आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सदाकोसाठी 1 हजार क्रेन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुम्ही नाही ना मला असे पाठवणार?’ कोजागिरी आई-बाबाला जेवण झाल्यावर म्हणाली. ‘म्हणजे कसे?’ न समजून बाबा म्हणाला. ‘आधी प्रॉमिस दे नाही पाठवणार म्हणून, मगच सांगेन,’ हे काहीतरी किरकोळ आहे असे समजून बाबा टेबल आवरत म्हणाला, ‘ओके प्रॉमिस. आता तरी नीट सांग पाहू’.


‘आपल्या शेजारचा तो नितीन आहे ना, त्याला त्याचे बाबा मिलिटरीत घालणार आहेत. तो मागच्या वर्षी सातवीत नापास झाला. आम्ही सर्व पुढच्या वर्गात गेलो. आधीच त्याला त्याचे वाईट वाटतेय. वरती बाबा म्हणतात अभ्यासात लक्ष नाही. कोणती तरी एक परीक्षा आहे. ती दिल्यावर म्हणे त्याला मिलिटरीचे शिक्षण देणा-या शाळेत जाता येते,’ कोजागिरी सर्व हकिगत रंगवून सांगत होती.

‘आमच्या ग्रुपमध्ये तो मला खूप आवडायचा. तो किती विनोदी, गप्पिष्ट आणि चांगला मुलगा आहे. भांडत नाही. खूप मजा करून आम्हाला हसवतो. परीक्षा पास झाला तर तो इथून जाणार. म्हणजे रोज खेळायला येणार नाही. बाबा सांग ना, तो सातवीत नापास झाला म्हणून त्याला असे पाठवून देणे बरोबर आहे का? मला तर त्याचे बाबा खूप दुष्ट वाटतात,’ कोजागिरी आई-बाबाचे मत विचारत होती.

‘शाळेत नापास झाला, तर त्याची शिक्षा म्हणून असे घराबाहेर र्बोडिंग शाळेत पाठवणे बरोबर नाही. नापास झाला तर अभ्यासात मदत करून अभ्यास घ्यायचा. काही आई-बाबा मुलांना चांगल्या शिक्षणासाठी गावाबाहेरील शाळेत ठेवतात. ती गोष्ट निराळी. तेही मुलांच्या मर्जीविरुद्ध करू नये,’ बाबा सांगत होता.


हे सर्व कोजागिरी बाबाला विचारात होती, याचे शांताला जरासे आश्चर्य वाटत होते. स्वत:च्या बाबतीत निर्णय घ्यायची वेळ आली तर आई नव्हे तर बाबा घेईल असे तिला वाटते आहे की काय, यावर शांता विचार करत राहिली. पण याचा उलगडा नंतर झाला.

‘तू त्याच्या बाबाशी बोल ना. तुझ्या ओळखीचे आहेत ना ते अंकल? किंवा नितीन ती परीक्षाच नापास व्हावा. म्हणजे प्रवेश मिळणार नाही. आपोआप त्याच्या बाबाला वेगळा विचार करावा लागेल. नितीनला मी नेहमी शाळेचा अभ्यास कर असे सांगत असते,’ कोजागिरी आपल्या पद्धतीने मार्ग काढत होती.
कोजागिरी विचार करत होती. मागच्या रविवारी ती बाबाबरोबर एका शाळेत गेली होती. तेथे बाबाने मुलांना हिरोशिमावर एक गोष्ट सांगितली होती. ते तिला आठवत होते. ती म्हणाली, ‘तू म्हणतोस ना सर्व युद्धं अनाठायी आहेत. तुम्ही नाही का परवा हिरोशिमावर स्लाइड शो दाखवला. त्यानंतर इतरांच्या बरोबर मीही युद्ध नको, शांतता हवी यावर चित्रं काढली. तुमची शांतता मोहीम सर्वांना माहीत होत नाही. नितीनच्या बाबांना बहुतेक तू सांगितलेली गोष्ट माहीत नसणार.’ कोजागिरी थांबत नव्हती. तिने विचारले, ‘बाबा, मिलिटरीत जाणे म्हणजे युद्धासाठी तयारी करणे ना?’ फार अवघड प्रश्न कोजागिरीने विचारला होता.


‘तू म्हणतेस ते खरे आहे. आमची शांतता चळवळ सर्वांना माहीत होत नाही. तसेच, माणसं अनेक वर्षे युद्ध करत आली आहेत. त्यामुळे युद्ध न करता प्रश्न सुटू शकतात, यावर कोणाचा विश्वास बसत नाही. ‘युद्धे नको’ म्हणणा-यांची संख्या वाढतेय. पण ती युद्ध थांबवण्यासाठी पुरेशी नाही.’ बाबा उत्तर देत होता. ‘नितीनच्या बाबांशी तू बोलशील का? प्लीज. त्यांना तरी समजावून सांगणे तुला जमेल,’ कोजागिरी काकुळतीला येऊन म्हणाली. ‘आपण तो हिरोशिमाचा स्लाइड शो सोसायटीत सर्वांना दाखवूया. तसा कार्यक्रम ठरवतो. त्यासाठी नितीनच्या बाबांनाही बोलावू. मग त्यांच्याशी मी बोलेन.’ बाबा सांगत होता. कोजागिरी लक्ष देऊन ऐकत होती. बाबाच्या गळ्यात पडून म्हणाली, ‘नक्की हं. तू माझा लाडका बाबा आहेस.’

कोजागिरीच्या पेंगुळलेल्या डोळ्यासमोर बाबांनी सांगितलेल्या गोष्टीतील काही दृश्यं उमटत राहिली. एक हजार कागदांचे ओरिगामी क्रेन पक्षी करणारी हिरोशिमातील सदाको. अणुबॉम्बस्फोट झाला तेव्हा ती दोन वर्षांची होती. रक्ताचा कर्करोग झाल्याने ती दवाखान्यात होती. जपानी दंतकथेप्रमाणे कागदाचे ओरिगामी एक हजार क्रेन केले तर तुमची मनातील इच्छा पूर्ण होते. तिला जगायचे होते. तिच्या हातून फक्त 644 क्रेन पूर्ण झाले आणि ती 1955च्या 25 ऑक्टोबर रोजी वारली. त्यानंतर तिच्या वर्ग मित्रमैत्रिणींनी उरलेले क्रेन केले. तिची आठवण म्हणून आणि शांती आणण्यासाठी दरवर्षी असे क्रेन करतात. त्यामध्ये कोजागिरीला ती स्वत: आणि नितीन क्रेन करताना दिसत होते. कोण आश्चर्य, तिच्या बाबाबरोबर नितीनचे बाबासुद्धा क्रेन करत होते!