आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वस्‍त्रहरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरातून बाहेर पडण्यापूर्वी विद्याने आरशात बघून आपला जामानिमा ठीक केला. देवाला आणि आईला नमस्कार करून पायात चपला अडकवल्या. ‘आई येते गं!’ खांद्यावरूनची पर्स नीट करीत ती म्हणाली. ‘सांभाळून जा बरं बाळ, संध्याकाळी लवकर ये!’ बोलता बोलता कमलाबार्इंचा आवाज गहिवरला. विद्याचे पुढे पडलेले पाऊल जागीच अडखळले. आईच्या खांद्यावर थोपटीत तिची समजूत काढीत ती म्हणाली, ‘आई, तुला किती वेळा सांगितलं, अशी रडत जाऊ नकोस म्हणून. अगं आता मी लहान का आहे? माझं रक्षण करायला मी पूर्ण समर्थ आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. पूस बरं डोळे.’

आईचे डोळे पुसून मागे न बघता विद्या स्टँडकडे झपाझप चालू लागली. आईकडे बघितलं तर आपल्यालाच रडू येईल अशी धास्ती तिला वाटत होती. तिचे पाय वेगाने चालत होते तसे तिचे विचारचक्रही जोरात फिरत होते.

दोन वर्षांपूर्वी तिच्यासारखी सुखी मुलगी शोधून सापडली नसती. एकुलती एक, वडील बँकेत अधिकारी, आई सुशिक्षित सुगृहिणी. विद्याने बीएस्सीची परीक्षा दिली आणि कमलाबार्इंनी तिच्या लग्नासाठी खटपट करा म्हणून बाबांमागे लकडा लावला. पण विद्याला खूप शिकायचे होते, एमएस्सी करायचे होते. आवडीच्या विषयात संशोधन करायचे होते. तिला सध्यातरी लग्नाच्या बेडीत अडकायची इच्छा नव्हती.

विद्या कॉलेजमध्ये प्रथम आली आणि तिच्या पुढच्या शिक्षणावर जणू शिक्कामोर्तब झाले. मोठ्या उमेदीने तिने एमएस्सीला अ‍ॅडमिशन घेतली. आपल्या करिअरची सुंदर स्वप्ने ती रंगवीत होती. पण परमेश्वराच्या मनात काही वेगळेच होते.

किरकोळ आजाराचे निमित्त होऊन विद्याचे बाबा अचानक गेले. विद्यावर जणू आकाश कोसळले. तिची आई रडूनरडून वेडी व्हायची बाकी राहिली. हळूहळू दु:खाचा पूर ओसरला आणि वास्तवाचे भान आले. आता मायलेकींना एकमेकींकडे पाहून दिवस काढायचे होते. बँकेने फंडाची रक्कम दिली. फॅमिली पेन्शन मंजूर झाली. मिळणा-या रकमेतून आई-मुलगी प्रपंच भागवू लागल्या. विद्याने ठरवले, आता आपणच मन घट्ट करायचे. आईचा मुलगा व्हायचे. उरलेले शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची. तिला आधार द्यायचा आणि मगच लग्नाचा विचार करायचा.

विद्या मन लावून शिकू लागली. शिकता शिकता कर्त्यासवरत्या पुरुषाप्रमाणे प्रपंच सांभाळू लागली. आईची काळजी घेत राहिली. जणू ती आई आणि आई तिची मुलगी झाली होती. नियतीने तिला अकाली प्रौढत्व दिले होते. तिच्या बरोबरीच्या मुली मैत्रिणींसोबत वेळ घालवत. पण विद्या कॉलेज संपताच घरी येई, घरात हवं-नको बघे. आईला सर्व प्रकारे सुख देण्याचा एकच ध्यास तिच्या मनाने घेतला होता.

दोन वर्षे हा हा म्हणता संपली. विद्या उत्तम प्रकारे पास झाली. रामपूरपासून 30 किलोमीटरवर वाकडेवाडी नावाचे गाव होते. तेथे नुकतेच सायन्स कॉलेज निघाले होते. विद्याला तेथील मुलाखतीचे बोलावणे आले आणि माध्यमिक शिक्षक म्हणून निवडही झाली.

विद्याचा आनंद गगनात मावेना पण कमलाबाई मात्र खूपच अस्वस्थ झाल्या होत्या. तरुण, सुंदर, मुलगी रोज एकटी प्रवास करणार, परक्या ठिकाणी, तेही खेड्यात जाऊन नोकरी करणार, तेथे तिला कशी माणसे भेटतील? कुणी तिला अपाय करील का? ती अब्रूनिशी घरी परत येईल का? एक ना दोन, आईचे मन चिंती ते वैरी न चिंती. त्यांना वाटे, तिला म्हणावे, ‘काही करू नकोस नोकरी, दोनाचे चार हात करून आपल्या घरी सुखाने नांद.’ पण तिने ऐकले नसते. शिवाय पैसा मिळवण्याची गरज होती. नाइलाजाने बिचा-या गप्प बसल्या आणि आज त्यांची लाडकी लेक प्रथमच कामावर जायला निघाली होती. डोळे पुसत त्या तिच्या पाठमो-या आकृतीकडे बघत होत्या.

