आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरे इंडियन आयडॉल्‍सः अरुंधती जोशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘मला ‘भारतीय’ ही ओळख सांगणारी व्यक्ती हवी आहे... तिला इंग्रजी येवो, न येवो, शिक्षण घेतलेल्या विषयाचं ज्ञान थोडं-फार कमी-जास्त असो किंवा आर्थिक स्तर अगदी निम्न असो.. पण तो उत्तम माणूस असला पाहिजे.. प्रामाणिक, चुणचुणीत व्यक्तिमत्त्व आणि सतत शिकण्याची तयारी दाखवणा-या मुलाला किंवा मुलीला मी माझ्या कंपनीत नोकरी देईन.. सहज !’’
पुण्याच्या प्लाझ्मा टेक्नॉलॉजीज प्रा.लि. या कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर अरुंधती जोशी यांचे हे उद्गार... ठामपणे त्या बोलत होत्या आणि त्यांच्या प्रत्येक शब्दांतून आत्मविश्वास आणि नीतिमूल्यांबाबतचा व्यापक दृष्टिकोन प्रकर्षाने जाणवत होता. एकीकडे इंग्रजी भाषेचे आपल्या जीवनावरील वर्चस्व, उच्चभ्रू राहणीमान आणि एकंदरीतच बदललेल्या जीवनशैलीची बदललेली नीतिमूल्ये यांचे वारे सर्वत्र वाहत असतानाच दुसरीकडे अरुंधती जोशींसारख्या मध्यमवर्गीय घरातून आलेल्या व्यक्तींनी केवळ बुद्धिमत्ता व अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आजच्या घडीला जगात मिळवलेले अढळ स्थान आजच्या पिढीसमोर नवे आदर्श ठेवून जातात. अरुंधती सामान्य मध्यमवर्गीय घरातल्या. लहानपणापासून अगदी चारचौघींसारख्याच वाढल्या. त्यांचे आजोबा स्वातंत्र्यसैनिक होते. एकंदरीतच घरात साहित्य, संस्कृती, कलेचं वातावरण होतं. तसंच वातावरण अरुंधतींच्या हुजूरपागा शाळेत देखील मिळत होतं. साहित्य, संस्कृती यांच्या वातावरणात मनावरही तसेच संस्कार होत होते; पण तरीही लहानपणापासूनच अरुंधती यांना काहीतरी वेगळे करण्याची आस होती. अरुंधती सांगतात, मला अजिबात लग्न करायचं नव्हतं, मला स्वत:चं स्थान निर्माण करायचं होतं. आपण जर एवढा वारसा घेऊन या जगात आलो आहोत तर त्याचा उपयोग स्वत:च्या आणि पर्यायाने देशाच्या उन्नतीसाठी करावा, असे मला प्रकर्षाने वाटत असे. शालेय शिक्षण मराठीतून झाल्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर भाषेचा अडसर जाणवू लागला. असेही आपल्याकडे शालेय इयत्तांमध्ये दहावीपर्यंत जे इंग्लिश शिकवतात ते पुढील आयुष्यासाठी फारसे उपयोगी पडत नाही, कारण ते फारच प्राथमिक स्वरूपाचे असते. त्यामुळे इतर सर्वांप्रमाणेच मलादेखील इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. मला आठवतं, साधारण तीसेक वर्षापूर्वी आजच्या इतकी साधनं उपलब्ध नव्हती, त्यामुळे मी सरळ तर्खडकर मालेमधून इंग्रजीचा अभ्यास करायला सुरुवात केली. तसंच दररोजचा इंग्लिश पेपर वाचलाच पाहिजे, असे स्वत:ला बंधन घालून घेतले. तेव्हा काही आत्तासारखे इंग्लिशचे क्लासेस वगैरे नव्हते. त्यामुळे स्वयंअध्ययनावर सर्व मदार ठेवून मी केवळ दोन महिन्यांच्या अवधीत इंग्रजी भाषा आत्मसात केली. त्यानंतर जर्मन भाषादेखील मॅक्सम्युलरमधून शिकले. वयाच्या अठराव्या वर्षापासून मी या दोन्हीही भाषांवर प्रभुत्व मिळवले. मला आठवतं, जर्मन भाषा अवगत झाल्यानंतर मी टेक्निकल ट्रान्सलेटर म्हणून काम करू लागले. 