आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुन्‍हेगारीचा प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेस्क्यू होमच्या माझ्या ऑफिसमध्ये मी बसले होते. होममध्ये नवीन आलेल्या मुलींची सगळी तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे हा माझ्या कामाचाच एक भाग होता. मी काम करत असतानाच ती आली - नवीन भरती! मी तिला बसायला सांगितलं! माझं काम करत असतानाच मी अधूनमधून तिच्याकडे नजर टाकत होते. गव्हाळी वर्ण, मधोमध भांग पडून लांब केसांच्या दोन वेण्या पुढे घेतलेल्या, कपाळावर छोटीशी टिकली, सौम्य रंगाचा पंजाबी ड्रेस आणि त्याहीपेक्षा तिच्या चेह- यावर असणारा शांत, सौम्य भाव! आमच्या होममध्ये येणा- या मुलींमध्ये हा असा शांत भाव क्वचितच दिसायचा! तिच्याशी बोलायच्या आधीच तिचा चेहरा मनात ठसला. का आली असेल ही इथे? दुस-या आश्रमातून बदली होऊन आली असेल का? की घरातून पळून गेली असेल? कुणी अपहरण तर नव्हतं न केलं हिचं?

हातातले काम संपवून मी तिला माझ्या समोर बोलवले. इन-टेक फॉर्म पुढे ओढला. ‘गुड मॉनिंग,’ मी हसून म्हणाले. तिच्या शांत चेह- यावर मात्र हसू उमटले नाही. ‘कशी आलीस तू इथे?’ तिची प्राथमिक माहिती भरून झाल्यावर मी विचारले. ‘पोलिस इथे घेऊन आले,’ ती उद्गारली. ‘हो, अगं पण कुठून? पोलिसांपर्यंत कशी पोचलीस?’ मी विचारले. ‘पोलिसच पोचले माझ्यापर्यंत माझ्या घरी!’ मी आश्चर्यचकित झाले. हे वेगळं होतं. नाहीतर मुली एक तर पळवून नेल्यामुळे, घर सोडून आल्यामुळे व काहीतरी अडचणींमुळे पोलिसांपर्यंत पोचलेल्या असत. माझे विचार कळल्यासारखी ती म्हणाली, ‘मला आणि माझ्या आईवडिलांना घरीच पकडलं पोलिसांनी!’ आता मात्र मी चक्रावलेच. काही क्षणांचा अवसर घेऊन मी तिला काय झालं ते नक्की सांगायला सांगितलं. मनाची तयारी करून तिने मला सांगायला सुरुवात केली.

‘मी आणि माझ्या आईवडिलांनी डोक्यात वरवंटा घालून माझ्या वहिनीला ठार मारलं.’ ती त्याच शांतपणे म्हणाली. मला बसलेला धक्का चेह- यावर न दाखवण्यासाठी मला निश्चितच प्रयत्न करावे लागले. पोलिसांनी अटक केली म्हणजे तिने काहीतरी गुन्हा केलेला असणार हे जाणवलं असलं तरी चक्क खून? तिच्या तोंडून ऐकल्यावरही त्यावर विश्वास ठेवणं कठीण जात होतं. ‘एक वर्षच होती भाभी आमच्याकडे!’ ती सांगत होती. ‘पण दीदी, तिने आमचं आयुष्य नरक करून टाकलं. आईवडिलांनी अपार कष्ट करून भावाला मोठं केलं, नोकरी मिळवून दिली, लग्न केलं, पण हिने त्याला आमच्यापासून तोडलं. तिने आम्हाला इतका त्रास दिला की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. तिला सहा महिन्यांनंतर आम्ही वेगळं बि- हाड करून दिलं पण परिस्थिती तीच! ती जादूटोणा करायची दीदी, आमचे भयंकर हाल केले तिने.’

‘अगं म्हणजे नक्की केलं काय तिने? आणि सहा महिन्यांपासून तर वेगळीच राहत होती न ती?’

