आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्तमात्र - \'प्लेबॉय\' (ज्येष्ठ चित्रकार-अभ्यासक सुभाष अवचट, रसिक)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकेकाळी जगभरातल्या तरुणाचं गुपित असलेल्या मात्र, जनसामान्यांमध्ये बदनाम झालेल्या ‘प्लेबॉय’ मासिकाची छापील आवृत्ती मार्च महिन्यापासून पुन्हा एकदा प्रकाशित होत आहे. या मासिकाच्या मुखपृष्ठावर एलिझाबेथ एलम या हॉलीवूड नटीचं छायाचित्र झळकलंय आणि अंकाची टॅगलाइन आहे- Naked is Normal... एरवी, बव्हंशी समाजसमूह नग्नतेकडे विकृत नजरेनं पाहात असताना समाजशास्त्र अभ्यासक-मानसशास्त्रतज्ज्ञांपासून कलावंत-लेखकांपर्यंतच्या अनेकांना नग्नतेशी निगडित संकल्पना नेहमीच आव्हान देत आली आहे. पण, याकडे भारताच्या संदर्भात ज्येष्ठ चित्रकार-अभ्यासक सुभाष अवचट कसे पाहतात?
 
हॉलीवूडची एकेकाळची रूपगर्विता मर्लिन मन्रो हिच्या मुखपृष्ठ छायाचित्राने प्रारंभ झालेल्या जगप्रसिद्ध ‘प्लेबॉय’ मासिकाची छापील आवृत्ती दोन वर्षांच्या खंडानंतर मार्च महिन्यापासून पुन्हा सुरू झालीय. १९५३मध्ये ह्यू हेफनरने ‘इफ यू आर मॅन बिटविन एज ऑफ एटिन आणि एटी, प्लेबॉय इज मिन्ट फॉर यू’ असं तमाम पुरुष जातीला चेतवत, पण जराशी शंका घेत मासिक छापायला सुरुवात केली. पहिल्या अंकावर त्याने तारीखच टाकली नाही. पुन्हा अंक काढण्याची वेळ आलीच नाही तर काय घ्या, हा त्यामागचा सावध विचार. पण त्यानंतर ‘प्लेबॉय’ने जगभरातल्या वाचकांना चटक लावली. पण इंटरनेटच्या वेगवान प्रसाराने मासिकाचं सगळ्याच बाबतीतलं वेगळेपण आणि वैशिष्ट्य संपवून टाकलं. म्हणूनच कदाचित २०१५मध्ये छापील आवृत्ती बंद करण्याचा निर्णय झाला. पण हेफनरच्या कंपनीत पुन्हा घुसळण झाली, आणि मार्च २०१७पासून ‘प्लेबॉय’ पुन्हा छापील स्वरूपात बाजारात आणण्याचा निर्णय झाला. हा म्हटला तर सारा बाजारकेंद्री मामला. त्यालाच अनुसरून अत्यंत चाणाक्षपणे मार्च महिन्यातल्या अंकाच्या मुखपृष्ठावर नग्नता हा सहजभाव आहे, अशा आशयाचं ठसठशीत विधान आहे.  
 

आज ‘प्लेबॉय’ मासिक सांगतं, आणि आपण हे पहिल्यांदाच पुढे आलेलं वैश्विक सत्य असल्यासारखं दिपून जातो. पण नग्नता ही साधारणपणे तीन हजार वर्षांपूर्वीच्या भारतीय जीवनाचा खरोखरच सहजभाव होती. तत्त्वज्ञान, कला खूप पुढारलेल्या होत्या. नग्नतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बुरसटलेला नव्हता. नग्नतेत आपण सौंदर्य, पावित्र्य आणि चिरतत्त्व शोधत होतो.
 
याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, आपल्याकडे लोककला होती, शिल्पकला होती. वात्स्यायन होता, विदूषकही होता. विविधरंगी सण होते. निसर्ग-नदी-ओढे, फळाफुलांनी लगडलेली झाडं आणि त्या झाडांच्या फांद्यांना बांधलेले झोके होते. कृष्णलीला, गोपी आणि त्यांच्या झुळझुळीत तलम कपड्यांतल्या क्रीडा होत्या. या सगळ्यांत नग्नता जगण्याचा एक भाग म्हणून येत होती.कला कुठलीही असो, त्या-त्या काळाचं प्रतिबिंब त्या कलांमध्ये उमटतं, असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा इतिहासकालीन शिल्प आणि भित्तिचित्रांत झळकणाऱ्या निखळ नग्नतेकडे माझा कटाक्ष असतो. आपल्याकडच्या देवळांभोवती बहरलेल्या कला या लोककलेचा अविभाज्य घटक होत्या. म्हणजे काय होतं तर, देवळाभोवती सगळे एकत्र येत. तुझा देव-माझा देव, किंवा हा श्रेष्ठ हा कनिष्ठ, असा भेद न करता नृत्य, नाटक, तत्त्वज्ञान, मूर्तिकला असं सगळं तिथे सामूहिकपणे सादर करत. म्हणजे, कलाविष्कार हा तेव्हा सामूहिक समर्पणाचा आविष्कार होता. 
 
सगळ्यांच्या अशा प्रकारे एकत्र येण्यात लोकशिक्षण होतं. त्यामुळे तुम्ही जर काळजीपूर्वक तपासलं तर लक्षात येईल की, कोणत्याही चित्रावर, शिल्पावर अमुक एका कलाकाराचं कधी नाव नसायचं. तो शिरस्ताच नव्हता. त्यामुळे त्यामुळे अठराव्या शतकातली हिमाचल प्रदेशची कांगरा-बसौली शैलीतील चित्रं-ओरिसातली नारळाच्या झाडाच्या पानांवर चितारलेली श्रृंगारिक चित्रं-खजुराहो किंवा कोणार्क मंदिरावरची नग्न शिल्पं कुणा एका कलावंताच्या नावाने ओळखली गेली किंवा अजिंठ्याची लेणी आणि त्यावरची भित्तिचित्रं कुणा एकाच्या नावावर नोंदली गेली, असं कधी झालं नाही.
 
खजुराहोची शिल्पं आज अश्लील म्हणून बदनाम केली गेली आहेत. पोर्नोग्राफिक नजरेने ती पाहिली आणि पसरवली जात आहेत. मात्र ही शिल्पं त्या काळी लग्न जुळलेल्या मुला-मुलींसाठी लैंगिक शिक्षणाचा एक प्रभावी मार्ग होती. या शिल्पांमागे गहन विचार होता. जीवनविषयक तत्त्वज्ञान होतं. म्हणजे, मंदिरावरची ही शिल्प, मंदिराच्या आतली रचना, गाभाऱ्यातली नीरव शांतता येणाऱ्या प्रत्येकाला प्रेम, वासना, आदर, समाधी, मृत्यू या अवस्थांचं भान देत होती. ही शिल्पकला आणि यातल्या प्रत्येक मूर्तीचा आकृतीबंध हे सारं उच्च दर्जाचं होतं. अशीच उच्च दर्जाची कला मला इजिप्तमधल्या भिंतींवर कोरलेल्या मूर्तींमध्ये दिसली होती. तिथे एका भिंतीवर तर दंतशल्यचिकित्सेचे संपूर्ण ज्ञान कोरलेले होते. खजुराहो काय, किंवा इजिप्तमधली शिल्पं काय, ही एक प्रकारे अमूल्य असा ज्ञानसाठा असलेली पुस्तकंच होती, त्याकाळची. ती वाचून समाज ज्ञानसंपन्न होत होता. त्यात श्लील-अश्लील, स्वीकार्ह-निषिद्ध हा वादच नव्हता.
 
ज्यांना आपण गणिका, देवदासी, वेश्या वा मिस्ट्रेस म्हणतो, त्यांच्याकडेसुद्धा समाज कधी विकृत नजरेने पाहात नव्हता. किंबहुना, आपल्याकडच्या कित्येक गणिका या ज्ञानी होत्या. समाजाला ज्ञान वाटत होत्या. त्यामुळे नर्तकी असेल, देवदासी असेल वा एखादी आदिवासी स्त्री असेल; त्यांच्याकडे बघण्याचा आपल्या समाजाचा दृष्टिकोन सौंदर्यवादी असे. त्यांच्याकडे कुणी लैंगिक वस्तू म्हणून पाहात नसे. आश्चर्य म्हणजे, संस्कारांचा व्हिक्टोरिअन पगडा असला तरीही तिकडे युरोपातही बायरन आणि शेलीसारखे अठरा-एकोणिसाव्या शतकातले प्रतिभावंत कवी स्वत: लिहिलेल्या कवितांचं वाचन करण्यासाठी उच्च प्रतीचं कलाभान असलेल्या या गणिकांकडे जात होते.
 
