आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मै और मेरा कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईसारख्या पुढारलेल्या शहरातही प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करणाऱ्या महिला जेमतेम एका हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्याच. या निवडक महिलांमधली एक उमा कदम सांगतेय, पंधरा वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स आॅफ इंडिया या वृत्तपत्रांसाठी फोटो काढताना आलेल्या अनुभवांबद्दल. फील्डवर असताना कोणी कधीच मुलगी म्हणून वेगळी वागणूक दिली नाही. वाईट माणसांपेक्षा चांगली माणसंच जास्त भेटली, असे ती सांगते...
२६ जानेवारी २००१. भुजला भूकंप झाल्याचं कळलं. तेव्हा माझी महाराष्ट्र टाइम्समध्ये फोटोग्राफर म्हणून निवड झाली होती, पण नियुक्तिपत्र मिळालं नव्हतं. तरी मला तिकडे जायला सांगण्यात आलं, ती माझी पहिली मोठी असाइनमेंट. नंतर १४ वर्षांत खूप काम केलं, अनेक दुर्घटना, अपघात, बाॅम्बस्फोट, दहशतवादी हल्ले कव्हर केले, पण भुजचा भूकंप माझ्या कायम लक्षात राहील.

मी एफवायला होते, वडील कामावरच्या ताणामुळे हृदयविकाराच्या झटक्यामुळे अचानक गेले आणि घराची जबाबदारी माझ्यावर आली. मग मी शिकता शिकता अकाउंटंट म्हणून दोन ठिकाणी नोकरी करत होते. एक काम होतं एका फोटो स्टुडिओत. त्याआधी कॅमेरा, फोटोग्राफीबद्दल आकर्षण होतं, पण त्या काळात, डिजिटल कॅमेरे नव्हते तेव्हा, फोटोग्राफी प्रचंड खर्चिक होती. रोल, डेव्हलपिंगचा खर्च आणि फ्रीलान्सरला मिळणारा तुटपुंजा पैसा हे गणित मला परवडणारं नव्हतं. पण मी स्टुडिओत काम करता करता फोटोग्राफी शिकून घेतली. वडिलांच्या कामासाठी माझ्या मंत्रालयात अनेक फेऱ्या होत. तेव्हा अनेक जणांच्या अोळखी झाल्या, त्यातून मला फोटोग्राफीची कामं मिळत गेली. फ्रीलान्स करताना, महाराष्ट्र टाइम्ससाठी मी काढलेला फोटो खूप गाजला. तो होता नामदेव ढसाळ आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांच्या भेटीच्या वेळचा. ठाकरे ढसाळांना हात जोडून नमस्कार करतायत असा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरचा तो फोटो माझ्यासाठी करिअरचं दार उघडणारा ठरला. त्यानंतर साधारण वर्षभराने सहा जणांमधून माझी महाराष्ट्र टाइम्समध्ये नियुक्ती झाली.

मटासाठी खूप वेगवेगळे फोटो काढल्यावर दोनतीन वर्षांनी मला टाइम्समध्ये सीनियर फोटोग्राफर म्हणून घेतलं. आता मी स्पेशल फोटोग्राफर आहे, पण रोजचं काम तेच आहे. सुरुवातीचा स्ट्रगल आणि आताचा, यात फार फरक नाही. कारण रोज वेगळा फोटो मिळवणं हेच आमचं काम. मी कोणत्या पदावर आहे याचा फोटाे काढण्याशी संबंध नसतो. आणि आता स्पर्धा खूप आहे. फक्त आता पैशाचं टेन्शन नाही, जे बाबा गेल्यावर प्रचंड होतं.

मुंबईत किंवा बाहेर काहीही घडू शकतं, त्यावर कोणाचंच नियंत्रण नाही. मग अशा वेळी कधीही कुठेही जावं लागतं. या पार्श्वभूमीवर आई आणि धाकट्या भावाने मला खूप साथ दिली. अनेकदा पहाटे कुठे जायचं असेल तर तो माझ्यासोबत आलेला आहे.