20 पैसे प्रति शब्द असा दर मी भाषांतराकरिता आकारत असे. अनेक जर्मन मॅन्युअल्सचं भाषांतर करू लागले. पहिल्या भाषांतराची फी मला 1,750 रुपये इतकी मिळाली होती. ती पहिली कमाई हातात घेतल्यावर मला स्वकमाईच्या पैशातली धुंद जाणवली. स्वत:च्या हिमतीवरती पैसे मिळवण्यात एक वेगळाच आनंद असतो. त्यानंतर मला भाषांतराची खूप कामं मिळाली आणि त्याद्वारे भरपूर पैसेदेखील कमावता आले. त्या काळी इंग्लिशमधून जर्मनमध्ये भाषांतर करत असल्याने बर्लिनला जाण्याची संधी आली आणि करिअरला एक नवे वळण मिळाले. जर्मन शॉप फ्लोअर्सवर काम करत असताना अनेकदा तांत्रिक बाबी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन समजून घ्याव्या लागत आणि मगच त्याविषयी लिहिता येत असे. त्यामुळे शॉप फ्लोअर्सवर प्रत्यक्ष जाऊ लागल्यावर आपण मुलगी आहोत, मग आपण कसं जायचं, लोकांना काय वाटेल वगैरे विचार मनातून कधी निघून गेले हे कळलंदेखील नाही. मी आजवर स्वत:चा एक स्त्री आहे म्हणून विचार केलाच नाही. आपल्याकडे देण्यासारखं आहे, बोलण्यासारखं आहे, मला कला येतात असे असताना केवळ स्त्रीत्वाविषयी सतत विचार करत राहणे मला पटत नाही. मी व्यक्ती म्हणूनच कुठेही जाते आणि लोकदेखील मग माझ्याशी व्यक्ती म्हणून, माणूस म्हणूनच वागतात.
तुम्ही टेक्निकल ट्रान्सलेटर म्हणून कामाला सुरुवात केली तेव्हाचे दिवस कसे होते? असं विचारता अरुंधती पुन्हा एकदा त्या जुन्या आठवणींचा वेध घेऊन सांगू लागल्या, मला आठवतं, कोणत्याही कंपनीत गेलं की मला तेथील लहानातल्या लहान माणसापासून अगदी पदाधिकाºयांपर्यंत सगळ्यांशी बोलायला लागायचं. त्यांच्याशी संवाद साधतानाच मला आपोआप विज्ञानाची गोडी लागली. आणि तसंच अगदी नकळतपणे त्या त्या मशिनची जाण होत गेली. एखादं मशिन कसं चालतं हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कसं कळणार ना.. त्या मशिनचं ज्ञान मला काही पुस्तकातून नाही मिळालं. मग त्या त्या मशिन आॅपरेटरशी बोलताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि अशा प्रकारे तंत्रज्ञान, भाषा आणि एमबीए मार्केटिंग आणि फायनान्स केले असल्याने प्लाझ्मा सुरू करताना अडचण आली नाही. मी आणि माझा नवरा आम्ही दोघांनी मिळून प्लाझ्मा सुरू केली. प्लाझ्मामधील सगळी प्रॉडक्ट्स नवीन तर आहेतच; पण आम्ही आमच्या प्रॅक्टिकल ज्ञानावर आधारित प्रॉडक्ट्स बनवल्याने ती जास्त सहज सोपी बनवणे शक्य झाले.
प्लाझ्मा टेक्नॉलॉजीजमध्ये प्लाझ्मा कटिंगशी निगडित विविध उत्पादने तयार केली जातात. 1994 मध्ये प्लाझ्माला नॅशनल इन्व्हेन्शन अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर प्लाझ्मा टॉर्च या उत्पादनाचे अमेरिकेकडून पेटंटदेखील कंपनीला मिळाले आहे. कंपनीच्या या यशाबद्दल अरुंधती सांगतात, मी माझ्या कंपनीत आवर्जून ग्रामीण भागातील मुलामुलींना काम देते. आजही माझ्याकडे काम करणारे बरेचसे लोक ग्रामीण भागातून आलेले आहेत. याचं प्रमुख कारण म्हणजे, या भागातील मुला-मुलींना काही तरी वेगळं बनण्याचा प्रचंड ध्यास असतो, त्यांना ज्ञानाची ओढ असते, तेथील मुलांना कदाचित फारसं चांगलं इंग्रजी बोलता येऊ शकत नाही; परंतु त्यांच्यात पुढे जाण्याची तळमळ मला दिसते. आमच्या कंपनीतील कित्येक जण उस्मानाबाद, नांदेड, कोल्हापूर, संगमनेर इथून आलेले आहेत. इथे येऊन ते रोबोटिक शिकले, रोबोटिकची भाषा अवगत केली. ग्रामीण मुलांपर्यंत पोहोचण्याचा विचार एका घटनेने मला करण्यास भाग पाडले. मला आठवतं, मी एका फादरला भेटले होते. त्यांच्या आग्रहास्तव पुण्याहून बसने संगमनेरला गेले आणि संगमनेर पॉलिटेक्निकमधून मी प्लाझ्माचे पहिले तीन एम्प्लॉयी निवडले. ग्रामीण भागातून आजही अक्षरश: वळकटी बांधलेली मुलं बड्या शहरांमध्ये रोजगाराच्या संधींसाठी येतात. मी अशा मुलांना आवर्जून निवडते. याचं मुख्य कारण म्हणजे या मुलांजवळ संस्कृती फार छान असते. आपल्या भारतातील मध्यमवर्ग खराखुरा आपली संस्कृती जपतो. मला असं जाणवतं, जेव्हा माणसं श्रीमंत होतात तेव्हा ती पहिल्यांदा आपली संस्कृती दूर सारतात. आज शहरांमधल्या मुलांची वर्तणूक अशीच काहीशी दिसते. आत्मविश्वास आणि गर्व यातील फरक येथील मुलांना लक्षात येत नाही, त्यामुळे अशी मुलं जगाच्या स्पर्धेत मागे पडताना दिसतात.