पण, ब्रिटिश-पोर्तुगीजांच्या भारतातल्या आगमनानंतर ही प्रगल्भता हळूहळू लोप पावत गेली. नग्नतेकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन कलुषित होत गेला. इंग्रज भारतात येण्याआधी आपल्याकडे स्टुडिओ नावाचा प्रकारच नव्हता. सगळं कसं चावडीवरचं होतं. जे काही व्यक्त व्हायचं ते सार्वजनिकपणे व्हायचं, समूहासाठी व्यक्त व्हायचं. पण इंग्रजांनी चित्रकला-शिल्पकला दिवाणखान्यात आणल्या. तोवर आपल्याकडे कॅनव्हास नावाचा प्रकार नव्हता, तो या इंग्रजांनी आणला. तैलरंग आणले. स्टुडिओत मॉडेल आणून न्यूड रंगवले जाऊ लागले. राजा-महाराजांची चित्रं रंगवली जाऊ लागली. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, हे फक्त भारताच्या संदर्भातच घडले. तिकडे जपान आणि चीनने स्वत:ची चित्र-शिल्पकला जपलीच; पण भारतात येऊन आपल्या चित्र-शिल्पकलेचंही या चिनी-जपानींनी निगुतीनं जतन केलं. त्यामुळे मला असं नेहमी वाटत आलंय, की आपल्याकडच्या लोककलांची उत्क्रांती झाली असती, तर आपल्या चित्र-शिल्पकलेने अमूर्ततेची उंची गाठली असती. 

त्याचा सकारात्मक प्रभाव समाजावर पडला असता. उलट पाश्चात्त्य कलाशैली आपल्याला जमत नाही, याचा आपण न्यूनगंड पाळला. पाश्चात्त्यांनी जिथे त्यांचा पारंपरिक फॉर्म टाकला, आपण तो भारतात आणला. मॉडर्न आर्ट त्यामुळे दूरच राहिली. पुढे ५० सालानंतर प्रोग्रेसिव्ह ग्रुपने पिकासो इथे आणला. पण तोवर बराच उशीर झाला होता. समाज चित्र-शिल्पकलेपासून खूप दुरावला होता. त्याचंच प्रतिबिंब त्याच्या आकलनातही उमटत होतं. आज सिनेमा असेल, नाटक असेल, वा एखादं छायाचित्रं असेल; आशय-विषयाचा एक भाग म्हणून त्यात नग्नता येते आणि त्यावर आक्रमकपणे हल्लाबोल होतो, तेव्हा हा संदर्भ खूप महत्त्वाचा ठरतो.
 
मी दर वर्षी या ना त्या निमित्ताने पॅरिसला जात असतो. एकदा बोचऱ्या थंडीत घराबाहेर चित्र रंगवत बसलो होतो. तेवढ्यात बुटांचा आवाज कानी आला. समोरून एक बाई येत होती आणि तिच्या बुटांचाच तो आवाज होता. पण तिनं मला चित्र रंगवताना पाहिलं, तसे पायातले बूट हातात घेतले आणि तशीच अनवाणी माझ्या समोरून निघून गेली. कारण, आपण चित्रकाराची तंद्री मोडत आहोत, याचं तिच्या ठायी पुरेपूर भान होतं. आता ज्या समाजात असं भानच नाही, तो समाज नग्नतेकडे तरी कसा निखळपणे पाहणार, हाही प्रश्नच. 
 
