आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रानभाज्यांचा दुर्मीळ ठेवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

19व्या शतकात आहारात रानभाज्यांचे प्रमाण खूप होते. शेतात, जंगलात खुरपणी करायला गेल्यावर नैसर्गिकरीत्या उगवलेल्या या भाज्या शेजाया-पाजायांना मोफतच मिळत. पण शहरीकरण व रोजंदारीचे वाढलेले भाव यामुळे या भाज्या ग्रामीण भागातही सध्या विकतच घ्याव्या लागतात. या भाज्यांचे अनेक औषधी उपयोग आहेत. उदा. तांदुळजा भाजीने पोटाचे आरोग्य सुधारते, त्यामुळे ग्रामस्थ त्याचा वापर खूप करतात. कोकणात व खानदेशी रानभाज्यात खूप प्रकार आहेत. सध्याच्या पिढीला या रानभाज्यांत रस नाही. जंगल व शेतात नैसर्गिकरीत्या या रानभाज्यांचे उगवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या भाज्या विकून प्राप्ती होत नसल्याने रोजंदारीच्या अंगाने या भाज्या जंगलातून आणून विकणे परवडत नाही.

पावसाची चाहूल लागताच पावसाळी रानभाज्या मोठ्या प्रमाणात मुंबई-ठाण्यात दिसू लागतात. एरवी वर्षभर मेथी, शेपू, पालक, चवळी, लाल माठ यांसारख्या अनेक पालेभाज्या रोजच्या जेवणाचा भाग असतात; परंतु खास पावसाळी रानभाज्या खाणे, हा एक वेगळाच अनुभव असतो. टाकळा, शेवरं, कंटोली, भारंगी, फोडशी, कुळू यांसारख्या अनेक भाज्यांची दर्दी खवय्ये मंडळी वाट पाहात असतात. वसई, विरार, पनवेल, कर्जत, नेरळ, अलिबाग या भागांमधून मुंबईच्या बाजारात या भाज्या येतात. जंगलावर उपजीविका करणारे आदिवासी या पावसाळी भाज्या ओळखण्यात पारंगत असतात. पनवेलच्या सुशीला म्हात्रे या दादर येथे खास पावसाळी रानभाज्या विकतात. त्या म्हणाल्या, शेवरं शोधण्यासाठी नजर लागते. कुठलीही भाजी शेवरं म्हणून बाजारात आणून चालत नाही. जंगलात खूप आत गेल्यावर मोठ्या झाडांच्या मुळाशी ही भाजी आढळते. शेवरं खाण्याचा एक विशिष्ट काळ असतो. पाऊस जास्त पडला तर ही भाजी न खाणेच श्रेयस्कर, असे अनुभवाचे बोलही त्यांनी ऐकवले. शेवरं या भाजीला ‘व्हेज खिमा’ असेही म्हटले जाते. गावांतील घरेही आता माती-दगड-शेणाऐवजी सिमेंट काँक्रिटची झाल्याने स्वाभाविकच त्या घरांना मातीचे अंगणही आता उरलेले नाही. त्यामुळे टाकळ्यासारखी भाजीही आता उगवत नाही. परिणामी, गेल्या काही वर्षांत टाकळा पूर्वीइतका येईनासा झाला असल्याचेही सुशीलाताई सांगतात.

माझे एक खानदेशातील मित्र आत्माराम सुरळकर यांनी काही रानभाज्यांची माहिती दिली ती पुढीलप्रमाणे आहे.
1) दुडीची फुले : हा वेल शेतात व इतरत्र नैसर्गिकरीत्या उगवतो. या वेलाच्या फुलांची भाजी करतात. ही पोटाच्या विकारावर गुणकारी आहे.
2) करटुली : या भाजीचा वेल असून ती दुडीप्रमाणेच उगवते. यास काट्यासारखीच फळे येतात. त्याची भाजी बनवतात. ही भाजी रुचकर असते व त्याचा काटेरी भागही शिजतो.
3) तांदुळजा : पावसाळ्यात सर्वत्र उगवतो व त्याचा भाजी म्हणून वापर होतो.
4) माठला : ही एक पालेभाजी रानात उगवते व तांदुळजाप्रमाणेच तिचा वापर आहे.
5) कुर्डू : याच्यात केनी कुर्डु व दुसरा वाटोळ्या पानाचा कुर्डू असे दोन प्रकार आहेत. श्रावणात वाचल्या जाणाया कहाणीसंग्रहात या केनी कुर्डूचा उल्लेख सापडतो.
6) घोळ (चिवई) : ही भाजी आंबट असून त्याची पाने जाड असून त्यात पाण्याचा अंश असतो. घोळचे पीठले प्रसिद्ध आहे.
7) तरोटा : तरोट्याची पाने मेथीप्रमाणे असतात. हे झाड उगवल्यावर त्याची कोवळी पाने तोडून भाजी बनवतात. भाजी किंचित कडू लागते, पण सांधेदुखीसाठी उत्तम आहे.
8) रानतोंडली : खानदेशातील जंगलात याचे वेल आढळतात. ही तोंडली नेहमीपेक्षा आकाराने मोठी असतात, चवीस किंचित कडू लागतात.
9) भुई पालक : ही भाजी जमिनीला अगदी चिकटून येते. याची पाने पालकासारखी लांबोळी असून त्यास काठावर कंगोरे असतात. चव पालकासारखी पण किंचित कडसर असते.
10) रानशेपू : हा जंगलात आपोआप उगवतो. उग्र वासाचा असून याची भाजी प्रकृतीस उत्तम असते.

