आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समज वाढवूया

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न न झालेलीने अनुभवेविण लिहिलंय. ‘डॉक्टर, समागमात वेदना होतात का हो?’ या प्रश्नात माझ्या लेखनाचा प्रबोधनाचा हेतू साध्य झाला तरी पुरुष डॉक्टरना स्त्रीच्या वेदनेचा अनुभव असणेच नाही. तेव्हा दुस-या प्रकारे लेखिकेइतकेच तेही अनभिज्ञ किंवा अपात्र. प्रश्नकर्ती हे किती सहज विसरली... आमच्या एका हुशार सखीची आठवण झाली. ‘लग्न न झालेली ती कसली स्त्रीरोगतज्ज्ञ असू शकते’ असे म्हणत स्त्रियाच तिच्या अभ्यास, तर्क, शिक्षण सगळ्यांवर पाणी फिरवत. लग्नानंतर तीच प्रथितयश म्हणून गाजते आहे. स्वानुभव हाच निकष असेल तर पुरुष स्त्रीरोगतज्ज्ञांवर एकसाथ बहिष्कार टाकावा लागेल. किंबहुना बहुसंख्य अनुभव, चिंतन प्रकटवण्यास वावच नसेल.

मूलबाळ नसलेल्यांचा मुलांसंबंधी काही मते मांडण्याचा अधिकारच हिरावून घेतात आया कित्येकदा. परिणाम केवळ अपमानाचे दु:ख इतकाच नसतो, मदतशील हातांना आपण दुखवलेले असतेच, त्याहूनही आई होणे हेच स्त्रीजन्माचे सार्थक असा अनाठायी विचार मूळ धरतो आणि लग्नानंतर ठरावीक वेळात त्या दिशेत प्रगती दिसली नाही की सुरू होतात हाल त्या नवपरिणीतेचे. मूल होण्यासाठी अघोरीसुद्धा उपचार नि वेदनांचे दिव्य, विविध आरोपांतून खच्चीकरण चालूच. अशाने तिचे जगण्याचे सामर्थ्य आणि पर्यायाने उपचारांना प्रतिसाद कमी होईल असे मनातही येत नाही.

इथे मला ‘अ’ आठवतो, सासरची पैशाची अतिहाव सहन न करू शकल्याने लग्नासह स्वत:ही मोडलेला. प्रौढवयात त्याने दुसरे लग्न केले. भार्या दृष्ट लागावीशी रूप-गुणसंपन्न. घरी वाळे खुळखुळल्याचे ऐकिवात नाही आले काही वर्षांत. एक दिवस त्याचा निरोप, ‘तुला आवडेल अशी बाहुली आहे आमच्या घरी, कधी येतेस?’ मी आनंदाने उडीच मारली, मग इतके दिवस पत्ता न लागू दिल्याबद्दल लटकेच रागावणे, शेवटी अधीरतेने दोन दिवसात मुंबईहून पुण्यात दाखल होणे. मैत्रीण बाहुलीसह रस्त्यावर स्वागताला. हसरी, वेगळीच तेजस्वी दिसत होती. पुनर्जन्मच झाल्यासारखी.

बाहुली सांगलीच्या अनाथाश्रमातून आली आहे हे कळले. या वयात वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्यांना सामोरे जात, आशा-निराशेच्या आंदोलनात हातातले क्षण चिंतेत घालवण्याऐवजी किती समंजस निर्णय घेतला त्यांनी! बाळासाठी नावनोंदणी केल्यानंतर ते मिळेपर्यंतच्या काळातले दत्तक-पालकांचे जन्मदात्या पालकांइतक्याच ख-याखु-या मानसिक आंदोलनांतून जाणे, होणा-या आईची येणा-या बाळाशी मानसस्तरावर घट्ट जुळलेली नाळ, पुढचे नव्वद महिने आई-बाबांचे बाळलीलांत गुंगून जाणे... हे जवळून अनुभवलेले सांगावेसे वाटले, मूल होत नाही म्हणून सवत आणणा-या बाईसाठी, ‘नऊ महिने गर्भ वाढवल्यानंतर प्रसूतीवेणांसहच मातृत्व येते,’ असे चिकटवलेल्या नात्यांतून नाही, ही मुक्ताफळे उधळणा-या आई(?)साठी...