न्यूडिटी किंवा नग्नतेकडे बघण्याचा दृष्टिकोन विकसित न होण्याचा फटका आज नक्कीच कलावंतांना बसतोय, पण ६०-७० वर्षांपूर्वी हीच स्थिती होती. राजा रविवर्मा, अमृता शेरगिल आदींना आणि नंतरच्या काळात हुसेनसारख्या प्रतिभाश्रेष्ठांना टप्प्याटप्प्याने संस्कृतीरक्षक समाजाने लक्ष्य केलं होतं. अमृता शेरगिलने तर स्वत:चंच न्यूड चितारलं होतं. त्यावर केवढा गहजब माजला होता. पण ती खमकी होती. त्रिवेंद्रमच्या राणीचा भाऊ असलेल्या राजा रविवर्माने गिरगावात स्टुडिओ सुरू केला होता. त्या स्टुडिओत त्याने एका देवदासीला बोलावून तिच्या रूपावर आधारित रामायणातली सीता चितारली होती. त्याला अभिजनांनी तीव्र आक्षेप घेतला होता. एक देवदासी स्त्री सीता कशी काय होऊ शकते? असा या अभिजनांचा सवाल होता. त्यामुळे प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं. ब्रिटिश जज होता. तोही म्हणाला, यात न्यूडिटी कुठेय? पण अभिजनांचे वकील अडून बसले, शेवटी रविवर्माने कोर्टातच चित्र रेखाटलं आणि एकेक रेषा पुसत गेला. शेवटची रेष त्याने पुसली आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला, ‘कुठेय न्यूडिटी?’ सारे अवाक झाले. असाच प्रसंग तिकडे इटलीमध्ये अॅमादिओ मोदिग्लिआनी नावाच्या चित्रकारावर गुदरला होता. त्याने एक न्यूड चितारलं. प्रकरण कोर्टात गेलं; मात्र कोर्टाने ते प्रकरण सरळ धुडकावून लावलं.
 
एकूणच नग्नतेच्या संदर्भात एक कलावंत म्हणून मी जेव्हा विचार करतो, तेव्हा मला जाणवतं, चित्र असो वा शिल्प, आपली दृष्टी पूर्णांशाने कधी विकसितच झाली नाही. न्यूडिटी ही तर खूप पुढची गोष्ट झाली. नग्न मानवी देहाकृती ही केवळ लैंगिक भावना चाळवणारी गोष्ट नसते. चित्रकाराच्या नजरेत तो निसर्गाचा एक फॉर्म असतो, आकृतीबंध असतो. तसा तो असायला हवा. जसा दगडाला एक फॉर्म असतो, झाडांना एक फॉर्म असतो, तसा मनुष्यप्राण्याला एक स्वत:चा फॉर्म असतो. तो निसर्गापेक्षा वेगळा नसतो, हे आपल्याला कधी कुणी समजावून सांगितलंच नाही. कारण, शालेय अभ्यासक्रमात आपल्याकडे कला ही नेहमीच ऑप्शनचा विषय राहिली. ज्याला ‘फादर ऑफ आर्ट’ म्हटलं जातं, तो पॉल सेझान नावाचा फ्रेंच चित्रकार जसे झाड, जसे पर्वत तसाच माणूसही चितारायचा. एरवी, तुम्ही निसर्ग त्याच्या आकृतीबंधानुसार रेखाटता आणि माणूस रंगवताना त्याला विनाकारण कृत्रिम आकार द्यायला जाता, त्यामुळे तो माणूस चित्रावर चिकटवलेला भासतो. पण सेझानची चित्रं त्याला अपवाद असायची. त्याच्या ‘बेदर्स’ नावाच्या चित्राने तर दुनिया पालटवली. आकृतीबंधात्मक विचार करण्याची प्रेरणा त्याने जगाला दिली. न्यूडिटीकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला.

