आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डबल धमाका (यशोगाथा)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेटसारख्या सांघिक खेळात चमकणाऱ्यांचा आपण प्रमाणाबाहेर उदोउदो करतो, पण वैयक्तिक पातळीवरच्या खेळ‌ात जागतिक स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरीला श्रेय देण्याची आपली तितकीशी तयारी नसते. सानिया आणि सायना या दोन महिला क्रीडापटूंनी जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावून जणू लक्ष वेधण्यास भाग पाडले आहे...

गेल्या महिन्यात सायना नेहवाल आणि सानिया मिर्झा या भारतीय क्रीडापटूंनी जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावल्याची सुखद घटना घडली. ही अभूतपूर्व कामगिरी आहे. परंतु त्यांच्या या यशामागे कोणते घटक आहेत? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे, सूत्रबद्ध प्रशिक्षण. सायनाच्या करिअरचे दोन टप्पे आहेत, गेल्या वर्षभराचा कालावधी व त्या आधीचा कालावधी. गोपीचंद सायनाचे प्रशिक्षक असताना, तिने ऑलिम्पिकमध्ये आणि कॉमनवेल्थमध्ये पदके जिंकली, जागतिक क्रमवारीत तिसरा क्रमांक पटकावला. हैदराबाद येथील गोपीचंद यांची अकॅडमी ही भारतातील एक महत्त्वाची व्यावसायिक प्रशिक्षण संस्था आहे. येथे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण, शारीरिक प्रशिक्षण, फिजिओथेरपिस्ट, आहारतज्ज्ञ इ. सुविधा एकाच छताखाली खेळाडूंना उपलब्ध होतात. या अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन जागतिक स्तरावर चमकलेले खेळाडू गोपीचंद यांच्या योगदानाची साक्ष देतात. मात्र, गेल्या वर्षी सायनाने विमल कुमार आणि प्रकाश पडुकोन यांची मदत घेतली. ती यशाची भुकेली आहे आणि त्यासाठी ती स्वत:ला कायम उद्युक्त करत असते. आपली प्रगती खुंटली आहे आणि उत्तुंग कामगिरी करण्यासाठी काहीतरी अधिक केले पाहिजे, असे तिला वाटले. तेव्हा तिने त्यासाठी आवश्यक ती मेहनत घेण्याची तयारी दाखवली. स्वत:चा अॅटिट्यूट बदलला. जेव्हा तुम्ही जगात दहाव्या क्रमांकावर असता, तेव्हा बरंच काही करण्यासारखं असतं, बरंच काही शिकण्यासारखं असतं आणि सायना या बाबतीत अजिबात मागे राहिली नाही वा विजयाच्या उन्मादात मश्गुल राहिली नाही. त्यानंतर तिने बऱ्याच स्पर्धा जिंकल्या आणि साहजिकच ती जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली.

दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे, शारीरिक तंदुरुस्ती. टेनिस आणि बॅडमिंटन हे दोन्ही वैयक्तिक पातळीवर शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारा खेळ आहेत. शारीरिक तंदुरुस्ती आधी महत्त्वाची आणि नंतर तंत्र. या खेळांसाठी लागणारी शारीरिक क्षमता भारतीयांना नैसर्गिकरीत्या लाभलेली नाही. बॅडमिंटनसाठी वेग, चपळता आणि सहनशक्तीची गरज असते. चीन, इंडोनेशिया या देशांनी या खेळावर वर्चस्व राखले आहे. सायनाने या खेळामध्ये पदार्पण करून जगज्जेते मानले गेलेल्या चीनच्या खेळाडूंमध्ये प्रतिस्पर्धी खेळाडू म्हणून एक प्रकारची धास्ती निर्माण केली. टेनिसमध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी शक्ती, चपळता आणि सहनशक्तीची गरज असते. शारीरिक क्षमतेच्या अभावामुळे आशियाई खेळाडूंना वरच्या स्थानापर्यंत पोहोचणे अवघड जाते. सायना आणि सानिया दोघीही शारीरिकदृष्ट्या सक्षम आहेत आणि त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीसाठी खूप मेहनत घेतली आहे. त्या खूप पुढे गेल्या आहेत.

