आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेदनेची कविता जागून...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपणच आपल्याला लिहिलेली
पत्र वाचता-वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावीत वा-यावर पानं
जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांच्याच नशिबी नसते.


समृद्ध कलाकृतीच्या आविष्कारासाठी जगभर प्रसिद्ध असणा-या अजिंठ्याच्या कुशीत पहूर या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात अनुराधाबाईचा जन्म झाला. तिथून अगदी जवळ रानकवी ना. धों. महानोर यांचं पळसखेड गाव. हिरवाईनं नटलेला समृद्ध परिसर आणि बहिणाबार्इंच्या लडिवाळ कवितांची भुरळ मनभर घेऊन वावरणारी प्रेमळ माणसं. सगळा परिसर जणू शब्द, रंग, चित्राच्या अभिव्यक्तीने भारलेला, अशा कसदार विचारांची संपन्न भुई असणा-या प्रदेशात अनुराधाबाई आपल्या अंगभूत लयीने टीपकागदासारखं टिपत लहानाच्या मोठ्या होत होत्या.
गावात दहावीपर्यंत शाळा म्हणून दहावीपर्यंतच शिक्षण. पण जाणिवा प्रगल्भ करणारे, डोळस विचारांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक. योगायोगाने बाईचे मुख्याध्यापक म्हणजे प्रसिद्ध कवी बा. सी. मर्ढेकरांचे वडील. अधूनमधून आपल्या वडिलांकडे बा. सी. मर्ढेकरांचे वास्तव्य. आता एवढे मराठी साहित्याला समृद्ध करणारे कवी आजूबाजूला वावरत असताना भोवतालावर कवितेची झिंग चढली नाही, तर नवलच!


कुटुंबाचे प्रांजळ संस्कार नि गावपांढरीचं संचित सोबत घेऊन वाढणा-या अनुराधाबार्इंच्या संवेदनशील मनावर गावगाड्यात घडणा-या ब-या-वाईट घटनांचे परिणाम खूप खोल रुतून बसले. सुख-दु:खाकडे प्राक्तनाचे भोग समजून निमूटपणे जगणारा तिथला समाज, आया-बायांची होणारी सर्वार्थी घुसमट. आपलं असणं-नसणं गृहीत धरून सोशिकपणाने अस्तित्वहीन आयुष्य जगणा-या खेड्यात सर्वत्र वावरणा-या असंख्य स्त्रिया. या सगळ्यांच्या दु:खाची दुखरी सल व निसर्गाची चैतन्यदायी सळसळ ओटी-ओच्यात घेऊन प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विवाह झाल्यामुळे पुढे त्या औरंगाबाद येथे स्थायिक झाल्या. मराठवाड्यातील सांस्कृतिक घडामोडींचं केंद्र ठरलेल्या या शहरात सृजनशील मनाला पोषक वातावरण मिळालं. पण मनोविश्वात उलथापालथ करणारी एक दु:खद घटना अनुराधाबार्इंच्या आयुष्यात घडली. मुलाचा अकस्मात मृत्यू ओढवला. त्यांच्यातल्या आईपणाची परीक्षा पाहणारी ही घटना, खूप मोठा धक्का देऊन गेली. तिथून पुढे रंग उडालेल्या प्रवासात कविता सोबतीला घेऊन अनुराधाबार्इंनी वेदनेशी नातं जोडलं. एक न संपणारा मनस्वी एकांत स्वीकारून. इथून पुढे मुळात समंजस असणारी त्यांची कविता अधिक हळवी आणि आत्ममग्न होत गेली.


कुठल्याही बाईची वेदना आणि सुख-दु:खाच्या अभिव्यक्तीच्या कल्पना कमीअधिक प्रमाणात सारख्याच असतात. सत्याची भीषणता अधोरेखित करताना मोजक्या, पण नेमक्या शब्दात स्त्रियांच्या जगण्यातली अगतिकता अनुराधाबाई व्यक्त करतात. लहानपणी पाहिलेल्या स्त्रिया त्यांच्या अस्तित्वहीन चेह-याची वेदना घेऊन अनुराधाबार्इंना छळत असतात स्त्रियांच्या वाट्याला आलेलं, न संपणारं दु:ख पाहून त्या म्हणतात :


निवा-यासाठी थांबावं त्या झाडाच्या
सावल्याही लांबतच जातात
अशा वेळी घशात दाटणारे कढ
तुम्ही आतल्या आत गिरवायला शिका...


