आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सन्मानाने जगण्याची प्रेरणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारं असतं हे माध्यम, पण तरीही ते तुम्हाला सतत ‘लाइव्ह’ राहायला शिकवतं, जागतं ठेवतं. कसोटीचे क्षण कसे हाताळायचे याचे धडे देतं..
मी टेलिव्हिजनमध्ये काम करणारी महिला पत्रकार आहे त्याहीपेक्षा मी एक पत्रकार आहे, त्याचं भान माझ्या मनात सतत असतं. पण तरीही महिला पत्रकार म्हणून येणारे अनुभव वेगळे असतात हेही खरं आहे. त्यामुळे टीव्हीमध्ये काम करणाऱ्या महिला पत्रकार या विषयावर मनापासून बोलावं वाटतं. आम्ही पत्रकारितेचं शिक्षण घेऊन फील्डमध्ये आलो तेव्हा न्यूज टेलिव्हिजनचा उगवता काळ होता त्यामुळे सुरुवात केली ती हातात बूम माइक धरून. तारा मराठी न्यूज टीममध्ये मीही होते. वेगवेगळ्या बातम्यांच्या निमित्तानं मुंबई जवळून बघत होते. सुरुवातीचे ते दिवस आठवले की वाटतं टेलिव्हिजन जर्नलिझममुळे एखादी घटना खूप जवळून पाहता आली, मोठमोठ्या माणसांशी थेट बोलता आलं, घटनेला भिडता आलं आणि पत्रकारितेचा वेग अंगात भिनला. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्समध्ये काम केलं तेव्हा पुन्हा एकदा माध्यम बदललं. पण प्रिंट मीडियामध्ये काम केल्यानं पत्रकारितेचा पाया भक्कम झाला आणि त्यानंतर २४ तासांच्या न्यूज चॅनल्सच्या प्रवाहात सराईतपणे सामील होता आलं.

न्यूज रिपोर्टिंग करणं आणि लिहिणं त्याबरोबरच एखाद्या विषयाला थेट भिडणं, संवाद साधणं, सगळ्यांच्या मतांची सांगड घालत एखादी देवघेव घडवणं आपल्यालाही जमलं पाहिजे असं मला वाटायचं. आयबीएन लोकमतच्या व्यासपीठावर आपल्याला ही संधी मिळेल, असा विश्वास होता. त्याामुळे निखिल वागळे सर, राजदीप सरदेसाई सर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मी सोडली नाही. न्यूज चॅनल म्हणजे फक्त अँकरिंग किंवा माइक धरून रिपोर्टिंग नाही, तर हे दृश्य माध्यम प्रभावीपणे वापरत एखाद्या बातमीचा इम्पॅक्ट कसा घडवायचा, मी इथे शिकले. टेलिव्हिजन न्यूज चॅनलमध्ये काम कसं करायचं, त्याचं अगदी प्रोफेशनल ट्रेनिंग घेतल्यामुळे तर आत्मविश्वास दुणावला होता.

टेलिव्हिजनमध्ये २४ ताशी घड्याळाच्या काट्यावर काम करणं हे खूप कसोटी पाहणारं आणि जिकिरीचं असतं. मानसिक आणि शारीरिकृष्ट्या थकवणारं असतं हे सगळं खरं आहे; पण तरीही हे माध्यम तुम्हाला सतत ‘लाइव्ह’ राहायला शिकवतं, जागतं ठेवतं आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांशी एकाच वेळी संवाद साधण्याची संधी मिळते.
मी टेलिव्हिजनमध्ये काम करते, असं सांगितल्यावर कोणत्याही क्षेत्रातली, कोणत्यााही वयोगटातली व्यक्ती माझ्याशी पटकन कनेक्ट होते. एखादा विषय, मुद्दा आम्ही आमच्या चॅनलवर कसा मांडला पाहिजे, हे लोक पहिल्या भेटीतही हक्काने सांगायला लागतात. तेव्हा वाटतं... खरंच आपल्यावर एक टेलिव्हिजनची पत्रकार म्हणून खूप मोठी जबाबदारी आहे. रिपोर्टर्स, अँकर्सवर ही जबाबदारी अधिक असते. कारण तुम्ही तुमच्या प्रेक्षकांच्या थेट संपर्कात असता, त्यांच्या आयुष्याचे एक भागीदारही असता.

