आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसर्‍या लग्नाची वेगळी गोष्ट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(सत्य घटनेवर आधारित, परंतु नावे बदलली आहेत.)
संपदाचे सौरभसोबत धूमधडाक्यात लग्न झाले. सासरकडील मंडळी फार प्रेमळ. सासूसासरे, नवरा, लहान दीर, नणंद सगळ्यांनीच तिला खूप जीव लावला. संपदा-सौरभच्या संसारवेलीवर एका पिटुकल्याने म्हणजे श्रावणने जन्म घेतला. त्याचे कौडकौतुक करण्यात झटकन 6 महिने सरले आणि एक दिवस सौरभचे एका अपघातात निधन झाले.
संपदावर दु:खाचा डोंगरच कोसळला. यातून संपदा आता कशी सावरणार याचीच चिंता सर्वांना सतावू लागली. तिच्या सासूसासर्‍यांनाही तरुण मुलाचे दु:ख होते. कोणी कोणाला समजवावे? संपदाच्या आईने तिला माहेरी आणले. 15 ते 20 दिवसांनी तिचे सासूसासरे आले व त्यांनी तिच्या आईला, भावाला समजावले की ती आता आमची सून आहे. आम्ही तिचा मुलीप्रमाणे सांभाळ करू. काळजी करू नका.
संपदाच्या डोळ्यातून अश्रूंची धार लागली. तिने तिच्या सासूबार्इंच्या डोळ्यातले अश्रू बघितले. त्यांचे पाणावलेले डोळे पाहून ती त्यांना जाऊन बिलगली आणि म्हणाली, मी आजपासून तुमच्या सर्वांसोबत आपल्या घरीच राहीन. संपदा हळूहळू सावरली. आता तिला दुसर्‍या लग्नाविषयी समजवायला काही हरकत नाही, असे बघून सासूसासर्‍यांनी तिला समजावले की, तुझे वय अजून खूप लहान आहे. तुला तुझे उभे आयुष्य काढायचे आहे. श्रावणास मोठे करायचे आहे. तू दुसरे लग्न करून सुखाने संसार कर. सर्वतोपरीने तिला समजावून त्यांनी संपदाचा पुनर्विवाहासाठी होकार मिळवला.
परंतु संकट त्यांच्यामागे हात धुऊन लागले होते. संपदाचे सासरे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावले. पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला. पण तिच्या सासूरूपी आईने स्वत:चे दु:ख बाजूला सारून 2 महिन्यांनी लगेचच संपदासाठी वरसंशोधन सुरू केले. ठिकाण आले की त्यांची त्यांच्याकडे एक अट असायची. संपदाला तिच्या बाळासहित स्वीकारावे. कारण श्रावणास त्याचे बाबा मिळवून द्यायचे होते. त्याला काही कळायच्या आतच ते देवाघरी गेले. त्यामुळे आता आई सांगेल त्याच व्यक्तीला तो बाबा म्हणून ओळखणार.
पण त्यांनी ते फक्त ठरवले नाही तर अमलातही आणले. सर्वांनीच मनावर दगड ठेवून संपदा-सौरभच्या लग्नाचे, बारशाचे, बाकी सौरभसोबत संपदाचे फोटो, इतर ज्या काही दृश्य स्वरूपाच्या आठवणी होत्या त्या लपवून ठेवल्या. श्रावण आता दीड वर्षाचा झाला. तो आजी, आजोबा, मामा, मामी यांच्याकडे राहतो, असेच त्याला सांगत असत. मामा-मामी म्हणजे खरे त्याचे काका-काकू. परंतु आता संपदाशी त्यांचे नाते म्हणजे लहान भाऊ-भावजय, सासर हे मुळी सासर नसून तिचे माहेरच होते.
एकदा श्रावणाने आईला प्रश्न विचारला, आई सगळ्यांचे बाबा आहेत. माझे बाबा कुठे आहेत? त्यावर झटक्यात संपदाने ठरवल्याप्रमाणे सांगितले, तुझे बाबा कंपनीच्या कामासाठी दुसर्‍या देशात गेले आहेत. ते आले की तुझे खूप लाड करतील.