हुशार, सुंदर, कमावत्या एकुलत्या गौरीचे तोलामोलाच्या मुलाशी लग्न झाले म्हणून सगळे आनंदात, एका आठवड्यातच ती मैत्रिणीच्या फोनवर डोक्यात कु-हाड पडल्याचे सांगून ओक्साबोक्शी रडते, मग ते घाव आई-बाबा, आप्त-मित्र सगळ्यांपर्यंत पोहोचतात. षंढ नवरा हे सत्य पदरी पडले म्हणून पवित्र करता का येते? कायद्याने स्त्रीचा विवाहसुख अधिकार मान्य करून अशा केसेसमध्ये काडी मोडून मिळण्याची व्यवस्था आहे. अशा मुलांपासून आई-बाबा, सोबत्यांपासून मित्र-मैत्रिणीही जेव्हा काडी मोडून घेतात तेव्हा अस्वस्थ व्हायला होतं. बेवडे आहेत हे, हाकलवा त्यांना असे तुच्छतेने म्हणणा-या समाजानेच तृतीयपंथींना तसे गर्तेत लोटलेले नसते का? समाजात स्वीकार, मान्यता असेल तर लपवाछपवी करावीशी वाटणार नाही, आई-बाबा दुर्दैवी नसतील, मोडणार नाहीत जमलेली लग्ने. मिळतील एकमेकांना अनुरूप जोडीदार...

समाज टिकण्यासाठी पुनरुत्पादन आणि त्यासाठी संसारसुख हे लग्नाचं प्रधान कारण असलं तरी तेच एक प्रयोजन प्रत्येक विवाहेच्छुकाचं असावं असं नाही. संतती नको, सुख हवे म्हणणारी जमात जन्म घेतेय, तिला मान्यता मिळतेय तर सहप्रवासासाठी एकत्र येण्यास प्रोत्साहन का नसावे? गे आणि लेस्बियन्सनी समाजाच्या विचित्र नजराच का झेलाव्यात? निसर्गाने तिथे काही उणीव ठेवलीय, सामान्यांपेक्षा भिन्न भावना दिल्यात. पण भरपाईही असेल ना कुठेतरी.
मॉडेल, नट, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, कवी, लेखक, चित्रकार, छायाचित्रकार, गायक, नर्तक, संपादक, संकलक, तत्त्वचिंतक, आंदोलक, समाजकारणी, राजकारणी, पत्रकार, धुरंधर, विदूषक, राजा, मंत्री, शिक्षक, उद्योजक, प्रोग्रामर, गणितज्ञ, जासूद, खेळाडू, धर्मगुरू, न्यायाधीश, खुनी आणि अगदी नोबेल पुरस्काराचे मानकरीही... यादी वाढत चाललीय... पण कसली? अहो, मी जगातल्या नामांकित गे-लेस्बियन्स-बायसेक्शुअल्सना शोधत होते इंटरनेटवर. त्यांनी आपल्या वेगळेपणाचे भय बाळगले नाही, न त्याचे भांडवल केले. वास्तवाकडे संधी म्हणून पाहिले आणि समाजावर त्यांचे ऋण झाले. समाजाकडून नाडले जाण्याचे प्रसंग टाळले.

अकाली गेलेल्या असामान्य प्रतिभेच्या आपल्या ऋतुपर्णोच्या गोष्टीपासून सुरू झालेले माझे चिंतन उफाळून आले एका सखीचे मासिक पाळी न होण्याचे दु:ख ऐकले तेव्हा. एरवी कामात, अभ्यासात उजवी असणारी ती त्या टोचणीने ठप्प होतेय हे बघून पोटात तीळ तीळ तुटले. तिच्या लग्नासाठी चिंतातुर पालकांचे चेहरे नजरेसमोर तरळले, उपचारांत किती शक्ती वाया जातेय हे दिसले. म्हटलं एक नवा विचार मांडून बघूया त्यांच्यासाठी. बाकी आरोग्य ठीक असेल तर परिस्थितीचे रडे न गाता ‘त्या’ दिवसांचा त्रास चुकलाय असे समजून कन्या अधिक उत्साहाने कामाला लागेल. शास्त्रज्ञ होईल, खेळाडू होईल... आई होईल, उत्कृष्ट सहचरी म्हणून तिचा स्वीकार असाध्य नसावा. कल्याणमस्तु!