विद्या विचारांच्या तंद्रीत एसटी स्टँडवर पोहोचली. वाकडेवाडीची गाडी लागलीच होती. सकाळच्या प्रसन्न वेळी दीड तासाचा प्रवास हा हा म्हणता संपला. विद्याने आपल्या नवीन जीवनाला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली. फर्स्ट इयरला सायन्सला फारशी मुलं नव्हती, पण जी होती ती हुशार, चुणचुणीत होती. त्या मुलांना एखाद्या विषय समजावून सांगताना तिला कमालीचा आनंद होई. विद्या मूळची हुशार असल्याने अवघड विषयही सोपा करून सांगत असे. मुले तल्लीन होऊन तिचे लेक्चर ऐकत. अल्पावधीतच ती विद्यार्थिवर्गात लोकप्रिय झाली. तिच्या नोकरीचे दिवस असे मजेत चालले होते. घरी आली की ती आईला कॉलेजच्या गमतीजमती सांगत असे. कमलाबाई एक दिवस बरा गेला म्हणून सुटकेचा श्वास सोडीत.

विद्याचा हा आनंद टिकायचा नव्हता म्हणूनच की काय पण अचानक एक संकट तिच्यापुढे येऊन उभे ठाकले. विद्याच्या वर्गात असलेला अशोक जाधव गावच्या सरपंचांचा मुलगा होता. तो पहिल्या परीक्षेत सर्व विषयांत नापास झाल्याने विद्याने त्याच्या घरी पत्र लिहिले. आपण आपल्या हाताने संकटाला निमंत्रण देतोय हे विद्याला आधी समजले नाही. जेव्हा उमजले तेव्हा फार उशीर झाला होता. अशोकचा मोठा भाऊ बाजीराव म्हणजे नंबर एकचा उनाड माणूस. वाकडेवाडीत त्याला सगळे भिऊन असत. दोन मुलांचा बाप असलेल्या बाजीरावची वाकडी नजर जिथे पडेल तिथे विनाश हे ठरलेले समीकरण होते. विद्याला भेटायला बाजीराव कॉलेजमध्ये आला आणि तिचे सुंदर व्यक्तिमत्त्व पाहून वेडापिसा झाला. साम, दाम, दंड, भेद कोणत्या का मार्गाने, तिला वश करायचेच असा त्याने पण केला.

दुस-या दिवशी कॉलेज संपवून विद्या गेटच्या बाहेर आली, तेव्हा दाराशीच तिला बाजीराव मोटारसायकल घेऊन थांबलेला दिसला. बाजीराव झकपक कपडे करून, गॉगल लावून ऐटीत उभा होता. तिला पाहताच अदबीने पुढे होऊन तो म्हणाला, ‘चला मॅडम, आज मी तुम्हाला स्टँडवर सोडतो. मला तिकडंच जायचंय.’

‘छे, छे, मी जाईन पायी,’ असे म्हणून विद्या सरळ पुढे निघाली.

बाजीराव मनातून खट्टू झाला. हे काम सोपे नाही हे त्याने लगेच ताडले. पण तो हिंमत हरणारा नव्हता. कसेही करून काम फत्ते करायचेच हे त्याचे धोरण होते. तो कोडग्यासारखा रोज कॉलेजच्या गेटजवळ येऊन थांबे. कधी-कधी कारण नसताना वर्गात येई, तर कधी स्टाफरूममध्ये शिरून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करी. हळूहळू कॉलेजमध्ये या गोष्टीची चर्चा होऊ लागली. विद्याच्या पाठीमागे सर्वजण कुजबुजत. विद्याला हा प्रकार अगदी असह्य होऊन जाई. तिला आपल्या कामात रस वाटेना. तिची हसरी चर्चा पार कोमेजली. पण घरी परतल्यानंतर आईला यातले काही कळू नये म्हणून ती दक्षता घेई.

कॉलेजला दिवाळीची सुटी लागायला दोनच दिवस उरले होते. एवढे दोन दिवस पार पडले की काही काळ का होईना, आपल्याला मन:शांती लाभेल म्हणून विद्या आनंदात होती. बाजीराव मात्र हट्टाला पेटला होता. आज कसेही करून विद्याला मोटारसायकलवरून घेऊनच जायचे म्हणून त्याने चंग बांधला. कॉलेज संपताच इकडे-तिकडे न बघता विद्या सरळ स्टँडवर निघाली. बाजीराव बाहेर उभाच होता. तिला बघताच तो हळूहळू पाठोपाठ निघाला. कॉलेज ते स्टँड अंतर बरेच होते. मधल्या वळणावर पूर्णपणे शुकशुकाट होता. विद्या जीव मुठीत धरून भरभर निघाली होती.

अचानक बाजीरावने मोटारसायकल आडवी घातली व तिला काही कळायच्या आत एका हाताने उचलून मोटारसायकलवर बसवले व गाडी वेगात सोडली. विद्या बचावासाठी मोठमोठ्याने ओरडत होती. तिच्या सुदैवाने व बाजीरावच्या दुर्दैवाने त्याच वेळी समोरून येणारी पोलिस जीप पाहून त्याने पटकन तिला खाली ढकलून दिले. पण जाताना तिला बजावले, ‘आज सुटलीस, पण लक्षात ठेव, एक दिवस तुझे वस्त्रहरण करीन तरच नावाचा बाजीराव.’

‘अरे जा, जिथे दुर्योधनही हरला, तिथे तुझी काय कथा! नाही तुला अद्दल घडवली, तर नावाची विद्युल्लताच नाही,’ त्वेषाने ती उद्गारली. बाजीराव काही घडलेच नाही अशा थाटात निघून गेला. जीप जवळ येताच विद्याने हात दाखवला. इन्स्पेक्टर माने आपल्या सहका-यांसह चालले होते...
(पूर्वार्ध)