न्यूज अँकर म्हणून काम करताना कोणतीही बातमी तुमच्यासमोर येऊन उभी ठाकते. वेगाने उलगडत जाते. मुंबईवरचा दहशतवादी हल्ला असो, दिल्लीतलं निर्भया प्रकरण असो की अण्णा हजारेंचं भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, तहानभूक विसरून काम करताना, त्या घटनांचे साक्षीदार होताना मला पत्रकारितेचा खऱ्या अर्थानं लाइव्ह अनुभव आला. न्यूज अँकरिंग हे खूप व्हायब्रंट आणि ग्लॅमरस काम आहे असं आपल्याला वाटत असतं. पण बातमीचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर फील्डवर जाऊन रिपोर्टिंग करणं हे जास्त व्हायब्रंट काम आहे. एखाद्या बातमीचे जास्तीत जास्त कंगोरे तपासायचे असतील तर अशी बातमी करण्यामधला थरार अनुभवण्यासारखा असतो.

टीव्हीमध्ये आहे त्या क्षणासोबत राहून काम करावं लागतं. २४ तासांच्या बातम्यांच्या चक्राशी तुम्ही सारखे जोडलेले असता. पण तरीही एखादी बातमी लेखन, दृश्य आणि तंत्रज्ञान ही सगळी माध्यमं वापरून खूप तपशिलात जाऊन सांगण्यासाठी त्यासारखं दुसरं माध्यम नाही, असं मला वाटतं. अशी कंटेंट असलेली, आशय मांडणारी पत्रकारिता करता येते हे मी अनुभवलं आमच्या रिपोर्ताज या सीरीजमुळे. त्या सीरीजमध्ये मी ताडोबा अभयारण्याच्या परिसरातल्या बेकायदा कोळसा खाणी, कोकणातल्या वीज प्रकल्पांचे तिथल्या पर्यावरणावर होणारे परिणाम अशासारखे रिपोर्ताज केले. हे प्रभावी माध्यम असल्यामुळे थेट निर्णय घेणाऱ्यांपर्यंत पोचता आलं.

महिला पत्रकार म्हणून अशा प्रकारची स्टोरी करताना काय अनुभव येतात, असा प्रश्न विचारला जातो तेव्हा मला जाणवतं, अशी स्टोरी करताना आपण फक्त पत्रकार आहोत हेच माहीत असतं. लोक जेव्हा तुम्हाला प्रत्यक्ष काम करताना बघतात तेव्हा त्यांचे सगळे पूर्वग्रह विरून जातात. मी एक स्त्री असल्याने मी महिलांशी, मुलांशी लवकर नातं सांधू शकते आणि महिला, मुलं माझ्याशी जास्त खुलेपणानं बोलू शकतात, हाही अनुभव मला आलाच. एखाद्या विषयावर जेव्हा आम्ही लोकांची मतं घेत असतो तेव्हा पुरुष हिरीरीनं टीव्हीवर बोलायला समोर येतात. पण त्या वेळी तिथल्या महिलांना, मुलांना काय वाटतं हे जाणून घेण्याची उत्सुकता मला असते. आणि त्यांची मतं माझ्या रिपोर्ताजमध्ये मी अावर्जून घेते.

प्रिंट, टेलिव्हिजनमधली पत्रकारिता करतानाच मला डाॅक्युमेंटरीची वाट सापडली. एखादा विषय फक्त बातमीपुरताच मर्यािदत न राहता त्याबद्दल सर्व काही मांडावं असं मला वाटलं तेव्हा मी डाॅक्युमेंट्रीही केल्या. कोकणच्या समुद्री जीवनावर ‘गाज-कॉल ऑफ दि ओशन’, आणि पश्चिम घाटाच्या पर्यावरणावरची ‘नातं पश्चिम घाटाशी’ या दोन डाॅक्युमेंट्री मी केल्यात. एखादा अवघड विषय सोपा करून सांगताना एक डॉक्युमेंट्री मेकर म्हणून तर कस लागलाच या माध्यमामुळे, मी मल्टिटास्किंगही शिकले. पण कसोटीचे क्षण कसे हाताळायचे याचेही धडे मिळाले. एक पत्रकार म्हणून टेलिव्हिजनमधल्या अनुभवाने माझ्या जगण्याला वेगळं वळण दिलंय. कोणत्याही अनुभवाकडे व्यापक दृष्टीनं कसं बघायचं हेही शिकवलं आणि मला सन्मानाने जगण्याची प्रेरणा दिली.
arti.shekru123@gmail.com
बातम्या आणखी आहेत...