आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही बदलांची नांदी...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींना फार तर क्रिकेट कळू शकतं; पण फुटबॉल, टेनिससारखे खेळ त्यांच्या डोक्यावरून जातात... ही हेटाळणी करण्याचे दिवस सरलेत. क्रीडा पत्रकारितेत आता मुलींची संख्या वाढू लागलीय. दुर्दैवाची गोष्ट, म्हणजे महिलांच्या खेळांकडे आणि महिला पत्रकारांच्या खेळावरील लिखाणाकडे पुरुषी मानसिकतेतून पाहणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे.
‘तुला खरंच क्रिकेट आवडतं?’ ‘तू फुटबॉल पाहतेस?’ मी क्रीडा पत्रकार आहे, हे समजल्यावर अनेकांची पहिली प्रतिक्रिया काहीशी अशीच असते. आधी आधी असे प्रश्न खूप बेचैन करायचे. मला फुटबॉल का आवडू नये, असा प्रतिप्रश्न मी विचारायचे. आता नेमकं उत्तर सापडलंय. ‘जितकं एका क्रीडा पत्रकाराला समजायला हवं, तितकं मला नक्कीच समजतं,’ असं उत्तर दिल्यावर समोरचा गप्प होतो. पण अर्थातच माझी बेचैनी संपत नाही. आश्चर्य म्हणजे, माझ्या बहुतेक सर्व पुरुष सहकाऱ्यांना असा प्रश्न कधीच विचारला जात नाही. क्रिकेटच्या बाबतीत तर नाहीच नाही. खेळाचं मैदान पुरुषांचंच आहे आणि खेळावर बोलण्याचा अधिकार पुरुषांनाच आहे, असा समज हे त्यामागचं सर्वात मोठं कारण असावं. फक्त मराठी माध्यमांमध्ये किंवा भारतात ही परिस्थिती आहे असंही नाही. अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांतही क्रीडा पत्रकारांमध्ये जेमतेम दहा टक्के महिला आहेत, असं विमेन्स मीडिया सेंटर या वेबसाइटनं समोर आणलं होतं. मुळात पत्रकारितेत स्त्रियांचा टक्का आजही कमी आहे. त्यातही खूप कमी महिला आवड म्हणून क्रीडा पत्रकारितेकडे वळतात. बहुतेकींसाठी क्रीडा पत्रकारिता हा सेकंड चॉइस असतो. टीव्हीवर अनेक महिला स्पोर्ट शोज किंवा लाइव्ह सामन्यांमध्ये अँकर, प्रेझेंटर अशा भूमिकेत दिसतात. पण बहुतेकदा त्यांचं अस्तित्व स्पोर्ट््स शो ग्लॅमरस बनवण्यापुरतं आणि ब्रेक वगैरेची घोषणा करण्यापुरतं असतं. त्यातही एखाद्या मंदिरा बेदीनं खेळ समजून घेण्यासाठी मेहनत घेतली, तरी तिच्या अज्ञानाचीच नेहमी टर उडवली जाते. किंवा मयांती लँगरसारख्या एखादीनं केलेल्या अचूक विश्लेषणापेक्षा तिच्या ड्रेसिंग सेन्स आणि सौंदर्याची चर्चा जास्त रंगते. इतकंच काय, डायना एडलजी, अंजुम चोप्रा आणि ईशा गुहासारख्या क्रिकेटर्सची अगदी समर्पक कॉमेंट्री पचवणंही कित्येकांना सुरुवातीला जड गेल्याचं मी पाहिलं आहे.
मग क्रीडा पत्रकारितेतील महिलांची काय कथा? स्पोर्ट इज अ ग्रेट लेव्हलर, म्हणून खेळांचा उल्लेख केला जातो. पण खेळाला वर्णद्वेष, वंशवादाच्या जोखडातून बाहेर पडण्यासाठी बराच वेळ लागला. तर मैदानावर महिलांना मिळणारी वागणूक अजूनही चिंताजनक आहे. पुरुष आणि महिलांच्या खेळांत मूलतः फरक असणं स्वाभाविक आहे. शारीरिक ताकद आणि वेगाचा विचार करता काही खेळांमध्ये पुरुष अॅथलीट्स जास्त लोकप्रिय असणंही स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाची गोष्ट, म्हणजे महिलांच्या खेळांकडे आणि महिला पत्रकारांच्या खेळावरील लिखाणाकडे पुरुषी मानसिकतेतून पाहणाऱ्यांची संख्या आजही मोठी आहे. टेनिसमध्ये, जिथे अनेकदा महिला खेळाडू पुरुषांपेक्षा लोकप्रिय असतात, अशा खेळांतही महिलांचा संघर्ष संपलेला नाही.
विम्बल्डनमध्ये महिलांना समान प्राइझ मनी मिळवण्यासाठी २००७ साल उजाडावं लागलं. तरीही जाइल्स सिमॉनसारखे खेळाडू समान वेतनावरून कुरबूर करतात आणि मारिया शारापोव्हाला त्यावर ‘त्याच्यापेक्षा माझे सामने पाहणाऱ्यांची संख्या नक्कीच जास्त आहे,’ असं उत्तर द्यावं लागतं.

