आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमी शतावरीची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तुम्ही चीझी ग्रीटंस विथ स्प्रिंग व्हेज किंवा सॉल्टिज अस्पारायगस विथ फ्राईड एग्ज इन ऑलिव्ह ऑईल... अशी एखादी ऑर्डर दिलीत तर तुमच्या पुढ्यात येणाऱ्या डीशमधील अस्पारायगस अर्थात, शतावरी नाशिक जिल्ह्यातील शिंगवे गावातील रामदास रायते यांच्या शेतातील असू शकते! हमखास आणि नियमित उत्पन्नाची हमी देणारी शतावरीची शेती करणारे रामदास रायते सांगताहेत, त्यांची ही यशोगाथा... 

नाशिकपासून अवघं तीसेक किलोमीटर अंतरावरचं माझं गाव. तसं माझं शिक्षण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमधलं. पण घरची शेती आणि वडलांचा एकुलता एक मुलगा यामुळे शिक्षणानंतर नोकरीएवजी घरची शेती सांभाळणे, हाच ओघवता पर्याय. वडील पारंपरिक पद्धतीने द्राक्ष, ऊस, गहू ही पीकं करीत होते. मी त्याला सुरुवात केली, पण त्यात वेगळं काहीतरी करण्याकडे सुरुवातीपासूनचा ओढा होता. उसाचे पैसे कारखान्याकडे वर्षवर्ष अडकत होते. द्राक्षाचे पैसे मिळत होते, पण त्यात नियमितता नव्हती. तीनेक एकरावर कांदा होता, पण त्याचा भाव नेहमी बिनभरोशाचा. 

वडिलांनी १९९५मध्ये काढलेलं तीन लाखांचं कर्ज २००५ साल उगवलं तरी फिटत नव्हतं. २००३ला मी डिप्लोमा पूर्ण करून शेतीत उतरलो होतो. पहिल्या दोन वर्षांत दोन धडे शिकलो- पहिला धडा गिरवला तो म्हणजे, कर्जाशिवायची शेती शोधण्याचा. दुसरा धडा गिरवला तो कमी नफा, कमी धोका पण नियमित उत्पन्न, असं काहीतरी पीक घेण्याचा. भोवतालचे सर्व शेतकरी तोपर्यंत आधुनिक शेतीच्या नावाखाली मोठ्या नफ्याच्या मोहापायी कर्जाच्या डोंगराखाली गाडले जात होते, मोठे धोके पत्करत होते. मात्र आपल्याला कमी नफा मिळाला तरी चालेल, पण कर्ज आणि तोटा होता कामा नये, या दृष्टीने मी पिकाचा शोध सुरू केला. तेव्हा पहिली माहिती मिळाली, ती रेशमाच्या शेतीची.   
 
रेशमाची शेती सुरू केली खरी; पण त्याचे पेमेंटही नियमित येत नव्हते. सरकारी कारभार होता. खूप थकबाकी व्हायची. त्यामुळे नियमित उत्पन्न देणाऱ्या पिकाचा माझा शोध सुरूच राहिला. त्याच दरम्यान कधीतरी आमच्या मेव्हण्यांकडून शतावरीबाबत कळले. त्यांनी शतावरीची लागवड केली होती. त्यांच्याकडून माहिती घेतली आणि शेतात शतावरी लावायची, असा निर्णय मी घेतला. 
 
यथावकाश मुंबईच्या व्यापाऱ्यांशी मेव्हण्यांच्या माध्यमातून परिचय करून घेतला. त्या व्यापाऱ्यांनी बियाणे दिले आणि मेव्हण्यांनी लागवडीची पद्धत सांगितली. सुरुवातीला नर्सरीतून रोपं करून आणली. कांद्याचं रान मोकळं केलं होतं. त्यात ठिबक होतं, चरी केल्या होत्या. त्यातच दोन महिन्यांच्या रोपांची लागवड केली. शेणखत घातलं. चार महिन्यांनी त्याला तुरे उगवू लागले. तुऱ्यांनी डवललेल्या कांड्या हेच शतावरीचं पीक. आता दर दिवसाआड त्याची तोडणी करतो आणि मुंबईला त्याच व्यापाऱ्याकडे पाठवतो. साधारण वीस किलोचा एक बॉक्स. ट्रान्सपोर्टवाला एका बॉक्सचे पन्नास रुपये घेतो. पण शंभर रुपये किलोच्या भावाने सरासरी वीस किलो भरली, तरी दोन हजार रुपये मिळतात. पंधरा दिवसांचे पंधरा-वीस हजार रुपये. त्यातील दहा हजारांची गुंतवणूक, मेहनत, वेळ, पाणी, वीज वजा केली तरी दर महिन्याला साधारण वीस हजारांचे उत्पन्न हक्काने मिळते. माझ्याकडून दर दिवसाआड माल जाईल आणि व्यापाऱ्याकडून दर पंधरा दिवसांनी पेमेंट येईल, हा आमच्यातील करार गेली पाच वर्षं दोन्ही बाजूंनी नियमितपणे सुरू आहे. 
 
