आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रॅगिंगला चाप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ममता जाम खुश होती. बारावीनंतर तिच्या आवडीच्या महाविद्यालयात तिला प्रवेश मिळाला होता. सुंदर ड्रेस घालून ती तयार झाली. गाडीवरून महाविद्यालय परिसरात प्रवेश केला. एवढ्या मोठ्या महाविद्यालयात ती प्रथमच येत होती. दुतर्फा मुले बसलेली. मनातून खूप घाबरली. पटापट पाय-या चढून आपल्या वर्गात गेली. वर्गात तिची एक मैत्रीण भेटल्याने ती खुश झाली. संध्याकाळी घरी जायला निघाली तर तिची गाडी पंक्चर. तिचा फारच मूड गेला. ती गाडी हाताने धरून घेऊन निघाली आणि टवाळखोर मुलांचा चिडवण्याचा आवाज तिला आला. तिला खूप धडधडायला लागले, घाम फुटला, तिने तशीच गाडी पुढे नेली. पंक्चरवाल्याचे दुकान महाविद्यालयाच्या बाहेरच दिसले. चाकात कुठेच छिद्र नव्हते. म्हणजे गाडी पंक्चर झाली नव्हती, तर गाडीतली हवा काढलेली होती. तिचा संताप झाला. वेळही गेला. मग तडक घरी आली. घडलेली गोष्ट सांगितली. आईने समजावले. शांत राहायला सांगितले.

दुस-या दिवशी पुन्हा तेच. असे जवळपास आठ दिवस चालू होते. गाडीतील हवा काढणारे मुलांचे टोळके सीनियर्सचे होते. त्यांच्या कॉमेंट्स कमी होत नव्हत्या आणि पुन्हा गाडीचा दररोजचा त्रास. नवीन येणा-या मुलामुलींना मानसिक त्रास देण्याचे काम सो कॉल्ड सीनियर्स करत होते. एकूण काय तर महाविद्यालयात रॅगिंगचे प्रस्थ बरेच वाढले होते तर... खरे तर महाविद्यालयाच्या आॅफिसच्या जवळ रॅगिंगबाबतचा बोर्ड तिने वाचला होता. तिने थेट प्राचार्यांकडे तिला रॅगिंगमुळे होणा-या त्रासाची माहिती देण्याचे ठरवले.

रॅगिंग याचा अर्थ कोणत्याही शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यास शारीरिक किंवा मानसिक हानी पोहोचेल अथवा पोहोचण्याची शक्यता असेल किंवा धास्ती, भय, लज्जा किंवा अडचणीत आल्याची भावना निर्माण होईल अशी गैरवर्तणूक करणे किंवा असे कोणतेही कृत्य करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांस मानसिक त्रास होईल. यात विद्यार्थ्यास चिडवणे, शिवीगाळ, धमकी देणे, खोड्या काढणे, मनाला टोचेल असे बोलणे तसेच नवीन विद्यार्थ्यास तो स्वत: होऊन जे कृत्य करणार नाही असे कृत्य त्याच्या इच्छेविरुद्ध करावयास लावणे याचा समावेश होतो.

महाविद्यालयातील रॅगिंगचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन 1999मध्ये महाराष्‍ट्र रॅगिंग प्रतिबंध कायदा मंजूर करण्यात आला. त्यानुसार कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा तिच्या बाहेर रॅगिंग करण्यास मनाई आहे. जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या रॅगिंग करत असेल, त्यात भाग घेत असेल, त्यास अपप्रेरणा देत असेल किंवा त्याचा प्रचार करत असेल तर त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास आणि 10,000 रु.पर्यंतचा दंड होऊ शकतो.

महाविद्यालयात अशा प्रकारे रॅगिंग करणा-या विद्यार्थ्यास अपराध सिद्ध झाल्यानंतर शैक्षणिक संस्थेमधून काढून टाकता येते तसेच पाच वर्षांकरिता त्याला डिबार करता येते. म्हणजेच त्यास रॅगिंगच्या कारणाने काढून टाकल्यास आदेशाच्या दिनांकापासून पाच वर्षांच्या कालावधीकरिता कोणत्याही इतर शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश देता येणार नाही.

या कायद्याच्या कलम 6 अनुसार कोणाही विद्यार्थ्याने किंवा त्याच्या वतीने आईवडील किंवा पालकांनी किंवा त्या शैक्षणिक संस्थेचा शिक्षक, शैक्षणिक संस्थेच्या प्रमुखाकडे रॅगिंगची लेखी तक्रार केली असल्यास सात दिवसांच्या आत संस्थाप्रमुखास चौकशी करणे आवश्यक आहे. रॅगिंग करणा-या विद्यार्थ्यास निलंबित करण्याचा अधिकारही संस्थाप्रमुखास आहे. ही तक्रार स्थानिक पोलिस ठाण्याकडे त्वरित पाठविणे आवश्यक आहे. संस्थाप्रमुखांनी तकारीची दखल घेतली नाही अथवा कारवाई केली नाही तर त्यास रॅगिंगला अपप्रेरणा दिली असे समजले जाईल आणि तोही शिक्षेस पात्र होईल.

रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे प्रत्येक महाविद्यालयाला बंधनकारक आहे. त्यानुसार महाविद्यालयात अँटी रॅगिंग कमिटी व अँटी रॅगिंग स्क्वॉड नियुक्त करणे, अँटी रॅगिंग कमिटीमध्ये स्थानिक नागरिक, पोलिस प्रशासन, प्रसारमाध्यमे, अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महाविद्यालयीन शिक्षक, पालक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी यांचा समावेश करावा असे सूचित केले आहे. महाविद्यालयात रॅगिंग होऊ नये यासाठी समुपदेशन वर्ग आयोजित करावे असेही सांगितले आहे.