अखेर तो दिवस उजाडला. संपदाच्या सासूबाई ज्याप्रमाणे संपदासाठी जोडीदार शोधत होत्या त्याप्रमाणे एक स्थळ त्यांना मिळाले. विनय एका चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कामास आहे. परंतु काही कारणाने त्याचा घटस्फोट झालेला होता. त्यांना एकही मूल नव्हते. बघण्याचा कार्यक्रम झाला त्या वेळीच सासूबार्इंनी विनयला, त्याच्या आईवडिलांना संपदा-श्रावण यांच्या बाबतीत पुढे काय ठरवले आहे याबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांना अंधारात ठेवून विनयची फसवणूक त्यांना करायची नव्हती. तेव्हा विनय आणि त्याच्या आईवडिलांचेही डोळे पाणावले. विनय व त्यांच्याकडील मंडळी संपदाच्या सासूबार्इंच्या मनात जे होते त्याप्रमाणे लग्न करण्यास, श्रावणबाळास दत्तक घेऊन त्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यास पितृप्रेम देण्यास तयार होती.
ठरल्याप्रमाणे संपदा-विनय यांचा पुनर्विवाह झाला पण तो अगदी वेगळ्या पद्धतीने. संपदा-विनय यांचे रजिस्टर्ड लग्न झाले. संपदाने नव्या नवरीप्रमाणे पूर्ण शृंगार केला होता. त्यामुळे विनय खूश होता. त्यानंतर दोघांनीही लग्नाचे कपडे बदलले. श्रावणला सांगितले होते की, तुझे मामा बाबांना आणायला विमानतळावर जात आहेत, तेव्हा तू छान तयार हो. आजीनेसुद्धा जणू काही आपला मुलगाच परत येतोय या आनंदात छान साडी नेसली होती. घरी सर्व पाहुणेमंडळी जमली होती. कारण आज संपदाचे - विनयचे लग्न होते. एवढेच नाही तर आज श्रावणचे बाबा येणार होते. माझ्या बाबांना बघण्यासाठी सगळे आले हे पाहून श्रावण खूश होता.
पण त्याहीपलीकडे माझे बाबा मला भेटणार, मला खूप गिफ्ट देणार, मला कडेवर घेणार. माझे लाड करणार म्हणून तो त्याच्या बाबांची आतुरतेने वाट बघत होता. संपदाची आईसुद्धा खूप खूश होती. आपल्या लेकीचा पुन्हा संसार सुरू होतोय यामुळे त्या आनंदात होत्या.
श्रावण आईच्या-बाबांच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. अशातच संपदा-विनय, मामा-मामी (दीर-भावजय) गाडीतून उतरले आणि संपदाने सांगितले, हे बघ तुझे बाबा. तसा श्रावण ज्या आवेगाने बाबांच्या कडेवर गेला त्याच आवेगात प्रचंड मायेने विनयने श्रावणास कडेवर उचलून घेतले. त्याचे भराभर मुके घेतले.
तेथे जमलेले सगळे नातेवाईक हा प्रसंग बघून भारावून गेले.
विनयच्या आई-बाबांनी, बहिणीने म्हणजेच श्रावणच्या नव्या आजी-आजोबा आणि आत्यानेही श्रावणाचे खूप लाड केले. आणि म्हणाले, चला आता आपण आपल्या घरी जाऊ. आता आलेत ना बाबा.
लगेचच विनयने श्रावणास कायद्याने दत्तकपुत्र म्हणून स्वीकारले आणि स्वत:चे नाव, आडनाव व भरभरून प्रेम दिले. आज श्रावण 12 वर्षांचा झाला तो श्रावण विनय म्हणून ओळखला जातो. संपदा-विनय खूप खूश आहेत.खरेच संपदाच्या सासूरूपी आईने हे धाडस केले आणि संपदा-विनय यांच्या दुसर्‍या लग्नाची वेगळी गोष्टी खर्‍या अर्थाने यशस्वी झाली.