आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Suchitra Inamdar Story About Schizophrenia On Account Of World Mental Health Day

स्किझोफ्रेनियाशी संवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भ्रमाचं मळभ, चुकीच्या कल्पनांवर असणारा दृढ विश्वास आणि वस्तुस्थितीशी लपंडाव किंवा वस्तुस्थितीकडे चक्क कानाडोळा करणं हा सगळा वैचारिक गोंधळ म्हणजे स्किझोफ्रेनिया. आपल्याला स्किझोफ्रेनिया आहे, हे रोगनिदानच अनेकांना उद्ध्वस्त करतं. असे काही आवाज किंवा माणसं आहेत जी त्यांच्या मनातलं वाचू शकतात, त्यांच्याविरुद्ध कट रचतात किंवा त्यांच्या विचारांचा ताबा घेतात, असं या व्यक्तींना वाटायला लागतं. अशी माणसं स्वत:ची काळजी घेणंही सोडून देतात. आपल्याच मनाने रचलेल्या कथानकांमध्ये हरवून जाणारे हे लोक अतिसंवेदनशील होतात आणि अकार्यक्षमही!

नांगर न टाकल्यामुळे भरकटलेल्या जहाजासारखी अवस्था करणा-या या आजारावर काही खात्रीलायक इलाज आहे का? हा आजार जरी पूर्णपणे बरा होणारा नसला तरी यावर औषधोपचार आहेत आणि ही दीर्घकाळ राहणारी अवस्था असल्यामुळे औषधं आयुष्यभर घेणं आवश्यकही आहे. या आजाराशी नीट जुळवून घेण्यासाठी औषधोपचार अटळ आणि अत्यावश्यक असले तरी तेवढंच पुरेसं नाही.

जसे शारीरिक आजारावर फक्त औषधं घेऊन उपयोग नसतो, औषधांना सकस आहार आणि विश्रांतीची जोड द्यावी लागते, तसेच मानसिक आजारांचेही आहे. येथे औषधोपचारासोबत सकस आहार म्हणजे जीवनाचा स्तर आणि विश्रांती म्हणजे समस्या ओळखून ती समजून घेणं असा अर्थ लावायला हवा. या व्यक्तीच्या भावनिक, सामाजिक आणि शारीरिक विश्वावर अधिराज्य गाजवणा-या स्किझोफ्रेनियामुळे होणारी हानी ही फार मोठी असते. त्यामुळे वैचारिक, भावनिक आणि वर्तन आरोग्याच्या सक्षमीकरणासाठी, त्यात सुधारणा होण्यासाठी औषधोपचारांसोबत समुपदेशन (counselling) अत्यंत महत्त्वाचं आहे.

