आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Success Story Of Two Friend\'s Who Helps Womens By Mrudula

स्पंदन - मदत मागणारी की करणारी ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संघर्ष हा वर्षानुवर्षं स्त्रीच्या आयुष्याचा अिवभाज्य भाग होऊन बसलाय. मात्र, अशाही परिस्थितीत स्वत:ला सावरून इतर स्त्रियांना संघर्ष करायला बळ देणा-या दोन मैत्रिणींची ही गोष्ट.

तीन दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचा आज दुसरा दिवस होता. सकाळीच तयार होऊन मी पाच मिनिटे हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये विसावले होते. तेवढ्यात एक कार सुळकन येऊन थांबली. ड्राइव्ह करणारी ‘ती’ होती. तिचं इतक्या सफाईदारपणे ड्राइव्ह करत येणं मला सुखद धक्का देऊन गेलं. गोड हसत मला विश करून ती प्रशिक्षण स्थळाकडे निघून गेली. ती म्हणजे अंजू. अॅडव्होकेट अंजू! प्रशिक्षण सुरू झालं. त्या दिवशी मी एकेक स्क्रिप्ट देऊन काही प्रशिक्षणार्थींना समुपदेशनाचे रोल प्ले करायला सांगितले होते. अशाच एका रोल प्लेमध्ये पीडित स्त्रीची भूमिका करणारी, दिसायला लहानखुरी, पण दोन मुलांची आई असणारी ‘ती’ होती. आपल्या मुलांना सांभाळायला कोणी नाही म्हणून त्यांना आपल्यासोबतच प्रशिक्षणाला घेऊन आली होती. आपण तिला मंजू म्हणूया! रोल प्ले झाल्यानंतर तिला त्या वेळी काय वाटलं ते शेअर करायला तिला सांगितलं आणि ती बोलायला लागली. बोलता बोलता आम्हाला जाणवलं की, ती स्क्रिप्टसंबंधी नाही, तर स्वतबद्दलच बोलायला लागली होती. ‘अगर ऐसी कौन्सिलर मुझे मेरे शादी के २-३ साल में ही मिल जाती तो आज मेरी जिंदगी के इतने साल बरबाद न होते. मुझे ये जले हुए हाथ-पैर लेकर ऐसे जीना ना पडता,’ ती सांगत होती. जले हुए हाथ- पैर? मी चमकले. पूर्ण बाह्यांच्या कपड्यातून काहीच समजत नव्हतं! नंतरच्या सत्रांमध्ये हे काेडं उलगडलं. अंजू आणि मंजू म्हणजे, दोन समदु:खी स्त्रिया एकत्र येतात तेव्हा त्या एकमेकींना किती बळ पुरवू शकतात त्याचं उत्तम उदाहरण होतं!

अंजू एका उच्चकुलीन, श्रीमंत कुटुंबातील मुलगी. तिची मासिक पाळी सुरू झाली आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. अचानक अनेक बंधनं तिच्यावर लादण्यात आली. तिने शाळेत जायचं नाही, मोठ्याने हसा-बोलायचं नाही, घरात सर्वत्र, विशेषत: जिथे पुरुषांचा वावर असेल तिथे जायचं नाही, हवं तेव्हा हवं तेवढं खायचं नाही, अनेक बंधनं! अंजूचा जीव गुदमरत होता, पण बोलायची सोयच नव्हती. त्यातच १५व्या वर्षी तिचं लग्न लावून देण्यात आलं. एका पिंजऱ्यातून ती दुसऱ्या सोनेरी पिंजऱ्यात गेली. आता इथे तिला हातभार घुंघट काढावा लागत होता. या घुंघटाआडून कोणाशी कसं बोलावं हेच तिला समजेना, त्यामुळे ती जणू मुकीच झाली. आणि तिने बोलावं अशी घरात कोणाची अपेक्षाही नव्हती. कालांतराने तिला दोन मुली झाल्या आणि तिच्या नवऱ्याचं लक्ष दुसरीकडे वळलं. आता तर तिला तो अजिबातच विचारेनासा झाला. अंजू आला दिवस कसाबसा रेटत होती; पण एक दिवस नवरा अंजू आणि मुलांना वाऱ्यावर सोडून राजरोस घरातून निघून दुसरीकडे गेला. अंजू हादरली. अशा परिस्थितीत काय करायचं हे माहीत नसल्यामुळे कित्येक महिने रडत, पिचत, उपाशी राहत काढले; पण मग मुलींचा विचार करून तिने रडे आवरले आणि त्यातल्या त्यात मदत करणाऱ्या भावाच्या सहकार्याने शिक्षण सुरू केलं. चक्क पदवी मिळवली आणि याच दरम्यान ती एका संस्थेच्या संपर्कात आली. त्यांच्या मार्गदर्शनाने तिने कायद्याचे शिक्षण पूर्ण केले आणि मिळवती झाली. याच जोरावर तिने नवऱ्याकडून राहते घर तिच्या नावावर करून घेतले, मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी पैसा द्यायला लावला आणि त्यांना उत्तम प्रकारे घडवायला सुरुवात केली. स्वतः उरलेला वेळ त्या संस्थेसाठी देऊ लागली आणि कालांतराने स्वत:च्या गावात स्वत:ची एक संस्था सुरू केली. घराबाहेर पडायला घाबरणारी अंजू आणि दुचाकी, चारचाकी सराईतपणे चालवणारी आणि कोर्टात भांडणारी ही अंजू या जणू दोन भिन्न व्यक्ती होत्या!