मला आठवतंय, माझ्या लहानपणी आमच्या ओतूर या गावी, बायाबापड्या नित्यनेमाने नदीत निर्वस्त्र अंघोळ करीत, पण कुणीही त्यांच्याकडे विकृत नजरेनं बघत नसे. एकीकडे बाया नदीत असायच्या, दुसरीकडे पुरुषमंडळी कामाच्या घाईत शेताकडे निघालेली असायची. पण आता ज्या विकृत नजरेनं नग्नतेकडे पाहिलं जातं, ती विकृती शहरांतून गावाकडे गेली आहे. आपण चांगलं-वाईट, दर्जेदार-दर्जाहीन असा भेद न करता सरसकट निखळ नग्नतेवर हल्लाबोल करू लागलोय. आम्हाला कलेचं शिक्षण घेताना अभ्यासक्रमाचा भाग म्हणून स्टुडिओत बसून न्यूड रंगवण्याची परवानगी आहे, मात्र बाहेर आल्यावर त्यावर बंदी आहे. हा सगळा दुटप्पीपणा शिगोशीग आपल्यात भरलेला असल्याने आपल्याला ‘प्लेबॉय’चं आकर्षण वाटत आलंय आणि मासिकावरच्या कॅचलाइनचं विनाकारण कौतुकही.
 
'प्लेबॉय' कालचा आणि आजचा...
उत्तान, उच्छृंखल, उथळ या तीन विशेषणांनी ह्यू हेफनरच्या जगप्रसिद्ध ‘प्लेबॉय' मासिकाचं वर्णन केलं जातं. अलीकडच्या काळातल्या भारतीय मानसिकतेच्या संदर्भात हे वर्णन जुळणारं असलं तरीही स्त्रियांची नग्न छायाचित्रं, एवढीच ‘प्लेबॉय'ची ओळख नव्हती. तत्त्वज्ञ बर्ट्राण्ड रसेल - मार्टिन ल्युथर किंग- मार्शल मॅक्लुआनपासून फिडेल कॅस्ट्रोपर्यंत, आणि व्लादिमीर नाबोकॉव, फ्रँक सिनात्रा-बॉब डिलनपासून मार्लन ब्रॅण्डोपर्यंतच्या तमाम वलयांकित व्यक्तींच्या समग्र मुलाखती आणि मार्गारेट अॅटवूड आणि हाराकी मुराकामींच्या कथांसाठीसुद्धा वाचक "प्लेबॉय'कडे वळत होता. मधल्या काळात इंटरनेटच्या अतीव प्रभावामुळे ‘प्लेबॉय'चं सगळ्याच बाजूंचं वेगळेपण गळून पडलं. हेफनरने २०१५मध्ये छापील अंकाचं प्रकाशन थांबवून इंटरनेट एडिशन तेवढी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला, पण या निर्णयाला दोन वर्षे उलटली नाही तोच हेफनरच्या सीईओ पदावर कार्यरत असलेल्या मुलाने मार्च-२०१७पासून पुन्हा छापील अंक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय...    
 
बेपर्वा समाजाची उथळ  कलासंस्कृती
आपल्याकडे जसं संगीत रुजलं, नाटक रुजलं, नृत्य रुजलं, तशी चित्र आणि शिल्पकला रुजली नाही. शिक्षणात हे दोन विषय नेहमीच ऑप्शनला टाकले गेले. युरोपीय समाजात लहान मुलाला मॉर्डन आर्ट कळते. बाजारहाट करायला गेलेली बाई घरी येताना पोस्टकार्ड साइजचं का होईना, पण मोदिग्लिआनीचं चित्र घरी घेऊनच येतं. कारण, त्यांची बखर ही लेखनाबरोबरच चित्रांतही मांडली गेली. तो संस्कार पिढ्यान‌्पिढ्या रुजत गेला. आपल्याकडे कितीतरी वाडे होते, ज्यात अप्रतिम भित्तिचित्रं होती, शिल्पं होती, पण वाड्याच्या मालकांनीच ती नष्ट केली. पुरातन मूर्ती छिन्नी-हातोड्याने तोडून विकल्या गेल्या. मुरुड-जंजिरासारख्या इतिहासकालीन किल्ल्यातल्या संगमरवरी जाळ्या घरातल्या बाथरुममध्ये बसवल्या गेल्या. गेल्या ५०-१०० वर्षांत जे काही नष्ट करायचं ते आपण केलं, पण जे काही उरलंय ते जपणं आवश्यक आहे.कला जाणिवा विकसित होण्यात जी घसरण झाली, तीच आपल्या मुळांवर येत गेली, याचं भान जागवणं आवश्यक आहे...
 
subhash.awchat@gmail.com
बातम्या आणखी आहेत...