आजाराविषयीची जाणीव, आजाराचा स्वीकार, अस्वस्थ करणा-या कळीच्या मुद्द्यांची (Triggers) जाणीव, आजाराच्या सर्व लक्षणांचं व्यवस्थापन, आधारप्रणालीची (Support system) निर्मिती आणि स्वीकृती, ध्येयनिर्मिती, चांगल्या काळात जाणवणारा (आजाराची लक्षणं न जाणवणारा काळ) एकूणच आयुष्याचा हेतू आणि अर्थपूर्णता - या सगळ्या गोष्टी रुग्णाच्या संदर्भात त्याचं सक्षमीकरण या प्रक्रियेत समाविष्ट होतात. आपल्या देशात असणारी कुटुंबव्यवस्था हा घटक रुग्णाच्या आधारप्रणालीच्या संदर्भात अत्यंत उपकारक ठरतो. रुग्णाचे आईवडील, नवराबायको, भावंडं किंवा अगदी मुलंही रुग्णाचे प्राथमिक काळजीवाहक असतात. (यांनाच शुभंकर असा शब्द हल्ली प्रचलित आहे.) काही वेळा रुग्णाची योग्य काळजी घेण्यासाठी या सर्वांच्या मानसिक गरजा, त्यांचे उद्रेक किंवा उतावळेपणाकडे दुर्लक्ष करणे, याकडे रोगनिवारणतज्ज्ञाचा कल असतो. रुग्णाची जलद गतीने प्रगती होण्यासाठी काळजीवाहकाने स्वत:चं आयुष्य आनंदाने उपभोगणं आणि आव्हानं स्वीकारणं अतिशय गरजेचं असतं.
रुग्णाच्या काळजीवाहकाने त्याचे फाजील लाड करू नयेत किंवा त्याच्याकडे दुर्लक्षही करू नये. रुग्णाला सतत प्रेरणा देणं, स्वयंपाक, स्वच्छता, दैनंदिन घरगुती कामं जी कुटूंबातल्या प्रत्येक सदस्यामध्ये विभागली जातात - अशा साध्यासोप्या जीवनकौशल्यांमधून त्यांना स्वत:च स्वत:ची काळजी (प्रसंगी थोडी जबरदस्ती करून) घेण्यास लावणं, त्यांच्या वयानुरूप काही लहानसहान जबाबदा-या त्यांनी पूर्ण कराव्यात अशी अपेक्षा करणं, इ. गोष्टी रुग्णाला आंतरिक समाधान आणि आपणही काहीतरी संपादन केल्याची सकारात्मक जाणीव देतात. स्वत:चा स्वीकार करणं, अनुमान लावता न येणा-या स्वत:च्या व्यक्तित्वाचा स्वीकार करणं या गोष्टी त्यांना शिकवायला हव्यात. त्यांना ही जाणीव करून देणंही गरजेचं आहे, की या भवतालाचा एक महत्त्वाचा भाग या दृष्टीने त्यांनी स्वत:कडे पाहिलं पाहिजे. यामुळे त्यांना स्व-आदरभाव (Self esteem) पुन्हा मिळवता येईल. आणि पुन्हा एकदा स्वत:बद्दल स्वप्नं बाळगण्याची निर्भयता त्यांच्या मनात जागवता येईल, सर्वसामान्य आयुष्य जगण्याची उमेद निर्माण करता येईल. वैद्यकीय मानसोपचाराचा उद्देशच हा आहे, की चांगल्या दिवसांच्या पुनरावृत्तीत वाढ व्हावी आणि वाईट दिवसांच्या पुनरावृत्तीत (मनोविकारग्रस्त विचारांच्या मालिकेत) घट व्हावी. उफाळून येणारा प्रत्येक मनोविकार हा रुग्णाच्या प्रगतीमधला अडसर ठरू शकतो.
स्किझोफ्रेनिया या आजाराची सुरुवात पुरुषांमध्ये त्यांच्या पौगंडावस्थेत (Teenage) आणि महिलांमध्ये पौगंडावस्थेच्या शेवटच्या टप्प्यात किंवा प्रौढावस्थेच्या सुरुवातीच्या काळात (Late teens or early childhood) होण्याची शक्यता असते. सामाजिकदृष्ट्या हा आजार का आणि कसा उद्ध्वस्त करणारा आहे, हे यावरून लक्षात येईल. यामुळे स्वाभाविकपणे रुग्णाचा ‘स्व’ विकसित होण्यास विलंब लागू शकतो, त्याच्या स्वप्रतिमेला तडा जाऊ शकतो, त्याने स्वत:भोवती निर्माण केलेल्या विश्वामुळे तो वास्तवापासून भरकटू शकतो. रुग्ण स्वत:च्या प्रगतीची आव्हानं स्वीकारू शकत नाही - उदाहरणार्थ - लग्न किंवा अपत्याला जन्म देणं. जर अशा जबाबदा-या स्वीकारण्याची जबरदस्ती त्याच्यावर केली गेली तर त्या व्यक्तीचा जोडीदार किंवा अपत्यं, यांचं कायमस्वरूपी नुकसान होऊ शकतं. जवळच्या व्यक्तीला आपल्यामुळे कराव्या लागणा-या तडजोडींमुळे रुग्णाच्या मनात अपराधीपणा, शरमेची भावना निर्माण होते. त्याच्या सुधारण्याच्या प्रक्रियेवर याचा दुष्परिणाम होतो. ब-याचदा असं निदर्शनाला येतं, की जसजसं रुग्णाचं वय वाढत जातं, तसतशी चांगल्या दिवसांच्या पुनरावृत्तीमध्ये सुधारणा होत जाते. सामान्य व्यक्तींजवळ असणारं ‘शहाणपण’ त्यांच्यातही रुजत जातं - वयाच्या २८, ३५, ४० व्या वर्षी किंवा त्यापुढेही! अस्वस्थ मनोव्यापारांची ( मनाने रचलेल्या कथानकांची) तीव्रता कमी होत जाते आणि त्यांची पुनरावृत्ती निश्चितपणे थांबते - हाच असतो त्या जीवाच्या सुधारणेतल्या वाटेवरचा मैलाचा दगड! अशा एखाद्या व्यक्तीचं आयुष्य संवर्धित करणं, अर्थपूर्ण/हेतुपूर्ण करणं, संपन्न नातेसंबंधांनी भारून टाकणं हे त्या आत्म्याला पुरवलेलं सकस खाद्य असतं.