आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विज्ञान शिक्षण: फुलापासून सामूदर्शक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत रसायनशास्त्रातील प्रयोग करताना एखादा द्रव आम्ल की अल्क हे पाहण्यासाठी लिटमस कागदाची पट्टी वापरतात. लिटमस परीक्षा शैवालापासून काढलेल्या रंगद्रव्यात ओला केलेल्या कागदी पट्टीचा वापर आम्ल की अल्क हे शोधून काढण्यासाठीच्या सामूदर्शकाचे नाव आहे. द्रव आम्लधर्मी असल्यास लिटमस कागद तांबडा व अल्कधर्मी असल्यास निळ्या रंगाचा होतो. काही रासायनिक क्रियेमध्ये द्रवाचा सामू बदलल्यास रासायनिक क्रिया कमी वेगाने घडते किंवा अपेक्षित पदार्थ तयार होत नाही. आज आपण फुलांचे रंग वापरून सामूदर्शक बनवणार आहोत.


साहित्य : शिरका (पांढरे व्हिनेगार) (आईकडे मिळाल्यास उत्तम), व्हिनेगार स्वयंपाकात अनेक पदार्थामध्ये आंबट चव येण्यास वापरतात. व्हिनेगार मिळाले नाही तर स्वच्छ गाळून घेतलेला लिंबाचा रस, खाण्याचा सोडा एक / दोन चमचे. पाणी, दोन प्लॅस्टिक कप, विविध रंगाची फुले उदा. जास्वंद, गारवेल, पिवळा झेंडू, केशरी झेंडू, डॅफोडिल, गुलाब वगैरे.


प्लॅस्टिक कपामध्ये अर्धा-अर्धा कप पाणी घाला, एका कपातील पाण्यात व्हिनेगार किंवा लिंबाचा रस व दुस-या कपामध्ये एक चमचा खाण्याचा सोडा घाला. ज्या कपामध्ये व्हिनेगार/ लिंबाचा रस घातला आहे त्यावर आम्ल असे लेबल चिकटवा व दुस-या खाण्याच्या सोड्याच्या द्रावणावर अल्क असे लेबल लावा.


फुले काचेच्या खलबत्त्यात घालून त्याची पेस्ट करा. कागदी नॅपकिनमधून पाणी घातलेली पेस्ट गाळून घ्या. तुम्हाला जेवढ्या रंगाची पेस्ट करता येईल तेवढ्या रंगाचे द्रावण वेगवेगेळ्या कपामध्ये ओता. त्यामध्ये पेपर नॅपकिन बुडवून कागद कोरडा करा. उदा. जास्वंदीची फुलापासून लाल रंग, पिवळ्या जास्वंदीपासून पिवळा, गारवेलाच्या फुलापासून निळा वगैरे. या झाल्या तुमच्याकडील सामूनिर्देशक पट्ट्या. एवढे सर्व करायचा कंटाळा आला असेल तर फक्त फुलांच्या पाकळ्या वापरा. आम्ल असे लिहिलेल्या कपामध्ये तांबड्या जास्वंदीच्या पाकळ्या घालून पहा. निळ्या गारवेलीच्या पाकळ्या आम्लामध्ये आणि अल्क द्रावणामध्ये बुडवून पहा. ज्या फुलामध्ये सामूनिर्देशक रसायन आहे ते आम्लामध्ये किंवा अल्कलीमध्ये रंग बदलते. बहुतेक तांबड्या पाकळ्या आम्लामध्ये अधिक तांबडी होतात व अल्कलीमध्ये निळ्या रंगाची होतात. अधिक तीव्र अल्कलीमध्ये किंवा आम्लामध्ये फुलांचा रंग कसा बदलतो हे पाहण्यासाठी फुलांच्या पाकळ्या शाळेतील प्रयोगशाळेत घेऊन जा. शिक्षकांच्या मदतीने हा प्रयोग तेथे करून पहा. तीव्र आम्ल किंवा अल्क द्रावण हाताळताना शिक्षकांची मदत घ्या.


एक मजेशीर माहिती : मसाल्याच्या डब्यातील एक चतुर्थांश चमचा हळदीचे द्रावण बनवा. त्यात साबणाचे पाणी घातले म्हणजे हळदीचा पिवळा रंग जाऊन तो तांबडा होतो. साबण अल्कधर्मी आहे. अल्कलीमध्ये हळद तांबडी होते. या गुणधर्माचा उपयोग हळदीपासून कुंकू बनवण्यासाठी होतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये केम या गावात हळदीपासून कुंकू बनवण्याचा उद्योग चालतो.