आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्‍या तिघी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज अनेक दिवसांनंतर त्या इमारतीत काही कामानिमित्त जाण्याची वेळ आली. अनेकदा तिथे गेल्यामुळे तेथील अनेक चेहरे व त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी माझ्या चांगलीच ओळखीची झाली होती. दुपारची वेळ असल्यामुळे इमारतीत शांतता होती. जेवणं आटोपून सुपारी चघळत त्या तिघींनी येण्या-जाण्याच्या वाटेत अर्थात पाय-यांवर गप्पांचा अड्डा जमवला होता.

खरं तर त्यांची मैत्री होण्यासारख्या कोणत्याही समान गोष्टी त्यांच्यात नव्हत्या, तरीही त्या मला नेहमी एकत्र दिसायच्या. त्यांच्या गप्पांचे विषय काय असावेत, याबद्दल मला अनेकदा उत्सुकता वाटत असे. काही दिवसांपूर्वी मला अचानक शोध लागला की त्या तिघी एकत्र येण्यामागे एकमेव कारण म्हणजे त्या स्वत:च्या संसारात मुळीच सुखी नव्हत्या. तिन्ही घरांमध्ये पती-पत्नीमधील विकोपाला गेलेले वाद, मुलांकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्यामुळे त्यांचा वाढलेला उर्मटपणा व त्यांचं परीक्षांमध्ये सतत नापास होणं यामुळे त्या तिघींचेही चेहरे सदासर्वकाळ एरंडेल तेल प्यायल्यासारखे दिसायचे! झपाट्याने मोडकळीला येत असलेल्या स्वत:च्या घरांना सावरण्याचे प्रामाणिक प्रयत्न करण्याऐवजी सतत संसाराचं रडगाणं गाण्यातच त्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा वेळ वाया घालवत होत्या.
आजचा दिवस मात्र त्यांच्यासाठी नक्कीच आगळावेगळा होता. त्या त्रिकुटाच्या चेह-यावरून आनंद नुसता ओसंडून वाहत होता. त्यांच्या दु:खाने भरलेल्या संसारात कदाचित सुख-समाधानाने प्रवेश केला असावा या कल्पनेने माझ्यातला हितचिंतक सुखावला. पण माझं ते सुखावणं खूपच क्षणभंगुर ठरलं आणि त्या तिघींना आलेल्या आनंदाच्या उधाणाचे रहस्य कळल्यानंतर मी सुन्न झालो. शेजारी राहणा-या कुटुंबातील मुलगी लग्न झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा कधीही सासरी न जाण्यासाठी परत आली होती. एका नवविवाहितेचं घरटं बांधून पूर्ण होण्याआधीच विसकटलेलं बघून त्या तिघींना अक्षरश: आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या व त्या दु:खद घटनेचा आनंद अत्यंत निर्लज्जपणे त्या तिघी मनवत होत्या. त्यांच्या हास्यविनोदाने अख्खी इमारत त्यांनी दणाणून सोडली होती आणि माहेरी आलेल्या त्या नवविवाहितेचं पुढे काय होणार या विचारात मी गढून गेलो होतो.

का वागतो आम्ही असं? स्वत:ची घरं धडाधडा पेटली असताना एखाद्या सुखासमाधानाने भरलेल्या संसाराला आग लागण्याची किंवा लावण्याची अत्यंत उत्सुकतेने आम्ही का वाट बघतो? कुणाचं घर विसकटावं यासाठी का करतो आम्ही जिवाचा एवढा आटापिटा? स्वत:च्या संसाराला लागलेली आग विझविण्याचे प्रयत्न करण्याचे सोडून इतरांच्या घरट्यातून थोडासा जरी धूर निघताना दिसला तर का होतो आम्ही आनंदाने इतके बेफाम? स्वत:च्या संसाराचा बोजवारा उडाला तरी चालेल, पण इतरांना सुखासमाधानाने जगू देऊ नका, या विषारी संस्कारांचा वारसा भावी पिढीला दिल्यानंतरच आम्ही या जगाचा निरोप घेणार आहोत का?