तसेच नेहमी केळीच्या बागेत जमिनीस चिकटून उगवणारी भाजी चिवई होय. ही पालेभाजी थंड असून हिचा उन्हाळ्यात वापर करतात. उन्हाळ्यात वेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतात, त्या म्हणजे भोकराच्या किंवा गोंधण या झाडाला येणाया कच्च्या बारीक भोकरांना चिघोर असेच म्हणतात. याची कोरडी भाजी बनवतात. रसभाजी बनवल्यास चिकट होते. तसेच अभेटा (आपटा) या झाडास येणाया फुलांच्या कळ्यांची (यासही चिघोर म्हणतात.) भाजी बनवतात. ही भाजी किंचित तुरट लागते. सौदंड (शमी) या झाडास चैत्र वैशाखात येणाया शेंगांची भाजी उन्हाळ्यात खातात. रानभाज्या केवळ पावसाळ्यात नाही तर उन्हाळ्यातही येतात, हे निदर्शनास येते.

जंगलात याखेरीज अनेक फळभाज्या येतात. जसे रानवांगी, रानदोडकी, रानभोपळे. गोल रानभोपळ्याचा तंबोयाकरता वापर होतो. रानटोमॅटो (कटमणी), रानभेंडी, रानघेवडा अशाही इतर भाज्या आहेत. या सर्वांचा खाण्याकरता वापर करत नाहीत. कोकणात गौरीच्या वेळेला काही रानभाज्यांना मानाचे स्थान मिळत असते. सजावट व खाण्याकरता भाजी म्हणूनही त्यांचा वापर होतो.

पांचगणीच्या जंगलात एक झुडूप आढळते, त्यास गोल पेरूसारखे फळ येते. या फळाची भाजी करतात व ती दुधी भोपळ्यासारखी लागते. यास स्थानिक भाषेत ‘चिचू’ असे म्हणतात. याचीच झाडे हिमालयात व नेपाळातही आढळतात. त्यास ‘इस्कूस’ असे म्हणतात. कोकणात करंदा नावाचे एक कंदमुळ जंगलात मिळते. हे गडद चॉकलेटी रंगाचे असते. त्यास मुळे असतात. हे कंद उकळून त्याची भाजी करतात. कोकणात तळ्यामध्ये त्याच्या गाळात एक प्रकारचे कंद होतात. याचे पीठ करून ते उपवासाला खातात. हे पीठ साधारण शिंगाड्याच्या पीठाप्रमाणे लागते. याशिवाय शेवळे नावाचे एक मूळ मिळते. यात सोडियमचे प्रमाण खूप असल्याने ते खारट लागते. कोनफळ हा गुजराती उंदियोचा कंद म्हणून प्रसिद्ध आहे आणि जंगलात कोनफळाचेही कंद आढळतात. जंगलात भांबुर्डेची झुडपे आढळतात. याची पाने पुढीलप्रमाणे उपयोगात आणली जातात. मडक्यात वाल, वांगे, कांदे, बटाटे तसेच इतर काही भाज्या भरून मडक्याच्या तोंडावर भांबुर्डे याचा पाला घालतात. यानंतर हे मडके उलटे वाळलेल्या गवतावर ठेवतात. गवताचीच भट्टी पेटवून मडके चांगले भाजतात. उष्णतेनेही भाजी छान भाजून निघते व त्यास पानांचाही चांगला स्वाद येतो.

हे मडके नीट भाजले गेले की नाही, हे चपलेने वाजवून बघतात. ही भाजी रुचकर लागते व यास पोपटी असे म्हणतात. कोकणात जंगलात एक प्रकारची वनस्पती होते. या वनस्पतीस हाडसांधी असे नाव आहे. हाडाला मुका मार लागल्यास या वनस्पतीचा लेप त्यावर देतात. कोकण व घाटावर कणगर नावाचा एक वेल जंगलात आढळतो. यास गोल फळे येतात. ही फळे बटाट्याप्रमाणे टणक असतात. याची भाजी केली जाते. या कणगरला गोवा पोटॅटो असे लोक म्हणतात. ऋषिपंचमीला बैलाच्या श्रमाचे वर्ज्य असते. त्यामुळे नैसर्गिकरीत्या उगवलेल्या या रानभाज्या त्या दिवशीच्या उपवासाच्या फराळात खातात. पुण्याच्या मंडईत ऋषिपंचमीच्या दिवशी या रानभाज्यांचे वाटे विकायला येतात. त्यातील काहींची नावे त्या विक्रेत्यांनाही माहीत नसतात. उंबराच्या कच्च्या बारीक फळांची भाजी, अगस्तीच्या फुलांचे पिठले, अशा पाकक्रिया सध्याच्या युगात इतिहासजमा होत आहेत. रानभाज्यांची नावे सांगणारी व त्यांचे गुण-दोष सांगणारी माणसेही आता अस्तित्वात नाहीत. वनस्पतीशास्त्राच्या व ग्रामीण संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा निसर्गठेवाही हळूहळू काळाच्या पडद्याआड जात आहे, हीच खंत आहे.