आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॉस्टेल लाइफ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बिननवऱ्याचं सासर!
— तुकाराम बा. पिठोरे (साहिल), जालना

एखाद्या मुलाने लग्न करणे नवीन नाही. पण त्याने नवरा केला तर… आणि तो चक्क सासरी नांदायला गेला तर? थोडं अवघडल्यासारखं वाटतंय ना! होय, असंच काहीसं झालंय. पण थोडं वेगळ्या पद्धतीनं मी सासरी नांदायला गेलो, नवरा केला नाही; फक्त लग्न केलं, तेही आव्हानासोबत. खरं तर एका खेड्यातून शिक्षणासाठी शहरामध्ये प्रवेश कसा झाला कळलंच नाही. कुटुंबासारखं हॉस्टेल मिळालं; पण तिथं मनसोक्त वावरता येत नव्हतं, तर नांदावं लागत होतं.
एखाद्या नववधूसारखं. वॉर्डन नावाची सासू सतत कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करायची तर सीनियर नावाच्या नणंदा-जावा होत्याच की सतत छळायला. असो. पण नंतर त्यांनी आमच्यावर भरभरून प्रेमही केलं. हॉस्टेलमध्येच शिकायला मिळालं, कधी कराव्या लागणाऱ्या तडजोडी; तर कधी अनपेक्षितपणे समोर येणाऱ्या समस्या आणि त्यावर शोधलेली उत्तरं! अगदी कठीण वाटणाऱ्या गोष्टी सहज पार पाडलेले क्षण! छोट्या-छोट्या चुकांसाठी निमूटपणे सहन
केलेले वॉर्डनचे बोल! अॅडजस्टमेंट नावाच्या शब्दाशी जुळवलेलं नातं आणि फुकट मिळालेले शहाणपणाचे धडे! रोजचं मेसचं जेवणच पुरणपोळी झालं होतं, आवडीनं खायचं अन् मस्त राहायचं. पण शिकायचं असेल तर हॉस्टेलसारखं बिननवऱ्याचं सासर असायलाच हवं.

वेळेचं नियोजन
— नीता कलंजी, अमरावती

हॉस्टेलचं जीवन त्रासदायक नाहीच. कारण त्या त्रासातूनही आपण शिकतोच. पंचवीस वर्षांपूर्वीची माझी हॉस्टेलची कहाणी. सर्व मनासारखे करायला मिळते, कोणाचीच रोकठोक नाही, यात मुलींना फक्त संयम महत्त्वाचा. वेगवेगळ्या ठिकाणाहून मुली येतात. त्यांची भाषा, त्यांचे राहणीमान यांचा अभ्यास छान होतो. आम्ही तेलुगू, गुजराती अशा भाषा शिकलो. सर्व स्वभावांच्या लोकांशी कसं जुळवून घ्यायचं, हे पण छान शिकलो. वेळेचं नियोजन कसं करावं, ते
आईवडील नसताना आपण अचूक शिकतो. कारण, आपल्यालाच आपलं सर्व करायचं असतं. सकाळी उठून बाथरूममध्ये नंबर लावायचा तर रात्रीच आपला टॉवेल बाथरूममध्ये ठेवायचा, कारण सकाळी मग नंबर लावायचं काम नाही. पण त्यातही खूप मज्जा यायची. सकाळी उठून आपला चहा करायचा, मग डबा खाल्ला की कॉलेजला. कॉलेजहून आले की मग सर्वांनी आपले दिवसभराचे अनुभव सांगायचे, एखाद्याचा चिवडा काढून खायचा आणि त्यावर चहाचा आनंद काही औरच. ते दिवस कधीच येणार नाहीत.
मनावर ताबा हवा
— मेघा कुलकर्णी रत्नपारखी, नाशिक

शिक्षणासाठी, नोकरीच्या निमित्ताने शहरात जावं लागणाऱ्यांना हॉस्टेलमध्येच राहावं लागतं. पर्यायाने एकत्र राहण्याची, शेअरिंगची सवय करून घ्यावी लागते. मुख्य म्हणजे, वेळा पाहून सर्व प्रातर्विधी आटोपून घ्यावे लागतात. प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेण्याची, समायोजनाची चांगली सवय अंगी बाणते. हॉस्टेल जीवनशैलीत खऱ्या अर्थाने जीवन संपन्न बनते व भावी आयुष्यात या गोष्टी खूप फायदेशीर ठरतात. एकमेकांना मदत करणे, धमाल मस्ती, सुखदु:खात सहभागी होणे या सर्व गोष्टींमुळे आपण समृद्ध होतो. परंतु काही तरुण या मोकळेपणाचा गैरफायदा घेऊन स्वैराचार करतात, व्यसनाधीन होतात. त्यामुळे मित्रपरिवाराची संगत चांगली असणे गरजेचे असते. मुख्य म्हणजे आपण हॉस्टेलवर शिकण्यासाठी आलो आहोत, आपल्या पालकांनी खूप अपेक्षा ठेवून हॉस्टेलवर पाठवले अाहे, ही जाणीव ठेवून तरुणांनी आपल्या मनावर ताबा ठेवून वेळाचे व संधीचे चीज केले पाहिजे. दिल दोस्ती दुनियादारीबरोबरच आपले कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे.
आईची आठवण
— संध्या अगरवाल,अकोला

माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर मी पुढील शिक्षणासाठी नागपूरला हॉस्टेलला राहायला गेले. पहिल्यांदा मनात भीतीच होती. तशी मी लाजाळू होते. कमी बोलायचे. तिथे गेल्यावर नवीन मैत्रिणी (वेगवेगळ्या राज्यांतल्या) मिळाल्या. मन लागत नव्हतं. सारखी आईची आठवण यायची. महिन्या-दोन महिन्यांत थोडी मैत्री झाली. आमचं मेस टाइमिंग सकाळी नऊ ते दुपारी एक होतं. मेसमध्ये मावशी होत्या. त्या भांडी, झाडू, पोछा करायच्या. आचारी त्यांच्यासाठी ताट
वाढून ठेवायचा. मावशी सर्व कामे आटोपल्यावर जेवायला बसायच्या. एकदा फील्डवर्क करून येताना मला थोडा उशीरच झाला. मला खूप भूक लागली होती. मी मेसमध्ये ताट घेऊन गेले. तिथे कोणीच नव्हतं. मावशी टेबल साफ करीत होत्या. मी थोडा वेळ तिथेच बसले. पोटात कावळे ओरडत होते. मी नंतर जायला निघाले, तेवढ्यात मावशींनी माझ्या चेहऱ्याकडे पाहिले. कदाचित त्यांनाही जाणवले असेल, मला खूप भूक लागली आहे ते. त्यांनी लगेच त्यांच्यासाठी वाढलेले ताट माझ्यासमोर ठेवले आणि म्हणाल्या, ‘खाना खा लो।’ मला क्षणभर असं वाटलं, माझी आईच आपल्याला जेवायला म्हणत आहे. मी लगेच आपल्या ताटात थोडं वाढून घेतलं आणि जेवायला सुरुवात केली. मावशी समाधानी चेहऱ्याने माझ्याकडे पाहात होत्या. तो अनुभव खरंच खूप प्रेमाचा होता.
भूतबंगला
— गंगा मुंडे, गेवराई

सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या वेळी डीएडला खूप महत्त्व होते. लहानपणापासून जिल्हा परिषद शिक्षक होण्याचे ध्येय असल्यामुळे ज्या ठिकाणी नंबर लागेल त्या ठिकाणी डीएड करण्याचे ठरविले. आणि माझे स्वप्न पूर्ण झाले. माझा नंबर चंद्रपूर येथील एका महिला काॅलेजला लागला. अॅडमिशन झाल्यावर आम्हाला एक खासगी हाॅस्टेल मिळाले, जे काॅलेजपासून पाच मिनिटांच्या अंतरावर होते. कॉलेज आणि हाॅस्टेल मात्र शहरापासून दहा किमी दूर जंगलात होते.
आमच्याच प्रवेशाने हॉस्टेलचा श्रीगणेशा झाला होता. आम्ही प्रत्येकी पाच पाच मुली चार रूममध्ये राहू लागलो. हॉस्टेल म्हटल्यावर काही टेन्शन नाही, अशा द्धतीने आम्ही राहू लागलो. मात्र या ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव यायला लागले. कधी रूममध्ये घुंगरांचा आवाज, तर कधी बंद खोलीतून मोठ्याने हसण्याचा आवाज व टेरेसवरून उडी मारतानाची किंकाळी असे चित्रविचित्र अनुभव येत होते. आम्ही जीव मुठीत धरून राहात होतो. नंतर आम्हाला या आवाजांची भीती वाटेनाशी झाली व तब्बल दोन वर्षे तेथे राहिलो. ते ‘भुता’च्या सहवासातील दिवस आमच्यासाठी अविस्मरणीय राहिले.
आयुष्याचा पिक्चर
— ज्योती साबळे शिंदे
आईवडील, बहीण-भावंडांच्या उबदार कुशीतून बाहेर टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे हॉस्टेल. हाॅस्टेलच्या पहिल्या दिवशी नवीन रूममेटसोबत वाटणारं अवघडलेपण ते हॉस्टेलच्या शेवटच्या दिवशी कासावीस झालेला जीव व नकळत ओल्या झालेल्या डोळ्यांच्या कडा... सगळं हाॅस्टेल या एका शब्दात येतं.
रात्री १२ वाजता केलेलं बर्थडे सेलिब्रेशन, मैत्रिणींची थट्टा, रूम साफ कोण करेल यावरून होणारी भांडणं, मैत्रिणींची गुपितं ऐकून होईल सगळं व्यवस्थित असा धीर देणं, मैत्रिणीने घरून आणलेल्या डब्यावर ताव मारणे असे खूप सारे अनुभव स्मितहास्य देऊन जातात. गैरसमजातून झालेले वादविवाद, मेसचे नआवडणारे जेवण, असाइनमेन्ट्स पूर्ण करण्यासाठी झालेली तगमग, या सगळ्या आणि अनेक गोष्टी दुनियादारी शिकवतात, हे नक्की. परंतु हॉस्टेलच्या चांगल्या आठवणींपुढे या छोट्या छोट्या गोष्टी विसरायला होतात. हाॅस्टेलचा पहिला दिवस व शेवटचा दिवस जणू आयुष्याचा पिक्चरच वाटतो. जीवनात हा हॉस्टेलरूपी अनुभवांचा अथांग सागर अवश्य अनुभवायला हवा.
संयमाचे धडे
— राखी राजपूत,औरंगाबाद