माझं समाधान होईपर्यंत मी फोटो काढतच राहते, उशीर झालाय, दमलेय वगैरे कारणं मला चालत नाहीत. त्यामुळे माझा बाॅसही मला एवढंच विचारतो, ‘उमा, तुझं समाधान झालंय का?’ तो कधीच विचारत नाही, ‘काम झालंय का?’
या काळात मुंबईत जितके बाॅम्बस्फोट झाले, अपघात झाले, ते सगळे मी कव्हर केलेत. प्रत्यक्ष स्फोटापेक्षा कठीण असतं नंतरचे फोटो काढणं. हाॅस्पिटलमध्ये किंवा मृतांच्या घरी, स्मशानात फोटो काढावे तर लागतातच; पण ते किती संवेदनशीलतेने तुम्ही काढू शकता, ते तुमचं कौशल्य आहे. अनेकदा डोळ्यांत पाणी असताना मी फोटो काढलेत. मागच्या आठवड्यात काळबादेवीला लागलेल्या आगीच्या वेळी रात्री उशिरापर्यंत मी तिथे होते, बाकी सगळे निघून गेले होते. पण म्हणूनच मला एकटीला ती इमारत पडतानाचा फोटो मिळाला. आम्ही दुसऱ्या दिवशी बाहेरगावी जाणार होतो. तिथे फोटो काढताना माझ्या डोक्यात हाच विचार होता, आता मी मेले तर? तेव्हाच्या धुरामुळे, पाणी मारल्यामुळे उडणाऱ्या ठिणग्यांमुळे मला दम्याचा अटॅक आला आणि आम्ही बाहेरगावी जाऊच शकलो नाही.

२६ नोव्हेंबरचा मुंबईवरचा हल्ला हा सर्वात लक्षात राहिलेला. एरवी कधी माझी आई काही म्हणत नाही, पण तेव्हा मात्र ती मला जाऊ देत नव्हती. मग मी खोटं बोलून, हाॅस्पिटलमध्ये फोटो काढायला जाते असं सांगून ट्रायडंटच्या इकडे गेले. पण टीव्हीवर लाइव्ह प्रक्षेपण सुरू असल्याने तिने मला पाहिलं आणि फोन करून झापझाप झापलं. शेवटी मी तासभर फोन बंद ठेवला, कारण समोर जे घडत होतं ते ऐतिहासिक होतं. मी त्यापासून दूर राहूच शकत नव्हते. मी तेव्हा दोन की तीन दिवसांनंतर घरी गेले. अख्खं पान फक्त माझे फोटो लावले होते दुसऱ्या दिवशी, ती माझ्या कामाची पावती होती.

मला फील्डवर असताना कोणी कधीच मुलगी म्हणून वेगळी वागणूक दिली नाही. वाईट माणसांपेक्षा चांगली माणसंच जास्त भेटली. मी मुलगी आहे म्हणून भावनावश नाही होत, पण समोरच्याच्या भावना चांगल्या प्रकारे समजू शकते. आम्ही फोटो काढतो तेव्हा समोरच्या माणसाशी एक बंध जुळावा लागतो, तो मी सहज जुळवू शकते. एरवी मी मुलगी आहे, याचा फायदा किंवा गैरफायदा मला कधीच जाणवलेला नाही.

प्रेस फोटोग्राफरसाठी रोजचा दिवस नवा असतो, या सततच्या नव्याचं व्यसन लागलंय मला जणू. एखादा दिवस घरी असले तर वाटत राहतं, काही मिस तर नाही केलं मी. कितीही पैसा मिळवला तरी फोटोग्राफी मी सोडणार नाही एवढं निश्चित. ‘मैं और मेरा कॅमेरा’ हेच मला आवडतं.

umakadam123@gmail.com
पुढील स्लाइडवर पाहा, उमाने काढलेले PHOTO..
बातम्या आणखी आहेत...