उदाहरणच घ्यायचे झाले तर, जेव्हा तुम्ही जागतिक दर्जाचे खेळाडू असता, तेव्हा तुम्हाला चांगला प्रतिस्पर्धी मिळत नाही. म्हणून बॅडमिंटनमध्ये ‘एक विरुद्ध दोन’ असा सराव असतो, ज्यामध्ये एका बाजूला एक खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला दोन प्रतिस्पर्धी खेळाडू असतात. त्यामुळे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी खूप कमी वेळ मिळतो, एकाच वेळी दोन प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी खूप चपळाईने, एकाग्रतेने खेळावे लागते. सायनासाठी हे पुरेसे नव्हते. त्यामुळे तिने सरावासाठी वेगळी पद्धती निवडली. तिने ‘एक विरुद्ध तीन’ या पद्धतीने सराव केला. ज्यामध्ये शटल समोरच्या बाजूला खाली न पडता वेगाने आपल्याच दिशेने येत राहते. अतिशय दमछाक करणारा हा सराव सायनाच्या सहनशक्तीला आव्हान देणारा ठरला, आणि तिची कामगिरी सुधारण्यास त्याची मदत झाली.

सानिया मिर्झा प्रसिद्धीच्या झोतात आहे आणि दोघींमध्ये तिची कामगिरी जास्त उज्ज्वल आहे. पण या वलयामागे तिची कठोर मेहनत, एकाग्रता आहे, ज्यामुळे तिने या खेळावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ती एकेरीमध्ये खूप चांगली कामगिरी करत होती, पण मनगटातील दुखापतीने तिला वारंवार अपयश येत होते. त्यामुळे तिचे एकेरीतील करिअर संपुष्टात आले. मात्र, तिने दुहेरी खेळावर लक्ष केंद्रित केले आणि २५ पदके पटकावली.

यशस्वी होण्यासाठी सुरुवातीला हुशारीची गरज असते. पण अव्वल स्थान मिळवायचे असेल तर कठोर परिश्रम आणि सरावावर लक्ष केंद्रित करणे अतिशय आवश्यक असते. कुस्तीपटू सुशील कुमारचे उदाहरण घेऊ या. दोन आॅलिम्पिक पदके पटकावल्यानंतरही तो एकही दिवस सराव चुकवत नाही, हे बऱ्याच जणांना माहीत नसेल. कोणत्याही कार्यक्रमाला जाऊन आल्यानंतर प्रवासाचा शीण असतानाही, तो सरावासाठी थेट स्टेडियमकडे वळतो. कदाचित दोनदा ऑलिम्पिक पदक जिंकण्याचे हेच रहस्य असेल. अगदी आताही तो बराचसा वेळ आखाड्यामध्येच घालवतो. स्वत:ला प्रशिक्षण देत कुस्तीतील नव्या नव्या क्लृप्ती आत्मसात करत असतो. सायना आणि सानियाही सरावासाठी तासन् तास वेळ देतात आणि उज्ज्वल कामगिरीसाठी कठोर परिश्रम घेतात. त्यामुळे कोणत्याही खेळात यशस्वी होण्यासाठी हुशारी आणि कठोर परिश्रम यांचा मेळ असणे अनिवार्य आहे.