‘वेगळी राहूनही तिची कारस्थानं बंद झाली नाहीत. दीदी तिला जर संपवलं नसतं तर आम्हीच संपलो असतो, अशीच परिस्थिती आणली होती तिने. आम्ही शेवटी नाइलाजाने हे ठरवलं! तिच येणं-जाणं तर होतंच आमच्याकडे. त्या दिवशी तिला मुद्दाम बोलवलं, आईबाबांनी तिचे हात धरले आणि मी वरवंटा मारला डोक्यात! रक्त उडालं, वरवंटा हातातून गळून पडला, तो पुन्हा उचलून घाव घालायची ताकद नाही राहिली. मग पुढचं काम आईबाबांनीच केलं. भावाने नंतर मिसिंगची तक्रार नोंदवली आणि आमच्यावर संशय व्यक्त केला.’

‘तू काय करतेस?’ मी कसंबसं विचारलं. ‘एफवाय बीकॉम!’ पुढचं काम मी अक्षरश: यंत्रवत पूर्ण केलं. आमच्या दोघींच्या वयात फक्त 4-5 वर्षांचं अंतर होतं. संपूर्ण दिवस तिचा विचार मनातून जाईना! दुस- या दिवशी सकाळी ऑफिसात पोचले तर तिच्या नावाने पोलिस आलेले! ‘कुठे न्यायचंय?’ ‘आर्थर रोड.’ मी हबकलेच! ‘काल तिच्या घरी तिचं स्कूल लीव्हिंग सर्टिफिकेट सापडलं. तिला 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. आता ती बालगुन्हेगार या सदरात मोडत नाही.’ आता तिचा कालचा शांतपणा ढळला होता. हात कापत होते, घशाला कोरड पडली होती. आमच्या अधीक्षिका मॅडमनी तिला बसायला सांगितलं, पाणी दिलं, चार धीराच्या गोष्टी सांगितल्या आणि अखेर ती गेली.

माझी अस्वस्थता मात्र संपली नाही. केवळ काही आठवड्यांच्या फरकाने तिला बालगुन्हेगार या सदरातून एकदम प्रौढ गुन्हेगार या वर्गात टाकले होते. त्यामुळे पूर्वनियोजित खून व खुनात प्रत्यक्ष सहभाग हे ग्राह्य धरून तिच्यावर खटला चालणार होता. ज्या मुलीच्या हातून फुलपाखरूही मारलं जाणार नाही, अशा मुलीच्या हातून खून झालाच कसा? जरी मान्य केलं की वहिनीने त्यांना खूप त्रास दिला होता, तरी तो खरोखर तिचा खून करण्याइतका भयंकर असू शकतो? इतर कोणतेच मार्ग खरोखरच उपलब्ध नव्हते? कॉलेजला जाणा-या एका सरळमार्गी मुलीची मजल खून करण्यापर्यंत जाते तेव्हा तिचा मनोव्यापार काय असेल? की ठरावीक काळ सारासार विचार करण्याची शक्तीच ही माणसे गमावून बसतात?

काही केल्या तिने दिलेले खुनाचे कारण मला सयुक्तिक वाटत नव्हते. माझ्याशी बोलताना तिच्या बोलण्यात फारसा पश्चात्तापही नव्हता. आता पुढे ज्या दिव्याला ती सामोरी जाईल, त्या वाटेवर तरी तिला पश्चात्ताप होईल? विसकटून गेलेलं आयुष्य तिला पुन्हा सावरता येईल? अनेक प्रश्नांनी माझ्या मनात फेर धरला होता. हे कृत्य करण्याच्या आधीच जर त्यांनी त्यांच्या कौटुंबिक समस्येबाबत मदत घेतली असती, समुपदेशन घेतले असते तर ही वेळच आली नसती असे वाटले.

माझी अस्वस्थता जाणवून मॅडम माझ्याजवळ आल्या व म्हणाल्या, ‘हे बघ, सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात. ही मुलगी आपल्या हातातून गेली, पण अजून 40 मुली आपल्या हातात आहेत. बालगुन्हेगार ठरल्यामुळे का होईना, त्यांना एक संधी मिळाली आहे. त्या संधीचं सोनं करायला आपण मदत करू शकतो. यातली एकही मुलगी ती होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो. यासाठी गरज आहे ती माणुसकीची, शिस्तीची, संयमाची आणि हळूहळू त्यांच्या आयुष्याला वळण लावण्याची! हे काम फार मोठं आहे, आपल्याला निराश व्हायला खरंच वेळ नाही!’ त्यांच्या या शब्दांनी माझ्या मनावर फुंकर घातली! आजही निराशा येते तेव्हा त्यांचे हेच शब्द माझी मरगळ झटकून मला नवा उत्साह देतात!