अशा एकापेक्षा एक सरस कविता लिहिणा-या अनुराधाबार्इंचे ‘दिगंत’, ‘तरीही’, ‘दिवसेंदिवस’ आणि ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ असे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांची समग्र कविता वाचताना एक हवीहवीशी दुखरी वेदना वाचकाला घेरून असते. ठसठसत्या वेदनेला धक्का लागताच ती भळभळ वाहू लागावी, असं काहीसं होऊन जातं. प्रत्यक्ष भेटीत बोलताना त्यांना ऐकणं हादेखील कवितेइतकाच अविस्मरणीय अनुभव असतो. त्यांचे स्वत:चे अनुभव व त्यातून तयार झालेलं तत्त्वज्ञान, जगण्याकडे तटस्थपणाने पाहण्याचा दृष्टिकोन, स्वत:चा जपलेला अवकाश, वैचारिक बैठकीतून, चोखंदळ वाचनातून आलेलं चिंतन विषयाच्या व्याप्तीचा अंदाज व्यक्त करतं.
अंतिम सत्य माहीत झाल्यावर सगळ्या बाबी मिथ्या वाटाव्या, इतक्या तटस्थतेनं त्या मृत्यू या घटनेकडे पाहतात. त्यांच्या कवितेत मृत्यू तीन टप्प्यात येतो. एकदा मुलाचा झालेला मृत्यू, दुस-यांदा स्वत:च्या आईचा आणि तिसरा स्वत:चा...


मुलाच्या मृत्यूनं त्यांचं भावविश्व ढवळून निघालं, आईपण कासावीस झालं, पण आईचा मृत्यू म्हणजे नैसर्गिक अपरिहार्य आहे. याची जाणीव त्यांच्या समंजस मनाला आहे. त्यामुळे तो स्वीकारताना त्याला त्या गांभीर्याने सामो-या जातात, पण आईची होणारी केविलवाणी उलघाल त्यांना पाहवत नाही. आईचा घरादारात, लेकराबाळात गुंतलेला जीव. आपल्यानंतरही लेकरांनी गणागोताला, एकमेकांना धरून राहावं अशी तिला वाटणारी आशा, आपण प्राणपणानं उभारलेलं हे छोटंसं विश्व आपल्यानंतरही असंच शाबूत राहावं यासाठी शेवटचा निरोप घेताना आईनं चालवलेली सारवासारव पोटात ‘कालवाकालव’ करणारी आहे. मुळात संपूर्ण कविता पुस्तकातून वाचणासारख्या आहेत.

तशी तर
सगळ्यांचीच मरत असते
एक दिवस आई
पण तिला माहीत नसतो
आपल्या मनात तसू तसूनं
होतं गेलेला तिचा मृत्यू
जन्मापासून...
तिस-या टप्प्यात कवयित्री स्वत:च्या मृत्यूची कल्पना करताना दिसते. लग्नापासून जोडीदाराच्या सहवासातून एकमेकांचं सवयीचं झालेलं जगणं, आवडीनिवडी, स्वभावाच्या, कामाच्या खाणाखुणा, वागण्यातून आलेला विश्वास, खात्री. यातून आपल्यानंतर आपला जोडीदार काय करील? कसा वागेल? याचं चित्रण बोलकं ठरतं...
आयुष्यातील प्रगल्भ जाणिवांना प्रकट करताना अनुराधाबार्इंचं समंजस मन कुठल्याच तक्रारीचा सूर आळवत नाही. खंत, खेद कुठेच जाणवत नाही. समोर येणा-या जीवनाला संवाद साधत सामोरं जाण्याचं धारिष्ट दाखवून येतील ते अनुभव स्वीकारण्याची स्थितप्रज्ञ भूमिका कवयित्री घेताना दिसते. आत्म्यांना शब्द प्रमाण मानून प्राप्त अनुभवांना सच्चेपणानं शब्दरूप देणा-या अनुराधाबार्इंची कविता म्हणूनच वेगळी आहे. कवितेतील वेदना बोचरी असूनही हवीहवीशी वाटणारी आहे. म्हणून तर तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणतात,
‘कवितेशिवाय जवळ काहीच नाही
कवितेतलं जगणंच तेवढं खरं उरलं.’
tadegawkarsanjiwani@yahoo.com