आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दम्यावर योगाने यशस्वी उपचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाची तिशी पार करत असतानाच अस्थमाने (दमा) गाठले होते. श्वास घ्यायला अडचण निर्माण व्हायची. दम्याचा त्रास रात्री डोके वर काढत असे. त्यामुळे रात्र जागून काढावी लागत असे. त्रास अधिक वाढला की, जवळच्या डॉ. बेलणकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागे. सलाइन लावली जाई. श्वास मोकळा करण्यासाठी वाफ दिली जाई. औषध -गोळ्याने फरक पडत होता. पण हा त्रास आठ-पंधरा दिवसांनी डोके वर काढत असे. त्यामुळे जीव वैतागून गेला होता. इतक्या कमी वयात आपल्याला अशा आजाराने गाठले यामुळे निराशा आली होती. डॉक्टरही औषध-गोळ्या चालू ठेवा, फरक जाणवेल, असा केवळ दिलासा देत होते. आस्थाइनची गोळी खिशात कायम बाळगावी लागत असे. त्रास सुरू झाला की गोळी खायची. त्यामुळे आराम वाटायचा. पण नेहमीची सर्दी, खोकला, कफ, दम्याच्या त्रासाने हैराण झालो होतो. नियमित औषधोपचारासह अनेक आयुर्वेदिक, जडीबुटीची औषधे घेतली, पण फरक पडला नाही. आता हे दुखणे कायमचे सोबत, असे मानून जगायचे, अशी मानसिक तयारीही केली होती. नऊ वर्षे हा त्रास सहन करण्यातच काढली. 1997 च्या सुमारास वर्तमानपत्रातून ‘दम्यावर योगासनाद्वारे उपचार’ याविषयी वाचले. त्यामुळे योगाविषयी जागरुकता निर्माण झाली. दरम्यानच्या काळात योगशिक्षक बी. हेमंतकुमार यांच्याशी परिचय झाला. त्यांनी योगसन व प्राणायम शिकवण्याचे मान्य केले. माझ्याबरोबर इतर सहकारीही योगासने शिकण्यासाठी तयार झाले. जुळे सोलापूर, संतोषनगरातील महालक्ष्मी मंदिरात योगासन वर्ग घेण्याचे ठरले. यात ए. जी. पाटील यांचे सहकार्य लाभले. दररोज मी योगासन वर्गाला जाऊ लागलो आणि नवव्या दिवशीच फरक जाणवू लागला. दम्याचा त्रास कमी झाला. त्यामुळे कधीही खंड न पडता मी दररोज योगासने करू लागलो. हळूहळू औषध-गोळ्या कमी होत जाऊन बंदच झाल्या. थंड, गरम वातावरणामुळे होणारा परिणाम कमी होत गेला. आता मी एखाद्या निरोगी माणसाप्रमाणे जीवन जगू शकत होतो. दवाखान्यात जाणे बंद झाले. औषधाशिवाय या आजारावर उपाय नाही, असे म्हणणारे डॉक्टर व इतर मंडळीही माझ्यात झालेली सुधारणा पाहून अवाक् झाली.
पंधरा वर्षे झाली, दम्यावर एकही औषध घेतले नाही. केवळ योगासनातूनच या आजारावर नियंत्रण मिळवले आहे. पुढे योगासन प्राणायमाचे महत्त्व सर्वांना समजण्यासाठी मोफत योगासन वर्ग घेण्याचा संकल्प केला. त्यानुसार गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळापासून जिल्हा दूध संघातील कामाची जबाबदारी सांभाळत योगासन वर्ग घेत आहे. यात कधीही खंड पडला नाही. दम्याच्या दुर्धर आजारातून माझी मुक्तता झाली. हीच प्रेरणा घेऊन मी काम करतो. या वर्गाचा दररोज 20 ते 25 लोक लाभ घेतात. दमा, रक्तदाब, मधुमेह यासारख्या आजारांवर योगासनामुळे फरक पडल्याचा अनुभव सांगतात. त्यामुळे हे वर्ग घेताना समाधान वाटते. योगासनात प्रत्येक आजारावर नियंत्रण मिळवण्याचा उपाय आहे. फक्त या योगासनाची नियमितता जपली पाहिजे. इच्छाशक्ती प्रबळ असेल तर योगातील छोट्या वाटणा-या आसनाद्वारे दुर्धर आजारावर नियंत्रण आणता येऊ शकते, हाच संदेश मी यानिमित्त देऊ शकतो.

(अशा अनुभवाचे स्वागत होईल)