या वेळचा मधुरिमा कट्ट्याचा विषय वाचून मज्जा वाटली. माझं हॉस्टेलमधलं आयुष्य आत्ताच काही दिवसांपूर्वी सुरू झालंय. खरं तर सहसा सगळे बारावीनंतर बाहेर पडतात, पण मी शिक्षणासाठी बाहेर पडण्याचा निर्णय पदवीनंतर घेतला. (थोडा उशिराच) पदव्युत्तर शिक्षण पत्रकारितेचे घेण्याची इच्छा होती. गावात अर्थातच हे शिक्षण नाही; म्हणजे बाहेर राहावे लागणार, हे गृहीतच धरले होते. मराठवाडा विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि नवीन आयुष्य सुरू झाले! सुरुवात जेवणाचा डब्बा कुठे लावायचा, इथून होती. खूप शोधल्यावर एक घरगुती मेस सापडली आणि घरच्यासारखं जेवण मिळाल्यावर जिवात जीव आला! एका रूममध्ये सहा मुलींसोबत राहावं लागणार, या विचारानेच थोडी भीती वाटली होती. पण पहिल्याच दिवशी सर्वांनी आनंदाने रूममध्ये स्वागत केले, तेव्हा ही भीतीही पळाली. असे म्हणतात की, हाॅस्टेल लाइफमध्ये खूप अनुभव येतात. त्याचं एक कारण म्हणजे या आयुष्यात आपल्याला संयम
ठेवण्याचे धडे मिळतात. अंघोळीपासून केस विंचरण्यापर्यंत छोट्या छोट्या गोष्टींसाठी रांगेत उभं राहावं लागतं, तेव्हा आपला नंबर येईपर्यंत खूप संयम ठेवावा लागतो. अंघोळीला गार पाण्याची सवय नसते, कपडे धुण्याची सवय नसते, घरी कधीही भूक लागली की मम्मीकडे फर्माईश करता येते. हाॅस्टेलला अशा वेळी जे मिळेल ते खावे लागते. यात सगळ्यात चांगले काही असेल तर जिवाभावाच्या मैत्रिणी, आजारी पडल्यावर रात्रभर आपल्यासाठी जागणाऱ्या, घरी गेल्यावर
आपल्या आवडीचा खाऊ आणणाऱ्या. असे अनेक बरेवाईट अनुभव मला येत आहेत आणि पुढेही येतच राहतील.
जबाबदारीचं भान
— डॉ. अस्मिता निंबाळकर, औरंगाबाद

शिक्षण आणि नोकरी या दोन्हींच्या निमित्तानं मी जवळपास सात-आठ वर्षे घरापासून दूर हॉस्टेलला राहिले. या वर्षांत मी चार-पाच हॉस्टेलला राहिले. बरेच चांगले-वाईट अनुभव या निमित्तानं घेता आले. हॉस्टेलला राहणे ही काही मौजेची गोष्ट नाही. यामध्ये अपरिहार्यता असते. घरापासून दूर राहणे कुठल्या पिलांना आवडते. हॉस्टेलवर राहणारी मुलगी म्हणजे स्वच्छंदी, बेजबाबदार, घरचे कुठलेही काम न येणारी असते, असा समज असतो. मात्र मला असे वाटते की, घरापासून दूर राहात असल्यामुळे या मुलींना घराबद्दल, कुटुंबाबद्दल अधिक जिव्हाळा, प्रेम वाटत असते. त्यांना घराची, नात्यांची किंमत समजते. हॉस्टेल फक्त डोक्यावर छत आणि खायला अन्न देत नाही तर उघड्या जगात जबाबदारीनं वागून स्वत:ची प्रगती कशी करायची, याचं ज्ञान देते.