शिवाय एकदा लागवड केल्यावर नंतर दोन वर्षं उत्पन्न मिळत राहते. त्यामुळे तोही दिलासा. हा फायदा लक्षात घेऊन, मी दुसऱ्या दीड एकरावरही आता शतावरी लावली आहे. व्यापाऱ्याचा माल पाठवल्यावर उरलेल्या कांड्यांचा सर्वोत्तम पशुखाद्य म्हणून आमच्याच गाईंना उपयोग होतो. तोही दुसरा फायदा. 

अस्परायगस म्हणून मुंबईत हॉटेलमध्ये याची मोठी मागणी आहे. हाडांची बळकटी, क जीवनसत्त्वाची उपलब्धता, मध्यम फॅट आणि लो कोलेस्टेरॉल यामुळे आरोग्यदायी डिश म्हणून याला मोठी पसंती आहे. विशेष म्हणजे, यासाठी मला वेगळी बाजारपेठ किंवा बाजारभावाची चिंता नाही. दर एक दिवसाआड एक किलो तुरे खुडून, व्यवस्थित पॅकिंग करून मुंबईस पाठविणे, हाच काय तो व्याप. पण त्यातून नियमित पगारासारखे उत्पन्न मिळते, हा सर्वात मोठा लाभ. यासाठी मी एका पैशाचे कर्ज घेतले नाही. रेशमाच्या भांडवलातून पहिला प्लॉट केला, आणि पहिल्या प्लॉटमधील नफ्यातून दुसरा. 
 
माझा गेल्या पाच वर्षांचा अनुभव हेच सांगतो, पारंपरिक मळलेली वाट बदलली, की यश नक्कीच मिळते. त्यातही मार्केटच्या गरजेनुसार लागवड आणि विक्रीची हमी ही या यशाची सूत्रे ठरली आहेत. अन्य शेतकरी बांधवांसाठी माझा हाच सल्ला आहे. एकाच पिकाच्या मागे लागून, मोठ्या नफ्याच्या मोहात पडून कर्जाच्या आणि धोक्याच्या जाळ्यात अडकू नका. कमी नफा पण हक्काचे उत्पन्न या सूत्राची कास धरा. यश हमखास आहे. 

मुंबईच्या व्यापाऱ्यांकडून ब्रोकोलीलाही मोठी मागणी आहे. मी पंधरा गुंठ्यावर ब्रोकोलीची लागवड केली. त्यालाही ३० रुपये किलोचा भाव मिळाला. या नवीन भाज्यांना मुंबईच्या मार्केटमध्ये भाव आहे, पण त्या क्विंटलमध्ये पिकवून उपयोगाच्या नाहीत. शतावरी दररोज फक्त वीस किलोच जाते. ब्रोकोलीची मागणी तीस किलोचीच आहे. त्यामुळे काम थोडे किचकट आणि चिकाटीचे आहे.

» परदेशी बाजारपेठांनी शिरकाव केल्यामुळे अस्परायगस, ब्रोकोली, लेट्यूससारख्या शेती उत्पादनांची देशातली मागणी वाढतेय. ही वाढती मागणी पूर्ण करण्याची संधी स्थानिक शेतकऱ्यांना हमखास चालून आलीय...
 
शब्दांकन: दीप्ती राऊत
diptiraut@gmail.com

रामदास रायते संपर्क: ९९२१३३१७७९
बातम्या आणखी आहेत...