स्वत:तल्या उणिवा दूर करत स्वत:च्या ध्येयाप्रत पोचताना टीकाही झालीच असणार ना, या प्रश्नावर अरुंधती मनमोकळं हसून उत्तरल्या, गेली 35 वर्षे मी सकाळी उठले की आरशात बघते आणि स्वत:ला सांगते, अरुंधती, यू आर द बेस्ट आणि या वाक्याचा परिणाम आपोआपच अंतर्मनावर होतो. मला वाटतं, आपण लोक काय म्हणतात याला अवास्तव महत्त्व देतो आणि स्वत:ला काय हवं आहे याकडे दुर्लक्ष करत जातो. स्वत:चं स्वत्व पहिले, पुजायला पाहिजे. आपण जे आहोत त्याचा आनंद व्यक्त करायलाच पाहिजे. टीका तर होणारच, कारण आपल्याकडे लोकशाही आणि व्यक्तिस्वातंत्र्य आहे. लोक त्यांचं टीका करण्याचं काम करतात, आपण आपलं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलंच पाहिजे, नाही का? आपली जिद्द आपल्याला पुढे नेतेच; पण लोकांना समजून घेता घेता, त्यांना अवास्तव महत्त्व देता देता जर आपल्या जिद्दीलाच आपण मुरड घालायला लागलो तर कसं चालेल... आणि याउलट देखील विचार फार महत्त्वाचा आहे, कशाला प्रत्येक माणसाने तुमची पाठ थोपटायला हवीये? कशाला हवय सगळ्यांकडून अप्रूव्हल? तुमच्या ज्ञानाने, तुमच्या कृतीने दाखवून द्या की, जग तुमचं नाव काढेल. तुमचे आई-वडील तुमच्यासाठी झटतच असतात, मग त्यांच्या श्रमाचं चीज करणे ही आपली जबाबदारीच आहे. आजकालची मुलं पटकन गिव्ह अप करतात, हे अयोग्य आहे. आपली मतं मांडा, त्यासाठी भांडा. माझ्या आयुष्याला मी जबाबदार आहे. चांगले किंवा वाईट सगळे परिणाम आपल्यामुळे आहेत, हा विचार करून आयुष्य जगलं पाहिजे. स्वतंत्र विचार करायला गट्स लागतात, याची खूणगाठ बांधा. मला आठवतं, मी अगदी लहानसहान गोष्टींसाठीही वाद घातले आहेत.. अकारण नाही; पण आपला विचार मांडण्यासाठी मी झगडायला मागे-पुढे पाहिलेलं नाही; पण अशा भांडणातून काय मिळवलं ते महत्त्वाचं आहे. व्यक्तिमत्त्व घडवा, फेमिनिटी इज सो ब्युटिफूल.
मला वाटतं, आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्राला कसं एकत्र करायचं हेच आहे. आणि तसंच जगाच्या नकाशावर भारताची प्रतिमा उजळ करणे हेदेखील आव्हानच आहे. अन्य कोणत्याही देशातील माणूस आपली ओळख करून देताना आपल्या देशाचं नाव सांगतो; मात्र भारतातलेच लोक केवळ मी महाराष्ट्रीयन किंवा मी गुजराथी किंवा अन्य कोणत्याही प्रांताचं नाव घेऊन करून देतात. ही बाब मला खटकते. जगाच्या नकाशावर टाटा, बिर्ला, अंबानी यांच्याप्रमाणेच भारताची पताका आता मला फडकवायची आहे. आणि त्यासाठी कल्पना हेच माझं भांडवल आहे.