आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शालीची नजाकत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘जन्नत देखने के लिए मरने का इंतजार न करें; कश्मीर आएं’ - असं कोणीसं फार पूर्वी जम्मू-काश्मीरबद्दल म्हटलेलं आठवतंय. किती नेमकेपणाने त्यांनी काश्मीरचं वर्णन केलंय, नाही? बर्फाच्छादित पर्वतशिखरं, झुळझुळ वाहणारे झरे-नद्या, चिनार वृक्ष-जिथे बघावं तिथे सौंदर्य. अशात जर तेथील रहिवाशांच्या कलेतून तो पुन:प्रत्ययास न आला तरच नवल! जसे येथे सौंदर्याचे अवतार अनेक तसेच येथील कलाप्रकार अनेक - शाली, गालिचे, भरतकाम, लाकडीकाम, अक्रोडापासून (झाडापासून) विविध वस्तू, पेपिअर-मॅशे, तांबा व चांदी इ. धातूकाम एक-ना-अनेक.

लोकर व त्यापासून विविध वस्त्रप्रकार तयार करणे हा उद्योग मुळात आपल्याकडचा नाहीच! होय. भारत कधीच लोकर उत्पादक म्हणून खास ओळखला गेला नाही. आपल्याकडे या उद्योगाचा जीवही मोठा नाही. आपल्या हवामानामुळे असेल, लोकरीच्या वस्त्रांची फारशी आवश्यकता भासत नाही व ती तयार करण्यास लागणारा नैसर्गिक कच्चा मालही उपलब्ध नाही. त्यामुळे मुगल युगाच्या पूर्वीपासून जोपासला गेलेला हा कलाउद्योग काश्मीर व अमृतसर, लुधियाना येथे आढळतो. तो पर्शिया (इराण)मधून आला असे म्हटले जाते.

‘शाल’ हा शब्दही पर्शियन. अर्थ : लोकर. तेथे सर्व लोकरीच्या कपड्यांना ‘शाल’ या समूहवाचक नावाने ओळखले जात असे. आपल्याकडे लोकरीचे हे एक असे कला-वस्त्र तयार झाले की ज्याचे नाव ते. इतकी कुशल कारागिरी की बघणा-याचे भानच हरपावे! येथे अशी स्वर्गीय कला व लावण्य यांचा सहवास लाभल्यामुळे असेल, येथे हा उद्योग पाहुणा असला तरी स्थिरावला - इथलाच झाला. स्वत:चा असा कायापालट होणारसं बघून हरखूनच गेला असावा. जहाँपनाह अकबर भारावला तसाच. हो, अशीही एक आख्यायिका आहे : अकबराने भारतात सर्वत्र उपरणे घेण्याची पद्धत पाहिली - ती त्यास खास आवडली. मग त्याने शाल घेतली. घेताना विविध प्रकारे घेऊन पाहिली. मात्र तो त्या शालीच्या मऊसूत, उबदार स्पर्शाने, तिच्या मोहक रूपाने इतका मंत्रमुग्ध झाला होता की त्याला आता ती घडी करून घेववेना मग त्याने त्याची स्वतंत्र शैली निर्माण केली - जी पुढे उभ्या हिंदुस्थानात रूढ झाली - खांद्यावरून नुसतीच सोडायची. हो, आता वावरताना हिला सावरावं लागतं. पण ती सावरण्याची लकब एक छान स्टाइल बहाल करते, रुबाब वाढवते. या शाली राजेरजवाड्यांकडे शोभाव्यात अशाच व त्यांचे अर्थकारणही त्यांनीच करावे असे.

काश्मिरी शाल मुख्यत: तीन प्रकारांत तयार होते. वुलन, पश्मिना, शाहतूश. वुलन म्हणजे लोकरीची, पश्मिना म्हणजे पश्म - अर्थात एका विशिष्ट जातीच्या बकरीच्या केसापासून सूत कातून केलेली असते. त्यामुळे पश्मिना प्रचंड मऊ, हलकी, मात्र तेवढीच उबदार असते (व महागही - कच्च्या मालाची कमी उपलब्धतता व कारागिरीला लागणारा वेळ ही याची मुख्य कारणं होत.) ‘शाहतूश’ तर त्याहून महाग. आता तर दिवसेंदिवस तिचं अस्तित्वही धोक्यात आहे. कारण ज्या जीवापासून ते बनते तो जीवच धोक्यात आहे. पण ही ती शाल आहे जी ‘अख्खीच्या अख्खी’ एका अंगठीतून जाऊ शकत असे! केवढी तलम! ती तयार करणारे कारागीरही काय कमालीचे असतील! वाचकहो, ज्यांच्याकडे ही असेल त्यांनी ती जतन करावी. आता तशी विकत मिळण्याची सोय नाही. कारण आता तशी निर्माणच होणे नाही. कारण सरकारची तशी बंदीच लागू झाली आहे. आता साहजिकच तुम्ही म्हणाल, मग अशक्य कोटीतील गोष्टींची चर्चा कशाला? तर यासाठी की रसिकांसाठी शाहतूश नाही पण इतर दोन प्रकार मात्र पूर्ण रेंजमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे प्युअर वुलच्या ऐवजी अ‍ॅक्रिलिक वा विस्कोस (काश्मीरऐवजी लुधियाना, बाराबाँकी) प्युअर पश्मिनामध्ये रेशमाचे प्रमाण थोडे वाढवलेले असते. थोड्या फरकाने केवळ आपल्या ‘पर्स’वरचा भार कमी होतो असे नव्हे तर आपल्याला हवापालटाची वाट बघावी न लागता कधीही या मनाजोगत्या शाली वापरता येतात! (तसेच कला व कारागिरी शाश्वत राहतेच.) यावर कशिदा करण्याचीही एक वेगळी पद्धत व संस्कृती आहे, ज्यामुळे त्यांची किंमत आणि मूल्य कैक पटींनी वृद्धिंगत होते. ते एक वेगळेच विश्व होय.