समाधानाची गोष्ट म्हणजे आता महिलांमध्ये खेळांची आवड आणि क्रीडा पत्रकारितेतला रस वाढतो आहे. सानिया मिर्झा, सायना नेहवालसारख्या खेळाडूंच्या यशामुळेही परिस्थिती बरीच बदलली आहे. आजकाल पत्रकार परिषदेत केवळ एक-दोन महिला पत्रकार असण्याचे दिवस कमी झाले आहेत. क्रिकेट टीमच्या दौऱ्याचं वार्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. अगदी हार्डकोर क्रिकेटिंग लिखाण करण्यातही महिला मागे नाहीत, असं शारदा उग्रासारख्यांचे लेख वाचल्यावर जाणवतं. केवळ लिखाणच नाही, तर टीव्ही-रेडिअोवर अँकरिंग, स्पोर्ट फोटोग्राफी, स्पोर्ट शोची निर्मिती अशा क्षेत्रांतही महिलांचा सहभाग वाढतो आहे. खरं तर एखादी महिला पत्रकार खेळाचं विश्लेषण जास्त सोप्या पद्धतीनं करू शकते, असं मला वाटतं. एक तर ती तांत्रिक गोष्टींमध्ये जास्त अडकून पडत नाही. ती स्वतः एखादा खेळ खेळली असेल, तर त्याविषयी मत मांडण्याची तिची पद्धत पुरुषांपेक्षा वेगळी असते. तिला खेळाची कुठलीच पार्श्वभूमी नसेल, तर ती सर्वसामान्यांना, खेळाचं ज्ञान नसलेल्यांना पडणारे प्रश्नही अगदी बिनधास्तपणे विचारते. खेळाची बातमी देताना त्याची भावनिक आणि सामाजिक पार्श्वभूमी अधिक ताकदीनं मांडू शकते. खास करून महिला खेळाडूंविषयी जास्त आपुलकीनं लिहू-बोलू शकते. त्यासाठी पुरुष सहकारी, खास करून बॉसेसनीही आपला दृष्टिकोन बदलायला हवा आणि महिला क्रीडा पत्रकारांच्या क्षमतेवर जास्त विश्वास ठेवायला हवा. त्या बाबतीत मी स्वतःला खरंच भाग्यवान समजते.

गेल्या दशकभरात मराठी माध्यमांमध्येही मोठा बदल झाला आहे. या क्षेत्रात येऊ इच्छणाऱ्या मुली भेटतात, तेव्हा खरंच मनापासून खूप बरं वाटतं. खेळाच्या मैदानात आणि क्रीडा पत्रकारितेत महिलांचा सहभाग वाढला, तर एरवीही समाजात स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदतच होईल.

mail.janhavee@gmail.com
बातम्या आणखी आहेत...