आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना सारस्वतांच्या पंक्तीत बसवणारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळच्या नाहटा महाविद्यालयाची स्थापना 1963 मध्ये झाली आहे. तेव्हापासूनच येथे मराठी विभाग सुरू होऊन वाङ्मय मंडळ कार्यरत आहे. विद्यार्थ्यांमध्ये मराठी वाङ्मयाची ‘अभिरूची’ निर्माण होण्यासाठी गेल्या पाच दशकांपासून नानाविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.के.के.अहिरे हे सध्या या मंडळाचे काम पाहत आहेत.
भविष्यात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सारस्वतांच्या पंक्तीत सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून मंडळाचा भर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर असतो. ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत मंडळाने प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्रा.यू.म.पठाण, व.पु.काळे, जगदीश खेबुडकर, गीतकार प्रवीण दवणे, प्रा.राम शेवाळकर, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.रवींद्र ठाकूर, डॉ.व्ही.एन.पाटील, डॉ.के.एम.पाटील, डॉ.इंदिरा आठवले, प्रा.सु.का.जोशी, ‘एक होता कार्व्हर’च्या लेखिका वीणा गवाणकर, ना.धों.महानोर, शायर जहीर कुरेशी, सीमा भारंबे अशा दिग्गजांना निमंत्रित करून बौद्धिक मेजवानी दिली आहे. व्याख्यानानंतर प्रत्येक वक्त्याच्या साहित्यावरही चिकित्सकपणे विचारांचे आदान-प्रदान करण्यात आले आहे.


मंडळाने अलीकडेच जळगाव येथील ‘दीपस्तंभ’चे संचालक यजुर्वेंद्र महाजन यांचे ‘स्पर्धा परीक्षा आणि करिअरची दिशा’ या विषयावर व्याख्यान घेतले होते. हे व्याख्यान ज्या हॉलमध्ये आयोजित केले होते, तो कमी पडल्याने जवळपास 100 विद्यार्थ्यांनी हॉलच्या बाहेरच ‘खडासन’ करून व्याख्यानाचे ज्ञानकण वेचले होते, हे विशेष! अर्थात, वक्त्याची निवड करताना मंडळाचे सर्व पदाधिकारी किती चौकस असतात, हे यातून प्रातिनिधिक स्वरूपात का असेना, पण स्पष्ट होते.


विद्यार्थ्यांना लिहिते करण्याचा प्रयत्न :
विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन कलागुणांना चालना देण्याच्या उद्देशाने महाविद्यालयातर्फे ‘तरंग’ हे वार्षिक नियतकालिक प्रकाशित केले जाते. यात मराठी वाङ्मय मंडळाचा सिंहाचा वाटा असतो. महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये साहित्यरूपी वेल फुलवणा-या या नियतकालिकाने गेल्या वर्षी सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. नियतकालिकाच्या मुखपृष्ठाची निवड करण्यासाठी विद्यार्थ्यांना ज्वलंत विषय दिला जातो. त्यात ज्या विद्यार्थ्याची संकल्पना सर्वश्रेष्ठ ठरते त्याची निवड केली जाते. मंडळाच्या माध्यमातून विविध विषयांना हात घालण्यासाठी भित्तिपत्रकाचे प्रकाशन, लेखक आपल्या भेटीला, उपयोजित मराठी कार्यशाळा, काव्यलेखन अभिव्यक्ती कार्यशाळा, शिक्षकांसाठी कथालेखन कार्यशाळा, कविसंमेलन, महाविद्यालयीन आणि आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा असे उपक्रम निरंतर राबवले जात आहेत. ‘काव्येषू नाटकम् रम्यम्’ असं म्हणतात. नाटक हे दृश्य काव्य आहे. ते जितकं दर्शनीय तितकंच श्रवणीय असतं. ही विचारधारा डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांच्या अंगी दडलेल्या कलेला रंगमंचावर आणण्यासाठी नाट्यस्पर्धा, कथाकथन, एकपात्री प्रयोग स्पर्धाही या मंडळातर्फे घेतल्या जातात.


भित्तिपत्रकातून वास्तववादी विचार :
समाजाला अंतर्मुख करण्यासाठी मंडळातर्फे विद्यार्थी केंद्रीभूत उपक्रम तर राबवले जातातच; पण भित्तिपत्रकाच्या माध्यमातून रंजनवादी नव्हे तर वास्तववादी विचारांची पेरणी करून राष्‍ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न प्रा.डॉ.के.के.अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे. स्त्री भ्रूणहत्या, हुंडाबळी, नैसर्गिक आपत्ती, कुपोषण, सामाजिक समरसता, अशा वेगवेगळ्या विषयांवर दरवर्षी भित्तिपत्रक स्पर्धा घेतली जाते. त्यातून प्रभावशालीपणे समाजहितैषी संदेश देणा-या स्पर्धकाला ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येते.


तसेच दरवर्षी मराठी दिनाच्या निमित्ताने वाङ्मय मंडळातर्फे दर्जेदार साहित्यावर चर्चाही घडविली जाते. वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून लिहिण्याचे बळ मिळालेले तत्कालीन माजी विद्यार्थी प्रा.गणेश सूर्यवंशी, प्रा. प्रताप पवार, प्रा.डॉ.रेखा गाजरे, प्रा.डॉ.आशालता महाजन, प्राचार्या डॉ.मीनाक्षी वायकोळे, प्रा.संदीप जंगले, दिलीप सुरवाडे ही सर्व मंडळी विविध विषयांवर लेखन करीत आहेत. साहित्य क्षेत्राशी निगडित असलेल्या विविध कार्यक्रमांत त्यांना सारस्वतांच्या पंक्तीत बसण्याचे भाग्य लाभले आहे.