अशाच एका संस्थेच्या सभेत तिच्या संपर्कात आली मंजू. ती नुकतीच तिच्या सासरघरून जीव वाचवून कशीबशी बाहेर पडली होती. मंजू एका गरीब घरातील मुलगी. शिक्षणाशी संबंध जेमतेमच आला. प्रथेनुसार लहान वयातच तिचे लग्न करून दिले. लग्न झाल्यापासून एकही दिवस तिचा सुखाने गेला नाही. सासू, नवरा, नणंद सगळे तिला अतोनात जाच करत. उपाशी ठेवण्यापासून मारझोड करण्यापर्यंत सगळे प्रकार नेहमीचेच झाले होते. लग्नात फारसं काही घेऊन आली नाही म्हणून हा छळ होता. सारखा तिने माहेरहून काही तरी आणावे म्हणून सासरच्यांचा तगादा सुरू असायचा आणि एक दिवस नवरा, सासू आणि नणंद तिघांनी मिळून तिचे हात-पाय बांधले, तोंडात बोळा कोंबला आणि चक्क तिला पेटवून दिले! मंजूच्या दुबळ्या शरीरात जिवाच्या भीतीने बळ संचारले. आत्तापर्यंतची सारी सहनशक्ती आगीत जळून गेली आणि जीव खाऊन तिने लाथ मारली. नणंदेच्या छाताडावर ती बसली आणि ती मागे भेलकांडली. आगीमुळे हातापायाला बांधलेली दोरी जळाली होती, ती तुटली आणि मंजू सुटली. पेटत्या मंजूने धाव घेतली ती सरळ जाऊन घरासमोरच्या मातीच्या रस्त्यावर पडली आणि त्यानंतर तिने पुन्हा त्या घरात प्रवेश केला नाही. शाळेत गेलेल्या मुलांना जाऊन स्वत:कडे घेऊन आली. गावातच स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्या होत्या. मंजू आणि तिच्या माहेरच्यांना त्यांच्या रूपाने भक्कम आधार मिळाला आणि पुढचा मार्गही! मंजूला सासरच्यांना धडा शिकवायचाच होता. तिला मिळालेली वागणूक बघता ते योग्यही होते. म्हणून संस्थेनेच तिची भेट अंजूशी घालून दिली. मंजूला बघून अंजूला स्वत:चंच प्रतिबिंब तिच्यात दिसलं. आज जरी ती वकील आणि मंजू एक साधी गावंढळ मुलगी असली तरी त्यांच्यात एक धागा समान होता! दु:खाचा, प्रतारणेचा आणि वेदनेचा! या एका धाग्यानेच त्यांना क्षणात जोडलं.

मंजूने ४९८ अ या कलमाअंतर्गत केस दाखल केली. त्याचबरोबर तिचा व मुलांचा भरणपोषणाचा खर्च मिळवण्यासाठीही केस केली. या साऱ्या प्रक्रियेत अंजू तिची watching advocate म्हणून हजर होती. पुरावे गोळा करण्यापासून ते मंजूला साक्षीसाठी तयार करण्यापर्यंत सारी धडपड करत होती. अखेर मंजू खालच्या कोर्टात ती केस जिंकली, तिच्या सासरच्यांना शिक्षा झाली. त्याविरुद्ध त्यांनी अपील केले आहेच आणि ते अजून निकाली निघालेले नाही.

मंजू एका नवीन आयुष्याला सुरुवात करण्यात हळूहळू यशस्वी होत होतीच; पण अंजूचा आत्मविश्वासही वाढत होता. आता त्या दोघीही इतर पीडित स्त्रियांनाही मदत करत होत्या. आता त्या संस्थेच्या मार्गदर्शनातून, अनेक प्रशिक्षणांतून आणि इतर कार्यकर्त्यांच्या संपर्कातून घडत गेलेल्या कार्यतत्पर कार्यकर्त्या होत्या. घुंगट घेणाऱ्या, गुदमरलेल्या मुलींपासून धडाडीच्या कार्यकर्त्यांपर्यंतचा त्यांचा हा प्रवास विलक्षण आणि त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची साक्ष देणारा होता. माझ्या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाल्याचे त्या सगळ्यांनी आवर्जून सांगितले; पण प्रत्यक्षात मात्र मलाच त्या प्रशिक्षणातून आपलं काम करत राहण्यासाठी किती तरी मानसिक बळ मिळालं होतं. माझ्या सहप्रवासिनी भगिनींकडून मिळालेली ऊर्जा घेऊन मी नव्या दमाने संघर्षासाठी सिद्ध झाले होते.

mrudulasawant13@gmail.com