)
avkpd08@gmail.com, esahity@gmail.com