खेळामध्ये वेळोवेळी केले जाणारे लक्षणीय रचनात्मक बदल हे खेळाडूंच्या वैयक्तिक यशासाठी कारणीभूत ठरतात. खेळाडूंना निधी आणि योग्य वेळी वैयक्तिक पाठिंब्याची गरज असते. स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून सरकार खेळाडूंच्या प्रशिक्षणावर जरी खूप पैसा खर्च करत होते, तरी सरकारच्या या प्रयत्नांमध्ये काही त्रुटी जाणवत होत्या. त्यासाठी सरकारकडून अधिक प्रयत्न होण्याची व त्यास जोड मिळण्याची आवश्यकता होती. अशा वेळी २००८मध्ये प्रकाश पडुकोन आणि गीत सेठी यांनी एकत्र येऊन ऑलिम्पिक गोल्ड क्वेस्टची (ओजीक्यू) स्थापना करत खेळाडूंना पाठिंबा दिला. लंडन ऑलिम्पिकमधील सहा पदकविजेत्या खेळाडूंपैकी विजय कुमार, गगन नारंग, सायना नेहवाल आणि मेरी कोम यांना पडुकोन-सेठी यांच्या संस्थेने मदत केली होती. बऱ्याच लोकांना हे माहीत नाही की, ओजीक्यूने बंगलोरमध्ये सायनासाठी खास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. तिच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी घेतली होती. क्रीडाशास्त्रज्ञ डॉ. निखिल लाटे यांची सायनाला शारीरिक तंदुरुस्ती आणि दुखापत टाळण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी खास नियुक्ती करण्यात आली होती. डॉ. लाटे यांनी लंडन ऑलिम्पिकपूर्वी मेरी कोम हिच्यावर व्यापक पातळीवर परिश्रम घेतले होते आणि तिला सहकार्य करणाऱ्यांपैकी ते एक होते.

भारतीय खेळाडूंनी वेगवेगळ्या खेळांमध्ये जागतिक पातळीवर खरंच अतुलनीय कामगिरी केली आहे. नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडूंनी चार ऑलिम्पिक पदके पटकावली आहेत. नेमबाजी हा अतिशय तांत्रिक आणि बौद्धिक खेळ आहे. मी बऱ्याच आघाडीच्या नेमबाजांसोबत काम केले आहे. ऑलिम्पिक पदक विजेते अभिनव बिंद्रा, कर्नल राज्यवर्धन राठोड, गगन नारंग, विजय कुमार यांचे कठोर परिश्रम मी जवळून पाहिले आहेत. गगन नारंगसारखा एखादा खेळाडू नेमबाजीमधील तांत्रिक पैलू व्यवस्थित आत्मसात करू शकला आहे, मग ते रायफलचे तंत्र असो वा रायफलवरील पकड मजबूत करण्याचे कौशल्य असो; स्वत:ला हवे तसे रिझल्ट मिळावेत अशा तऱ्हेने त्याने रायफलवर प्रभुत्व मिळवले आहे. रायफलचा जणू तो कुशल तंत्रज्ञ बनला आहे. जागतिक पातळीवर विक्रम प्रस्थापित करू पाहणारे नव्या दमाचे खेळाडूही मी पाहिले आहेत. भारतीय सैन्यदलातील जितू राय गेल्या वर्षी प्रथम क्रमांकावर होता, अपूर्वी चंदेलाने वर्ल्ड कपमध्ये कांस्य पदक पटकावले आणि ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली. असे कितीतरी प्रतिभावान नेमबाज जागतिक पटलावर चमकण्यासाठी संधीच्या प्रतीक्षेत आहेत.

आयझॅक न्यूटन एकदा म्हणाला होता, मी ज्या तीव्रतेनं, झपाटून जात एखाद्या गोष्टीचा विचार करतो, तसा इतरांनी केला तर त्यांनासुद्धा मला जे साध्य झालं, ते साध्य होईल. विविध खेळांमधील स्टार्सच्या पावलावर पाऊल ठेवून चालू पाहणाऱ्या तरुणांनी हे लक्षात ठेवायला हवे की, या कीर्तीच्या वलयामागे कठोर मेहनत, शिस्त आहे. ती त्यांची जणू जीवनशैली आहे.

agashevaibhav@gmail.com
(लेखक भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय रायफल असोसिएशनशी संबंधित व्यावसायिक प्रशिक्षक आहेत.)
बातम्या आणखी आहेत...